आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Senior Journalist Nikhil Wagle About Pathankot Terror Attack, Divya Marathi

पठाणकोट हल्ल्याचा धडा (निखिल वागळे)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पठाणकोटच्या दहशतवादी हल्ल्याने आपले सगळ्यांचेच डोळे उघडायला हरकत नाही. पाकिस्तानबरोबरचे भारताचे संबंध ही इतकी गुंतागुंतीची गोष्ट आहे की तिला सरळसोट उत्तर असूच शकत नाही हे या हल्ल्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अफगाणिस्तानातून परतताना अचानकपणे पाकिस्तानात जाऊन पंतप्रधान नवाझ शरीफ यांची त्यांच्या वाढदिवशी गळाभेट घेतली होती. तिला आठवडाभरही झाला नाही तोच दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आहे. हे दहशतवादी जैश-ए-मोहंमद या संघटनेचे असल्याचं सांगितलं जात आहे. ही तीच संघटना आहे, जिच्या प्रमुख नेत्याला - मौलाना मसूद अझरला घेऊन वाजपेयी मंत्रिमंडळातले परराष्ट्रमंत्री जसवंतसिंग काबूलला गेले होते. त्यानंतर अनेक वर्षं हा मौलाना मसूद आणि त्याची संघटना तुलनात्मकदृष्ट्या शांत राहिली. पण गेल्या वर्षीपासून मसूद कामाला लागल्याच्या बातम्या आहेत. पठाणकोटच्या हल्ल्याने जैश-ए-मोहंमदने पुन्हा आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आहे.

दहशतवादी संघटनांत नेहमीच स्पर्धा असते. त्यामागे राजकारण आहे आणि अर्थकारण आहे. अशी स्पर्धा जैश-ए-मोहंमद आणि लष्कर-ए-तोयबामध्ये आहे. लष्कर-ए-तोयबाला पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तहेर संघटना आयएसआयचा पाठिंबा असल्याचं वारंवार सिद्ध झालं आहे. तसा तो जैश-ए-मोहंमदला या क्षणी आहे की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण पाकिस्तानी लष्करात अनेक गट आहेत. यापैकी एखादा गट जैश-ए-मोहंमदला खतपाणी घालत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा अर्थ असा की, पठाणकोटच्या दहशतवादी हल्ल्यामागची मूळ प्रेरणा कुठेतरी पाकिस्तानी लष्कर किंवा आयएसआयकडूनच येते असा होतो. अशा परिस्थितीत नरेंद्र मोदी आणि नवाझ शरीफ यांनी प्रेमालिंगन दिल्याने नेमकं काय साधणार? नवाझ शरीफ यांचं पाक लष्करावर कोणतंही नियंत्रण नाही हे वाजपेयी सरकारच्या काळातच सिद्ध झालं होतं. म्हणूनच पंतप्रधान वाजपेयींनी लाहोरला भेट दिल्यानंतर कारगिलचा हल्ला घडला होता. त्या वेळी मुशर्रफ पाकिस्तानचे लष्करप्रमुख होते आणि त्यांनी पुढे नवाझ शरीफ यांची काय दशा केली हे सगळ्यांना ठाऊक आहे. आजही पंतप्रधान नवाझ शरीफ यांना भारताशी कितीही मैत्री हवी असली तरी पाक लष्कर किंवा आयएसआयला डावलून त्यांना पुढे जाता येणार नाही.
भारताच्या दृष्टीने सगळ्यात चिंतेची गोष्ट म्हणजे या हल्ल्याने पुन्हा एकदा भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या दक्षतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पठाणकोटमध्ये अतिरेक्यांनी नागरी वस्तीवर हल्ला केलेला नाही. हा भारतीय हवाई दलाचा अत्यंत महत्त्वाचा असा लष्करी तळ आहे.

चारही बाजूला कडेकोट बंदोबस्त असताना जैश-ए-मोहंमदचे अतिरेकी इथे घुसलेच कसे, हा खरा प्रश्न आहे. या अतिरेक्यांनी हल्ला करण्यासाठी पठाणकोटची निवड केली यातच त्यांचा हेतू स्पष्ट होतो. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारचा हल्ला मोदी-शरीफ भेटीनंतर होऊ शकतो याची जाणीव गुप्तहेर यंत्रणांना होती आणि त्यांनी सुरक्षा यंत्रणेला तशी माहितीही दिली होती. भारत-पाकमधला कोणताही संवाद दहशतवाद्यांना आणि त्यांना वापरणाऱ्या पाकमधल्या कोणत्याही शक्तींना मंजूर नाही. त्यामुळे बोलणी झाल्यावर दहशतवादी असा उपद्व्याप करतील अशी भीती तज्ज्ञांनीही व्यक्त केली होती. तरीसुद्धा भारतीय सुरक्षा यंत्रणा गाफील राहिल्या हे धक्कादायक आहे. पठाणकोटजवळ असलेल्या घनदाट जंगलातून हे अतिरेकी घुसले. आपल्या पूर्वतयारीसाठी त्यांनी हल्ल्यापूर्वी जी कृत्यं केली त्यावरून तरी पंजाब पोलिस किंवा लष्कराने सावध व्हायला हवं होतं. या अतिरेक्यांनी एका टॅक्सी ड्रायव्हरचा खून केला आणि त्याच टॅक्सीतून सुपरिटेंडंट ऑफ पोलिस सलविंदरसिंग, त्यांचा आचारी मदन गोपाळ आणि मित्र राजेश वर्मा यांचं आदल्या दिवशी अपहरण केलं होतं. तिथून सलविंदरसिंग आणि मदन गोपाळ पळून आले आणि त्यांनी पंजाब पोलिसांना ही माहिती दिली. पण पोलिसांनी आपल्याच वरिष्ठ अधिकाऱ्यावर विश्वास ठेवला नाही, उलट या दोघांवर संशय घेतला आणि मारहाण केली, असा आरोप गोपाळ यांनी केला आहे.

पंजाब पोलिस सावध असते तर हा अनर्थ कदाचित टळू शकला असता. अतिरेक्यांविरुद्धची कारवाई सुरू झाल्यावरही सुरक्षा यंत्रणांमध्ये कोणताही ताळमेळ नव्हता. लष्करी अधिकारी, नॅशनल सिक्युरिटी गार्ड््सचे कमांडर यांना अनेक तास नेमके कुणाचे हुकूम आपण स्वीकारायचे आहेत हे कळत नव्हतं. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या सगळ्या कारवाईवर लक्ष ठेवून होते, पण त्यांनाही हा गोंधळ टाळता आला नाही. म्हणूनच कदाचित ही कारवाई लांबल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यात रविवारी गृहमंत्री राजनाथसिंह यांनी कारवाई यशस्वी झाल्याची घोषणा करून गोंधळात भर टाकली. मग वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना कारवाई संपली नसल्याचा खुलासा करावा लागला. ही सगळी अनागोंदी पाहून दहशतवादी आणि त्यांचे पाकिस्तानातले बाप हसत असतील यात शंका नाही.

पठाणकोटच्या हल्ल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सगळ्या भक्तांनाही धडा दिला आहे. विरोधी पक्षात असताना ही मंडळी या मुद्द्यावरून त्या वेळचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावर तुटून पडत होती. बोलणी बंद करून पाकला धडा शिकवला पाहिजे, अशा गगनभेदी घोषणा मोदींनी निवडणूक प्रचाराच्या काळात केल्या होत्या. पण पठाणकोटच्या हल्ल्यानंतर हेच मोदी मूग गिळून गप्प बसलेले दिसतात. पठाणकोटमध्ये लष्करी कारवाई चालू असताना मोदी योगासनांचे धडे देत असल्याबद्दल त्यांच्यावर प्रखर टीकाही झाली आहे.

विशेष म्हणजे एवढा मोठा हल्ला होऊनही पाकिस्तानशी संबंध तोडण्याची भाषा पंतप्रधान मोदी, भारत सरकार किंवा त्यांचे आंधळे भक्त करताना दिसत नाहीत. सत्ता भल्याभल्यांना वठणीवर आणते असं म्हणतात. त्यातलाच हा प्रकार म्हणावा लागेल. भारत-पाक संबंध सुधारायचे असतील तर बोलणी बंद करून चालणार नाही, पाकिस्तानातल्या लोकशाही शक्ती बळकट केल्या पाहिजेत असं आता भाजपचेच नेते म्हणू लागले आहेत. मग मनमोहनसिंग यापेक्षा वेगळं काय म्हणत होते? त्यांची चेष्टा का करण्यात आली? त्यांना भेकड का ठरवण्यात आलं? पठाणकोटचा हल्ल्याची कारवाई संपल्यानंतर राजकारण बाजूला ठेवून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील. आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे केवळ घोषणाबाजी किंवा धक्कातंत्र नव्हे हे आता नरेंद्र मोदींच्या लक्षात आलंच असेल!
(nikhil.wagle23@gmail.com)