आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकविता आणि चांगल्या लिखाणाबाबत बोलताना गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचे नाव हमखास निघतेच. पण टागोरांच्या कुटुंबातील महिला फॅशनच्या बाबतीतही ब-याच पुढारलेल्या होत्या हे फारच कमी लोकांना ठाऊक असेल. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या आरंभी त्यांनी नव्याने फॅशनची व्याख्या केली. फॅशन डिझायनर जॉय मित्रा यांनी त्या काळातील फॅशनवर सखोल संशोधन केले आहे. प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर नितीन उपाध्याय यांच्यासोबत आता ते एक माहितीपट तयार करणार आहेत. एका खास मुलाखतीत जॉय म्हणाले की, मी बंगाली असल्यामुळे माझ्या मनात हा विचार आला नाही. बंगालबद्दल बोलताना आपण टागोरांबद्दल बोलतोच. जॉय यांनी किंचित हसून सांगितले की, आपण म्हणतो ना, प्रत्येक सफल पुरुषामागे एक महिला असते. टागोरांच्या बाबतीत अशा अनेक महिला होत्या.
जॉय यांचा माहितीपट - टागोरांचे सृजनात्मक कार्य व कवितांवर प्रभाव असलेल्या महिलांचे प्रतिबिंब असलेला माहितीपट तयार करण्यासाठी जॉय आवर्जून कोलकात्याला गेले. संग्रहालयात रूपांतरित टागोरांच्या घरालाही त्यांनी भेट दिली. जॉय म्हणाले की, त्यांना फक्त अभिजात कलाकृतींवर काम करण्याची इच्छा आहे. इतिहासाचे त्यांना आकर्षण आहे. तो एक उत्कृष्ट शिक्षक आहे. टागोरांच्या 150 व्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 2011 फॅशन वीक कलेक्शन सादर केले तेव्हा हा विचार माझ्या डोक्यात आला. श्रेष्ठ दिग्दर्शक रितुपर्णो घोष यांच्यासोबत अनेक चित्रपटात जॉय यांनी काम केलेले आहे. त्यांनी सांगितले की, टागोरांसारखी महान व्यक्ती आणि त्यांच्यासोबत राहणा-या महिलांबद्दल (टागोरांचे कुटुंब मोठे होते. त्यात अनेक भाऊ आणि सुना राहात.) वाचताना माझ्या डोक्यात हा विचार आला. या महिला नव्या रीतीने सजण्याधजण्यात पुढे असत आणि वेगळ्याच पद्धतीने साड्या नेसत असत.
रवींद्रनाथांच्या वहिनी ज्ञाननंदिनीदेवी फॅशनमध्ये सर्वात पुढे - फॅशनच्या स्पर्धेत ज्ञाननंदिनीदेवी (1850-1941) सर्वात पुढे होत्या. त्यांचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी रवींद्रनाथांचे मोठे बंधू सतेंद्रनाथ टागोर यांच्याशी झाले होते. भारतीय नागरी सेवेत (1864 मध्ये) निवड होणारे ते पहिले भारतीय होते. ज्या काळात महिला घराबाहेर पाऊलही टाकत नसत त्या काळात ज्ञाननंदिनी एका मासिकाच्या संपादक बनल्या आणि एवढेच नाही, तर साडीचा पदर आधुनिक पद्धतीने कसा घ्यावा याची कलाही त्यांनी शिकवली. त्या काळी महिला ब्लाउज घालत नसत तेव्हा त्यांनी जॅकेट्स घालायला सुरुवात केली आणि पोशाख चांगला दिसावा यासाठी ब्रोचेस घालण्यास आरंभ केला. आपल्या पतीसोबत मुंबई दौ-यादरम्यान त्यांनी पारसी शैलीतील साडी नेसण्याचे बारकावे शिकून घेतले. त्यांनी ब्राह्मिका साडीची फॅशन आणली. या साडीवर चोळी, पेटीकोट, मोजे आणि बूट घातले जात असत. हा नवा पोशाख परिधान करून नव्या पिढीतील कुलीन महिला बाहेर पडू लागल्या.
ज्ञाननंदिनी यांनी 1871 मध्ये बमबोधिनी नियतकालिकातून सुधारित पोशाखाचा प्रचार केला. त्यानंतर 1877 मध्ये आपल्या तीन मुलांसह दीर्घकाळ त्या इंग्लंडमध्ये होत्या. बंगाली, गुजराती, मराठी आणि फे्रंच या भाषा त्या अस्खलितपणे बोलत असत. जॉय म्हणाले की, त्या एक ट्रेंड सेटर अणि पाश्चात्त्य बंगाली कुलीन वर्गातील नव्या पिढीसाठी आदर्श होत्या.
या माहितीपटात ज्ञाननंदिनीसारख्या महिलांचे जीवन दर्शवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यांनी विभक्त कुटुंबाची कल्पना मांडली आणि पुरुषांप्रमाणेच घोडेस्वारी करण्याचे समर्थन केले. त्या काळी असे करणे वर्ज्य होते. ज्ञाननंदिनी काळाच्या किती पुढे होत्या हे 20 मिनिटांत दाखवण्याचा हा प्रयत्न असल्याचे जॉय म्हणाले.
अस्मिता अग्रवाल, नवी दिल्ली, फॅशन रायटर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.