आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपन्न अलेप्पो शहर आज भीषणावस्थेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीरियाची आर्थिक राजधानी मानले जाणारे अलेप्पो हे शहर तुर्कस्तानच्या सीमेनजीक वायव्य भागात आहे. हा भाग सुन्नी मुस्लिमबहुल परिसर. सीरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांच्या सत्तेच्या विरोधातील अनेक गट येथे सक्रिय आहेत. असद यांच्या सत्ताकाळात राजकीय उठाठेवी, सशस्त्र संघर्ष आणि वारंवार होणारा बॉम्बवर्षाव हा केवळ बंडखोरांसाठीच नव्हे तर माणुसकीसाठीही घातक ठरला आहे. एकदा तर असद यांचे सरकार पडते की काय अशी स्थिती होती, पण इराण आणि रशियाच्या पाठिंब्यामुळे हे सरकार वाचले. कतार आणि सौदी अरब तर बंडखोरांना प्रोत्साहन देत आहेत. 
 
सरकारने अवलंबलेले हिंसक मार्ग आणि बंडखोरांच्या हल्ल्यात निरपराध जनतेचा बळी जात आहे. हा संघर्ष थांबवण्यासाठी केलेले अनेक राजकीय प्रयत्न फोल ठरले. या संघर्षासाठीच्या कारणांमध्ये विविध देशांचा राजकीय उद्देश तसेच काही धार्मिक पैलूंचाही समावेश आहे. त्यामुळेच यामधून ठोस मार्ग काढण्यात विलंब होत आहे. राजकीय किंवा धार्मिक लाभ कितीही असला तरी लाखोंच्या संख्येने बळी घेणाऱ्या या युद्धाचे समर्थन कदापि केले जाऊ शकत नाही. या संघर्षात लहान मुलांचा सर्वाधिक संख्येने बळी गेला आहे. 

औपचारिक शिक्षणाचा अभाव, जिवंत राहण्यासाठी आवश्यक गरजांचा तुटवडा तसेच भविष्यातील अनिश्चितता यामुळे येथील नागरिक कोणत्या प्रकारच्या भयंकर मानसिकतेत असतील, याची आपण कल्पना करू शकतो. एकीकडे जगात अधिकाधिक सुखी, संपन्न जीवनशैलीसाठी अद्ययावत प्रयोग, संशोधने सुरू आहेत, तर दुसरीकडे अलेप्पोतील जनता जिवंत राहण्याच्या आशेवर एक एक दिवस पुढे ढकलत आहे. इथले नागरिक दररोज घडणाऱ्या माणुसकीच्या हत्येचे साक्षीदार आहेत. 
सवर्णी पंत, १९,   
जीझस अँड मेरी कॉलेज, दिल्ली युनिव्हर्सिटी
बातम्या आणखी आहेत...