आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘सुराज्य’ कर्ते शिवाजीराजे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


छत्रपती शिवरायांचे नाव ऐकताक्षणी आपल्याला आठवतात ती वीरश्रीपूर्ण लढायांची वर्णने, ते रोमहर्षक प्रसंग आणि एक भारलेला इतिहासकाल. मध्ययुगीन काळात भारतात संपत्ती निर्माणाची फार थोडी साधने होती. त्यातील मुख्य शेती, कलाकुसर आणि शेवटी ‘व्यापार’! महाराष्‍ट्रात आपल्या दुर्दैवाने शेतीला सुयोग्य जमीन फार थोडी होती, कारागीर व कुशल कामगार महाराष्‍ट्रात फार नव्हते. आपल्या डोंगराळ भागात फार थोडे क्षेत्र लागवडीखाली होते आणि सिंचनाची काही विशेष व्यवस्था नव्हतीच. त्यातून राज्यकर्ते परकीय असल्याने येथील स्थानिक लोकांना, मग ते कोणत्याही धर्माचे असोत; त्यांची पिळवणूक करून स्वत:ची तिजोरी भरण्यात गुंग असत. त्यांना जनतेच्या भल्याचे काहीही पडलेले नसे. प्रजेवर करांचे प्रमाण अपरिमित ठेवलेले असे. 60 टक्के असे हे कराचे प्रमाण होते! आणि हे प्रमाण शिवाजी महाराजांच्या वेळेपर्यंतदेखील काही कमी झालेले नव्हते.

अशा परिस्थितीत शेतक-यांची अवस्था अतिशय बिकट असे.शिवाय सतत होणा-या लढाया, अधूनमधून पडणारे अवर्षण या सगळ्या कारणांनी शेती करणे बहुतेकांनी सोडून दिले होते व ते मोलमजुरी किंवा सैन्याच्या बरोबर काही हलकीसलकी कामे करून कसेबसे दिवस काढत. त्यामुळे महाराजांना मिळालेल्या पुणे जहागिरीत प्रचंड जमीन पडीक होती. त्या जमिनीत काहीही उत्पन्न नव्हते. पण आदिलशहाच्या दरबारी मात्र ही जमीन उत्तम प्रतीची म्हणून नोंद होती. हा सुलतानाचा आणखी एक कावा असे. सरदारांच्या सैन्याच्या सरंजामाच्या खर्चासाठी म्हणून अशी जहागीर दिली जाई आणि तिच्या उत्पन्नातून सैन्य बाळगावे अशी तरतूद केलेली होती. अर्थात हे उत्पन्न कमी पडे (कारण प्रत्यक्षात ही ‘उत्तम’ जमीन पडीकच असे.) मग या सरदारांपुढे दोनच मार्ग होते, एक तर आपल्या वतनदारांकरवी प्रजेवर जुलूम करून त्यांना पिळून हे उत्पन्न काढायचे, नाही तर प्रत्यक्षात अर्धीच फौज ठेवायची व युद्धाच्या वेळेला खोगीरभरती करून बुणग्यांची भरती करायची. (म्हणजे नुकत्याच झालेल्या ‘पटपडताळणी’ची आपल्याला आठवण होईल!) या दोन्ही प्रकारांत सर्वसामान्य प्रजेला फक्त यातना आणि दुख:द जिणे नशिबी असे.
शिवाजी महाराजांनी ही परिस्थिती स्वत:च्या डोळ्यांनी बघितली. त्यांनी आपल्या सहका-यांशी विचारविनिमय करून एक योजना तयार करून आपल्या प्रजाजनांना समजावली. या प्रश्नाचे मूळ राज्यकर्त्यांच्या बेफिकिरीत होते. ते परकीय होते व त्यांच्या लेखी स्थानीय प्रजेच्या सुखाला काहीही स्थान नव्हते. त्यामुळे आपले स्वत:चे राज्य असल्याशिवाय प्रजेचे सुख अशक्य आहे, ही महाराजांची धारणा झाली. याचे पहिले पाऊल म्हणजे, राज्य आणि प्रजाजन समृद्धीकडे चालू लागणे महत्त्वाचे होते. त्यासाठी पहिले म्हणजे राज्याच्या जमिनीची प्रत सुधारणे आणि शेतक-यांना पुन्हा कामावर आणून गाव आणि समाज नांदता करणे.यासाठी त्यांनी प्रजेला अशी योजना दिली की प्रजेने पडीक जमीन लागवडीखाली आणली तर त्यांना पाच वर्षे सारा माफ आणि त्यानंतर फक्त 30 टक्के कर लागेल. (हा कर सुलतानाच्या 60%च्या अर्धा होता).

शिवाय जमीन सुधारण्यासाठी लागेल ती मदत; जसे बियाणे, पाण्याचे पाट, खते, अवजारे, बैल इ. सगळे त्यांना सरकारातून मिळेल आणि त्याची किंमत तगाई कर्ज म्हणून बिनव्याजी दिली जाईल. हे कर्ज शेतक-यांनी पुढच्या पाच वर्षांत फेडायचे असे. सारा माफ असल्याने हे कर्ज फेडूनसुद्धा शेतक-याच्या हाती थोडा पैसा शिल्लक राही. पाच वर्षे संपल्यावर शेतक-या जवळ उत्तम प्रतीची जमीन आणि फक्त 30% कर अशी स्थिती होई. ही स्थिती सुलतानाच्या राज्यापेक्षा शतपटीने चांगली होती. असे पैसे हाती राहू लागल्यावर प्रजा ते स्वत:चे राहणीमान सुधारण्यासाठी वापरू लागली. त्यामुळे बलुतेदार; जसे सुतार, चांभार, कोष्टी, सोनार या सगळ्यांना काम मिळू लागले. असे सगळे गाव उभे राहू लागले आणि प्रजा अधिकाधिक सुखी होऊ लागली. महाराजांनी वसुलीची कामे पगारी नोकर ठेवून करण्यास सुरुवात केली. मध्ययुगात ही एक क्रांतीच झाली. कारण पगारी नोकर नेमल्यामुळे वंशपरंपरागत वसुलीची संधी संपली. नोकर त्याच्या कामाच्या दर्जासाठी त्याच्या वरिष्ठांना जबाबदार राहू लागला आणि त्याने काही जुलूम केल्यास त्याच्याविरुद्ध सरकारात दाद मागण्याची सोय झाल्याने अशा बेजबाबदार आणि जुलमी नोकरांवर अंकुश बसला. त्यांना प्रसंगी कडक शिक्षा ठोठावली जाई. अशी ही जबाबदार मुलकी सेवा होती.या सगळ्या सुधारणांमुळे प्रजेला हे ‘सुराज्य’ आल्याचे जाणवू लागले.

विशेष म्हणजे आधीच्या आदिलशाही राज्याच्या वेळेस देशोधडीला लागलेल्या प्रजेने परत येऊन गावे पुन्हा वसवण्यास सुरुवात केली. शिवाय एकूण लागवडीखाली आलेली जमीन जास्त वाढल्याने राज्याचे उत्पन्न वाढून खजिना भरायला लागला. जमीन सुधारणेशिवाय राज्याचा महसूल वाढवण्याचा दुसरा मार्ग म्हणजे व्यापारावरील कर! पण त्यासाठी राज्यात व्यापार वाढला पाहिजे, वर्षानुवर्षे पिचत पडलेली जनता व्यापार करणेच विसरून गेली आहे, हे राजांनी जाणले होते. त्यामुळे राजे जेव्हा सुरतेस गेले होते तेव्हा तेथील काही व्यापा-यांना त्यांनी मुद्दाम कौल देऊन महाराष्‍ट्रात बोलावले. त्यांना असेही सांगितले की माझ्या राज्यात तुम्ही सुरक्षित राहाल, मोगलाईत नव्हे! त्यातील काही कुटुंबे म्हणजे बुटाला, मेहता, कचरे, तलाठी, कोटिया, शहा इ. होत. त्यापैकी एक बुटाला कुटुंब महाड व आजूबाजूच्या लाटवण आणि मोटवण या दोन गावांत स्थायिक झाले. रायगडावरसुद्धा बाजारपेठ वसवताना राजांनी शेट्टी लोकांना मुद्दाम बोलावून कौल दिल्याचे उल्लेख आहेत. ‘साहुकार हे तो राज्याचे भूषण होत’ असे महाराजांनी अशा व्यापा-यांबद्दल म्हटले आहे. असा व्यापार वाढवून राज्याचे अर्थयंत्र महाराजांनी मजबूत केले.

याशिवाय परदेशी वकिलातीबरोबर महाराजांनी फार दूरदर्शीपणाने व्यवहार करून राज्याला समृद्धी प्राप्त करून दिली. दक्षिण दिग्विजयाच्या वेळी महाराजांनी जिंजी येथे आपल्या दरबारी सगळ्या पूर्व किना-या वरच्या वकिलांना (यात डच, फ्रेंच, इंग्रज, पोर्तुगीज असे सगळे आले) बोलावले आणि त्यांना सक्त ताकीद दिली की यापुढे इथल्या स्थानिक जमीनदार, नवाब यांच्याशी तुम्ही स्वतंत्र पत्रव्यवहार किंवा बोलणी करायची नाहीत. सगळी बोलणी, करार आदी आमच्या मुख्य सरकारी अधिका-यांशीच होतील. तसेच यापूर्वी युरोपियन व्यापारी पूर्व किना-यांवर सर्रास भारतीय प्रजेची गुलाम म्हणून निर्यात करत. महाराजांनी एका हुकमाद्वारे या गुलामांच्या व्यापारास बंदी घातली आणि उल्लंघन केल्यास कठोर शासन करण्याची धमकी दिली! (अब्राहम लिंकनच्या कितीतरी वर्षे आधी!!) मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धात जिंजीकडून आलेल्या या खजिन्याची मराठी राज्यास खूपच मदत झाली. यानंतर केवळ दोन वर्षांनी मराठ्यांची दोन मालवाहू जहाजे व्यापारासाठी मलाक्का सामुद्रधुनीत (म्हणजे आताच्या सिंगापूरजवळ!) गेल्याची नोंद आहे! हे त्या काळातील ग्लोबलायझेशन! स्वराज्य आले तर अशी पावले उचलायला लागतात आणि त्यासाठी देशभक्तीचा झरा राज्यकर्त्यांच्या मनात सतत वाहता असावा लागतो. राज्याचे आणि प्रजेचे ज्या ज्या मार्गाने हित शक्य असेल त्या त्या सर्व मार्गाने ते करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, ही जाणीव सतत असावी लागते. स्वराज्य स्वराज्य असे नुसते घोकून माणसांना राज्याविषयी आपलेपणा वाटत नाही, तर त्यांचे जगणे अधिक सुखावह आणि सुरक्षित झाले तरच प्रजेच्या मनात राज्याविषयी प्रेम उत्पन्न होते, हे त्या ‘जाणत्या’ राजाने ओळखले होते, ते जेव्हा राज्यकर्ते ओळखून त्याप्रमाणे वागतात तेव्हाच राष्‍ट्रमोठे होते!

rcrnene@gmail.com