आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलीवूडचा सेक्युलॅरिझम ‘मनमोहन स्टाइल’! ( अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘सेक्युलॅरिझम’ ही संकल्पना आजच्याइतकी कुचेष्टेचा विषय बनली नव्हती, तेव्हा ‘मिरॅकल मॅन ऑफ बॉलीवूड’ या उपाधीने गौरवला गेलेला मनमोहन देसाई नावाचा कलंदर निर्माता-दिग्दर्शक आपल्या निखळ मनोरंजनवादी हिंदी चित्रपटांतून जाणीवपूर्वक सर्वधर्मसमभावाची मूल्ये जपत होता. किंबहुना, सर्वधर्मसमभाव हेच देसाईंच्या चित्रपटांना (बुद्धिवादी मंडळींनी हेटाळलेल्या) जोडणारे प्रमुख सूत्र होते. त्यातही ‘अमर अकबर अँथोनी’(1977) हा चित्रपट जितका व्यावसायिक यशाचा मानबिंदू होता, तितकाच तो सर्वधर्मसमभावाचे सर्वोच्च प्रतीकही होता. अगदी टायटलपासून आशयापर्यंत! याच चित्रपटाच्या निर्मितीची कहाणी सांगणारे ‘अमर अकबर अँथोनी-मसाला, मॅडनेस अँड मनमोहन देसाई’ या नावाचे ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ भाटिया लिखित पुस्तक येत्या महिनाभरात प्रकाशित होणे, ही घटना वातावरणात दृश्य-अदृश्य स्वरूपातला जातीय तणाव असताना एका अर्थाने प्रतीकात्मक म्हणायला हवी. अभिरुची बदललेली नवी पिढी काहीशी अनभिज्ञ असली तरीही आज वयाच्या चाळिशी-पन्नाशीत असलेल्या प्रेक्षकांच्या पिढीने 70चे दशक संपताना रुपेरी पडद्यावर झळकलेल्या ‘अमर अकबर अँथोनी’ची जादू पुन:पुन्हा अनुभवलेली आहे. हा चित्रपट म्हणजे अतार्किक, अतिरंजित आणि अवास्तवतेवर आधारलेला, तरीही ओतप्रोत सेक्युलर असा चित्रउत्सव होता.

जन्माने गुजराती पण अस्सल हिंदू सेक्युलॅरिस्ट असलेले मनमोहन देसाई त्या उत्सवाचे कर्ताधर्ता होते. त्यात अमिताभ बच्चन-विनोद खन्ना-ऋषी कपूर -परवीन बाबी-शबाना आझमी-नीतू सिंग यांच्या हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन समाजाचे प्रतिनिधित्व करणा-या आपल्यातल्याच वाटाव्या अशा परंतु ‘लार्जर दॅन लाइफ’ व्यक्तिरेखा होत्या. खटकेबाज नि खट्याळ संवाद आणि उडत्या चालींची गाणी होती. वैद्यकविज्ञान आणि तर्कशास्त्राला फाटा देत एकाच वेळी तीन नायकांनी आईला रक्त देणे, दगडावर डोके आपटून नायकाच्या आईची स्मृती जाणे-येणे, एका आईची तीन मुले एकमेकांपासून दुरावणे-एकत्र येणे, त्यांना हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन ओळख मिळणे, असे अतिरंजिततेचा कळस गाठणारे प्रसंग त्यात होते. परंतु आपल्या दिग्दर्शकीय कौशल्याच्या बळावर देसाईंनी सिनेरसिकांमधल्या एका मोठ्या वर्गाला चित्रपटातल्या घटना-प्रसंगांवर विश्वास ठेवण्यास भाग पाडले होते. लोकप्रियतेचा कळस गाठलेल्या या चित्रपटाला रंजक चित्रपटांतला ‘क्लासिक’ म्हणण्यापर्यंत रसिकांची मजल गेली होती. त्या काळी इंग्लंडमधील बीबीसी टेलिव्हिजनने ‘प्राइम टाइम’मध्ये हा चित्रपट प्रसारित करून चित्रपटाला भारतात मिळालेल्या लोकप्रियतेची यथायोग्य दखल घेतली होती. गुंड-स्मगलरांच्या दुष्टाव्यामुळे एका सज्जन जोडप्याची ताटातूट होते. त्या संघर्षात त्यांची तीन मुलेसुद्धा दुरावतात. परंतु माणुसकीवर विश्वास असलेला भिन्न धर्मीय समाज त्यांना वाढवतो. परिस्थिती या तिघा भावांना वारंवार एकत्र आणत राहते. त्यांच्यात मैत्रीचा धागा गुंफते. आयुष्याच्या एका टप्प्यावर दुरावलेल्या आईवडलांचा त्यांना ठाव लागतो आणि सरतेशेवटी अमर-अकबर-अँथोनी नावाचे जिवाभावाची मैत्री असलेले हे ‘रक्ताचे भाऊ’ कुटुंबाची वाताहत घडवून आणणा-या दुष्टांचा नि:पात करतात, अशी या चित्रपटाची नाट्यमय कथा होती. त्यात सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक भान होते. प्रचारकी नव्हे, पण लक्षवेधी असा सामाजिक सलोख्याचा संदेशही होता. खरे तर रुपेरी पडद्यावर कथेच्या माध्यमातून हिंदू-मुस्लिम ऐक्याची गुंफण देसाईंइतकी क्वचितच कुणाला साधली होती. त्यांच्या त्यानंतर प्रदर्शित झालेल्या नसीब, कुली, मर्द आदी चित्रपटांतही मुस्लिम नायकाचा सांभाळ करणारी हिंदू आई किंवा हिंदू नायकाचा सांभाळ करणारे मुस्लिम वडील असा अनोखा नातेबंध प्रेक्षकांना बघायला मिळाला होता.

जिवाला जीव देणारे भिन्न धर्मीय मित्र ही तर त्यांच्या अनेक चित्रपटांची खासियतच होती. परंतु सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवणारे चित्रपट हे मनमोहन देसाईंचे जाणीवपूर्वक राजकीय चित्रभाष्य होते, की व्यावसायिक अपरिहार्यता; यावर आजही जाणकार-समीक्षकांमध्ये वाद होत असतात. मात्र यातील एकालाही हे वास्तव नाकारता येत नाही की, चित्रपटसृष्टीतील इतर कुणालाही (अगदी त्यांचे समकालीन रमेश सिप्पी, यश चोप्रा, प्रकाश मेहरा आदींनाही) देसाईंइतकी हिंदू-मुस्लिम ऐक्याची गुंफण त्या काळात साधलेली नव्हती. आजच्या घडीला डेव्हिड धवन, रोहित शेट्टी, प्रभुदेवा, संजय गढवी, मिलन लुथरिया, करण जोहर यांसारखे निर्माता-दिग्दर्शक देसाईंच्या चित्रपटांचा वारसा थोड्याफार फरकाने चालवत आहेत, मात्र यातही एखाद-दुसरा अपवाद वगळता क्वचितच कुणाला कथेच्या अनुषंगाने जातीय सलोख्याचे प्रतीक ठरतील, अशा व्यक्तिरेखा रुपेरी पडद्यावर आकारास आणता आलेल्या नाहीत. आता असेही म्हणता येते की, व्यवहाराच्या पातळीवर जाती-धर्मांत दुरावा राहिलाय कुठे? पण म्हणून दोन धर्मांतली तेढ पूर्णपणे संपलेली आहे. एकमेकांच्या मनातली किल्मिषे दूर झालेली आहेत, असेही ठामपणे म्हणता येत नाही. जनभावना भडकावण्याच्या खेळात पारंगत असलेल्या जातीयवादी पुढा-यांनी चालवलेला खेळ अद्यापही थांबलेला नाही. किंबहुना, 1992मध्ये झालेल्या बाबरी मशीद विध्वंसानंतरच्या मुंबईच्या जातीय दंगली, साखळी बॉम्बस्फोट, ग्रोधा दंगल आदी देशविघातक घटनांनंतर मूलतत्त्ववाद्यांच्या दहशतवादी कारवायांना खतपाणीच मिळाले आहे. कधी नव्हे ते देशाला सामाजिक ऐक्याची निकड जाणवू लागली आहे. परंतु आश्चर्य म्हणजे, या निकडीचे प्रतिबिंब हिंदी चित्रपटांत पडताना दिसत नाही. आताशा ‘थ्री इडियट्स’ किंवा ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ आदी चित्रपटांतून हिंदू-मुस्लिम धर्माचे प्रतिनिधित्व करणारे नायकमित्र दिसतात; परंतु मटेरिअलिस्टिक जगाने जोडलेले हे मित्र ऐक्याचे प्रतीक होऊन मनावर ठसत नाहीत. ते शक्यतो मैत्रीच्या आणाभाका घेत नाहीत. जिवाला जीव देण्याची भाषा करत नाहीत. जगाच्या अंतापर्यंत मैत्री टिकवण्याच्या शपथाही घेत नाहीत. दुर्दैवाने, हिंदुत्वाचा ज्वर देशभर चढून सामाजिक वीण उसवण्याचा प्रारंभकाळ हाच मनमोहन देसाईंचा व्यावसायिकदृष्ट्या पडता काळ होता. त्यांची कौटुंबिक पाळेमुळे असलेले गुजरात हे राज्य हिंदुत्वाची नवी प्रयोगशाळा बनू पाहत होते. एरवी, देसाई हे बहुसांस्कृतिक मूल्यांचा संस्कार झालेले खमक्या वृत्तीचे निर्माता-दिग्दर्शक होते. समजा, ते आज जिवंत असते आणि चित्रपटनिर्मितीची त्यांची उमेद कायम असती, तर जहाल हिंदू राष्ट्रवादाचा प्रसार-प्रचार करून समाजात दुहीची बीजे पेरत, स्वत:ला गर्वाने ‘हिंदू राष्ट्रवादी’ म्हणवून घेणा-या जातभाईंना त्यांनी आपल्या खास गुजरातीमिश्रित बम्बैया हिंदीत फटकारे मारले असते आणि वर्तमानातली गोष्ट सांगत सामाजिक सलोख्याचा संदेश देणारा आणखी एक ‘अमर अकबर अँथोनी’ तरुण पिढीला दिला असता... सिद्धार्थ भाटिया लिखित पुस्तकातले निर्मितीदरम्यानचे रंजक किस्से-प्रसंग वाचताना मनमोहन देसाईंसारखे प्रयत्न चित्रपटांच्या माध्यमातून आजच्या घडीला होत नसल्याची खंत वाचकमनाला जाणवलीच, तर समाजाचे आत्मभान पुरते गेलेले नाही, असेच म्हणता येईल!