आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलीवूडचे उत्तरायण(अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपट आणि ज्याला आपण ‘मार्केट फोर्सेस’ म्हणतो ती बाजारपेठ यांचा परस्पर संबंध असतो का? चित्रपटनिर्मितीची कला स्वयंभू असते की बाजारपेठच चित्रपटाचा आशय-विषय आणि परिसर ठरवत असते? सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे, बाजारपेठेच्या वाढत्या वा बदलत्या प्रभावाचा आशय-विषय आणि भाषासौंदर्यावर परिणाम होतो का? या तिन्ही प्रश्नांची उत्तरे अर्थातच ‘होय’ अशी आहेत. शेवटी कोणतीही कला एका मर्यादेपलीकडे आत्मरत राहू शकत नाही, बदलत्या जनमानसाची, जनमानसाच्या बदलत्या इच्छा-आकांक्षा आणि अभिरुचीची तिला दखल घ्यावीच लागते. चित्रपट हे तर बोलूनचालून प्रेक्षकाभिमुख माध्यम. सर्वसामान्य प्रेक्षक हा या माध्यमाचा केंद्रबिंदू आणि बाजारपेठेच्या प्रभावाची दखल घेऊन पाऊल टाकणे ही या व्यवसायाची प्रारंभापासूनची अपरिहार्यता. या अपरिहार्यतेने हिंदी चित्रपटांचा आशय-विषय तसेच संवादभाषेची दिशा आजवर निश्चित केली आहे.

तोच ट्रेंड आजही कायम आहे. मुख्यत: त्याचेच प्रतिबिंब हिंदी चित्रपटांमध्ये वास्तव जगण्यातील ताण्याबाण्यासहित झळकू लागलेल्या उत्तर भारतीय (मुख्यत: उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थान) संवादभाषा आणि संस्कृतीच्या रूपाने प्रकर्षाने उमटू लागले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत प्रारंभी पंजाब-पेशावरहून आलेल्या कलावंत-तंत्रज्ञांचाच भरणा अधिक होता. साहजिकच त्यांच्यासोबत आलेल्या भाषेचा तसेच संस्कृतीचा चित्रपटांवर मोठा प्रभाव होता. त्यातही त्या काळच्या बहुसंख्य चित्रपटांतील परिसर आणि भाषा प्रामुख्याने रंगमंचीय होती. प्रत्यक्ष जगण्याशी, वास्तवात घडून येणा-या परस्परसंवादाशी आणि संवादबोलीशी त्याचा तितकासा संबंध नव्हता. परंतु पन्नासच्या दशकात त्या काळच्या मुंबईच्या भाषेला तसेच ‘कॉस्मोपॉलिटन’ संस्कृतीला सरावलेल्या नव्या पिढीच्या म्हणजेच राज कपूर, देव आनंद, गुरुदत्त आदींच्या चित्रपटांवर मुंबई परिसराचा तसेच भाषेचा प्रभाव जाणवू लागला होता. ‘ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हटके, जरा बचके ये है बॉम्बे मेरी जाँ...’ या ओळीत प्रेक्षकांच्या संवेदना प्रकट होत होत्या. अर्थातच, त्या वेळचा हिंदी चित्रपटांचा प्रेक्षकही मुख्यत: शहरी बाजाचा होता. त्यातही जो मुंबईबाहेरचा वा ग्रामीण भागातला होता, त्याला मुंबईबद्दल, मुंबईच्या जात-धर्म-पंथविरहित मोकळ्याढाकळ्या समाजजीवनाबद्दल आणि खासकरून ‘बम्बैया हिंदी’बद्दल सुप्त आकर्षण होते.

मुंबईचे, शहरी भाषेचे आकर्षण असलेल्या प्रेक्षकांची नस ओळखून हिंदी चित्रपटसृष्टी त्या काळी चित्रपट देत होती. अगदी सत्तरच्या दशकापर्यंत हा परिपाठ सुरू होता. याच काळात रंगमंचीय बाज गळून चित्रपटांतल्या वातावरणाला, संवादभाषेला वास्तववादाचा स्पर्श होऊ लागला होता. त्याचे प्रतिबिंब श्याम बेनेगल, बासू भट्टाचार्य, हृषीकेश मुखर्जी, गुलजार, बासू चटर्जी यांच्या चित्रपटांतून उमटू लागले होते. त्यातच सत्तरच्या दशकात अमिताभ बच्चन नावाचा झंझावात रुपेरी पडद्यावर अवतरला आणि पाठोपाठ संवादभाषेच्या स्थित्यंतराला नव्याने प्रारंभ झाला. अमिताभने साकारलेला ‘अँग्री यंग मॅन’च्या रूपातील एक नायक रासवट बम्बैया हिंदी बोलून प्रेक्षकांच्या टाळ्या घेत होता, तर भोळ्याभाबड्या रूपातील दुसरा नायक भोजपुरी-इलाहाबादी बोलीचा वापर करून प्रेक्षकांचे भरपेट मनोरंजन करत होता. अमिताभने साकारलेल्या व्यक्तिरेखेने बम्बैया ह‍िंदीचा वापर करणे तोवर चालत आलेल्या प्रवाहाला धरूनच होते, परंतु चित्रपटागणिक भोजपुरी आणि खडी बोलीचा सातत्याने वापर होत जाणे, हे खरे तर बदलत्या प्रवाहाचे सुस्पष्ट सूचनही होते. मात्र, नव्वदच्या दशकात पुन्हा एकदा अनिल कपूर (तेजाब), जॅकी श्रॉफ (परिंदा, चौराहा), आमिर खान (रंगीला, गुलाम), शाहरुख खान (राम जाने), मनोज वाजपेयी (सत्या) आदींनी आपापल्या व्यक्तिरेखांद्वारे खास बम्बैय्या ढंगातील हिंदी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता, येथून पुढे हा प्रवाह सशक्त होत जाणे अपेक्षित होते; परंतु तसे व्हायचे नव्हते. कारण हाच तो काळ होता, जेव्हा अनुराग कश्यप, जयदीप साहनी, राकेश ओमप्रकाश मेहरा, विशाल भारद्वाज, इम्तियाज अली, शाद अली, तिग्मांशू धुलिया, प्रसून जोशी यांसारखी उत्तर भारतीय संस्कार आणि निमशहरी अनुभवांचे गाठोडे घेऊन आलेली ताज्या दमाची मंडळी चित्रपटसृष्टीत पाय रोवण्याच्या प्रयत्नात होती.

दुसरीकडे त्याच वेळी लोकसंख्यावाढीचा लोलक उत्तर भारताकडे झुकू लागला होता. उत्तर प्रदेश-बिहार ही राज्ये तारुण्यात प्रवेश करू लागली होती. मुख्य प्रवाहात येण्याच्या धडपडीत असलेल्या या तरुणाईच्या आशा-आकांक्षांना नवे धुमारे फुटू पाहत होते. जगाला स्वत:ची गोष्ट सांगण्यासाठी ही तरुणाई आतुर होती. उत्तर भारतातून चित्रपटसृष्टीत दाखल झालेल्या दिग्दर्शक-कलावंतांचे टप्प्याटप्प्याने प्रस्थापित होत जाणे आणि उत्तर भारतीय बाजारपेठ विकसित होत जाणे या दोन घटना एकाच वेळी घडत होत्या. त्याचे प्रतिबिंब हिंदी चित्रपटांत उमटणे अपरिहार्य होते. प्रकाश झाच्या ‘मृत्युदंड’ने (1997) बिहारमधील राजकारण-समाजकारण आणि चालीरीतींवर प्रकाश टाकला होता. 1999मध्ये आलेल्या ‘शूल’मधील ‘मैं आई हूँ यूपी-बिहार लूटने’ या गाण्याच्या अफाट लोकप्रियतेने मार्केटचा पुरता अंदाज दिला होता. शाद अलीच्या ‘बंटी और बबली’ने भोजपुरी लहेजासह उत्तर प्रदेशचे अनोखे सांस्कृतिक रंग टिपले होते. विशाल भारद्वाजच्या ‘ओंकारा’, ‘इश्किया’ने सांस्कृतिक-राजकीय दबलेपणातून मुक्त होऊ पाहणारे रासवट जगणे भोजपुरी-अवधी भाषेसह प्रेक्षकांपुढे आणले होते. अनुराश कश्यपने ‘गँग्ज ऑफ वासेपूर’मधून उत्तर भारतीय जगण्याचा उभा-आडवा छेद घेतला होता.

तिग्मांशू धुलियाचा ‘पानसिंग तोमर’ उत्तर भारताची ओबडधोबड भाषा बोलत होता. गेल्याच वर्षी येऊन गेलेल्या हबीब फैजल दिग्दर्शित ‘इशकजादे’ने प्रेमकथा मांडताना उत्तर प्रदेशातील जातीय-राजकीय संघर्षाचा माग घेतला होता. याच मालिकेत आता पुढील आठवड्यात ‘शुद्ध देसी रोमान्स’ नावाचा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्याचा परिसर राजस्थानचा आहे. त्यातील संवादभाषा सावधपणा नाकारणारी, शहरी संस्कारांचा धाक नसलेली, ओतप्रोत रांगडी आहे. कथा-पटकथा लेखक जयदीप साहनीच्या म्हणण्यानुसार, हिंदी चित्रपट ‘लँग्वेज जेल’मधून बाहेर पडू पाहताहेत. ‘डेमोग्राफिक शिफ्ट’मुळे या अवस्थेचे उत्स्फूर्त स्वागत होणार हेही उघड आहे. याच कारणामुळे मुंबई-दिल्ली-कोलकात्यासारख्या शहरांतही भोजपुरी चित्रपटांचा प्रेक्षक वाढत आहे. मुंबईसारख्या शहरांतून उत्तर भारतीय छाप असलेले छठपूजेसारखे सांस्कृतिक उपक्रम धडाक्यात साजरे होत आहेत. लोकसंख्या अभ्यासकांच्या मते, सध्या भारताच्या एकूण लोकसंख्येत उ. प्रदेश-बिहार-राजस्थान आदी राज्यांचा वाटा 40 टक्के आहे. 2025पर्यंत तो 50 टक्क्यांपर्यंत जाणार आहे. त्या वेळी त्या प्रदेशांचे सरासरी वय 26 असणार आहे. याचाच दुसरा अर्थ असा आहे की, उत्तर भारतीय संवादभाषा-संस्कृतीचा यापुढेही प्रभाव कायम राहणार आहे. एक प्रकारे बॉलीवूडचे उत्तरायण सुरू झाले आहे.