आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपण असेच होतो!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘देश बदल रहा है,’ असं म्हणत असताना आपण अजूनही गोमांस, ‘उडता पंजाब’, खडसे, राज्यसभा निवडणुकीतील भ्रष्टाचार, विद्वेष अशा मुद्द्यांवरच गुंतून पडलो आहोत. जग आपल्याला ओलांडून जात आहे याची दखलही आपल्याला घ्यावीशी वाटताना दिसत नाही.
जग बदलतंय. अगदी विलक्षण झपाट्यानं बदलतंय. मात्र, ‘देशबदल रहा है’ अशा घोषवाक्याचा गजर होत असला तरी आपण खरंच बदलतोय काय?

हा प्रश्न पडला आहे तो अलीकडंच स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या एका सार्वमतामुळं.
देशातील प्रत्येक नागरिकाला दैनंदिन गरज भागवता येण्याएवढं मूलभूत किमान वेतन सरकारनं द्यावं काय, या प्रश्नावर हे सार्वमत घेण्यात आलं होतं. बहुसंख्य स्विस नागरिकांनी हा प्रस्ताव नाकारला. पण हा मुद्दा फक्त स्वित्झर्लंडमध्येच चर्चेला आला आहे असंही नाही. अनेक युरोपीय देशांत या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. याचा अर्थ अशा देशांत सर्वांनाच किमान मूलभूत वेतन मिळावं हा विचार आता प्रमाण मानला जात आहे आणि एक प्रकारे मार्क्सपासून जे सारे डावे पुरोगामी विचारवंत सांगत आले आहेत तेच अखेरीस मान्य करण्याकडं जगाचा कल होत आहे असा अर्थ लावला जाण्याची शक्यता आहे. निदान आपल्या देशातील डावी पुरोगामी मंडळी अशा निष्कर्षापर्यंत येऊ शकतात. अर्थात, या मुद्द्याभोवती सुरू असलेली सगळी चर्चा या मंडळींपर्यंत येऊन पोहोचली आहे की नाही हे कळायला मार्ग नाही.

मात्र, पाश्चिमात्य विकसित देशांत हा मुद्दा चर्चेला आला आहे, तो जग आता चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर उभं आहे याची जाणीव झाल्यामुळंच. वाफेचं इंजिन शोधलं जाऊन यांत्रिकी उत्पादनाला सुरुवात झाली ती १८ व्या शतकाच्या अखेरच्या दोन दशकांत. नंतर १९व्या शतकाच्या शेवटच्या तीन दशकांत वीजनिर्मिती आणि कामगारांचा योग्य वापर करून प्रचंड उत्पादन घेण्यास सुरुवात झाली. हा होता दुसरा टप्पा. पुढं २० व्या शतकाच्या अखेरीच्या तीन दशकांत इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान स्वयंचलित उत्पादन व्यवस्थेकडं विकसित जग वळलं. आता येत्या दोन ते अडीच दशकात माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीच्या वेगाला जोड मिळणार आहे ती रोबोट कृत्रिम बुद्धिमत्ता या दोन क्षेत्रांत होणाऱ्या घडामोडींमुळे. त्यामुळं स्वयंचलित उत्पादन व्यवस्थेला एक नवं परिमाण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे परिमाण असेल ते मानवरहित उत्पादन व्यवस्थेचं. हे जेव्हा घडू लागेल तेव्हा ‘नोकऱ्या’ ‘रोजगार’ यांची गरजच कमी होत जाईल. त्याच वेळेस वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनानं नवा टप्पा गाठण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. हा टप्पा आहे माणसाचे सर्व अवयव ‘कृत्रिमरीत्या’ प्रयोगशाळेत बनवण्याचा आणि माणसाचं आयुष्य शंभरीच्या पलीकडं नेण्याचा.

चौथ्या औद्योगिक क्रांतीचं आणि वैद्यकीय क्षेत्रातील या अशा संशोधनाचं हे वर्णन आज अचंबित करणार वाटतं आणि माणसाचं माणूसपणच हरवलं गेलं तर काय होईल, असा भयावह प्रश्नही मनात येऊ शकतो. अर्थात, निसर्गाप्रती मानवानं इतका हस्तक्षेप करावा काय आणि त्याचे जे परिणाम होतील त्याला तोंड कसं द्यायचं याचा विचार तरी करायचा की नाही, असा प्रश्नही विचारला जात आहे. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता हा मानवी अस्तित्वाला धोका ठरू शकते, असं मत स्टीफन हॉकिंगसारख्या प्रज्ञावंत शास्त्रज्ञानं मध्यंतरी व्यक्त केलं होतंच. त्यावरून बरीच उलटसुलट चर्चाही घडली. पण हॉकिंग यांना असं उघडपणं बोलावसं वाटलं त्याचं कारण काय घडत आहे आणि प्रगती कशी कोणत्या दिशेनं होत आहे याची पुरी कल्पना त्यांना असल्यानंच अशा धोक्याचा इशारा दिला होता.

असं सगळं वर्णन करण्याचा उद्देश जग किती कसं बदलत आहे आणि त्याला अनुसरून राज्य संस्था, राजकीय सामाजिक व्यवस्था यात परिवर्तन घडवून आणण्याच्या दिशेनं कसा किती विचार चालू आहे हे सांगण्याचा आहे.

उलट ‘देश बदल रहा है,’ असं म्हणत असताना आपण अजूनही गोमांस, ‘उडता पंजाब’, खडसे, राज्यसभा निवडणुकीतील भ्रष्टाचार, विद्वेष अशा मुद्द्यांवरच गुंतून पडलो आहोत. जग आपल्याला ओलांडून जात आहे याची दखलही आपल्याला घ्यावीशी वाटताना दिसत नाही.
...कारण औद्यागिकीकरणाच्या आधीच्या तीन टप्प्यांतही जग असंच ओलांडून आपल्या पुढं गेलं आणि या बदलांनी आपल्याला वेढलं तेव्हा आपण जागे झालो. त्यामुळंच औद्योगिकीकरण त्यानंतरच्या प्रगतीत मनोभूमिकेत बदल होऊन ती नवविचारांच्या चौकटीत प्रगल्भ बनण्याची जी प्रक्रिया घडते ती आपल्या देशात झालेलीच नाही. आपण या ‘प्रगती’नं निर्माण केलेली ‘उपकरणं’ वापरत राहिलो आहोत, पण सरंजामी चौकटीतच विचार करीत राहण्याची सवय आपण सोडलेली नाही. औद्योगिक क्रांतीनं आणलेला अचूकपणा, कर्तव्यनिष्ठा, कार्यसंस्कृती, प्रामाणिकपणा, सचोटी इत्यादी मूल्यं आपल्या समाजव्यवस्थेत पूर्वी कधी नव्हतीच. औद्योगिक क्रांती झालेल्या देशातून आलेल्या ब्रिटिशांबरोबर ही मूल्यं येथे आली. ती आपल्या देशातील एक-दोन पिढ्यांनी अंगीकारली. पण ती समाजात रुजली नाहीत. परिणामी आज आपल्याला ‘खडसे’ दिसतात, तसंच ‘भुजबळ’ही आढळतात. राज्यघटना स्वातंत्र्याची ग्वाही देते, पण ‘उडता पंजाब’ घडतच असतो.

खरं सांगायचं तर पूर्वापार आपण असेच होतो. जेव्हा जेव्हा ‘परकीयां’च्या संपर्कात आलो तेव्हा आपण त्यांच्याकडून काही घेतलं. गेल्या दोन हजार वर्षांचा इतिहास याला साक्ष आहे. ब्रिटिश गेले. आपण स्वतंत्र झालो. आता नवे कोणी ‘परकीय’ येणार नाहीत. येईल ते परकीय भांडवल तंत्रज्ञान. ‘मोबाइल’, ‘डिजिटल इंडिया’ ही त्याची काही रूपं आहेत. पण हे तंत्रज्ञान भांडवल येतं त्यामागं मूल्यव्यवस्था असते. ती मूल्यं आपण कुठं स्वीकारत आहोत?

आजची अनागोंदी अराजकसदृश परिस्थिती उद््भवण्यामागचं हे कारण आहे. त्यावर उत्तर शोधायचं असल्यास ‘आपण असेच होतो’ हे ‘डिजिटली’ जगाशी जोडलं जात असतानाही आधी समजून घ्यावं लागेल.
(prakaaaa@gmail.com)
बातम्या आणखी आहेत...