आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीनदुबळ्यांच्या शैलाभाभी !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तरल मनाच्या कवयित्री, मनस्विनी, मानवलोक प्रकल्पाच्या आधारस्तंभ असलेल्या डॉ. शैला लोहिया यांचे वडील अ‍ॅड. शंकरराव परांजपे हे समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते होते. गोवा मुक्तिसंग्रामात आणि सत्याग्रहात त्यांनी सहभाग घेतला होता. तर आई शकुंतला परांजपे या साने गुरुजी यांच्या विचाराने प्रभावित होऊन राष्ट्र सेवा दल आणि हरिजन सेवा संघाच्या कार्यकर्त्या म्हणून सुपरिचित होत्या. आई-वडिलांचे संस्कार अनाहूतपणे शैला परांजपे यांच्या व्यक्तिमत्त्वावर झाले. त्यामुळेच की काय, राष्ट्र सेवा दलाच्या कला पथकामध्ये तसेच महाराष्ट्र दर्शन आदी सांस्कृतिक प्रबोधनपर कार्यक्रमात शैलाभाभींनी सक्रिय सहभाग नोंदवला. याच संस्कारातून त्यांच्यातील लेखिका आणि बंडखोर
कवयित्री समोर आली.

1962 मध्ये डॉ. द्वारकादास लोहिया यांच्याशी आंतरजातीय विवाह करून शैला परांजपे या शैला लोहिया झाल्या. तो काळ महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतरच्या चळवळीचा, विकासात्मक वाटचालीचा होता. त्या काळी लोहिया दांपत्य अंबाजोगाईत स्थायिक झाले. 1968 ते 1971 दरम्यान दुष्काळाच्या एक वर्ष आधीच डॉ.द्वारकादास लोहिया यांनी परिसरातील ग्रामीण भागाशी संपर्क वाढवला. दुष्काळामुळे मराठवाड्यातील ग्रामीण भागाच्या लोकांनी मुंबई, पुणे गाठून स्थलांतर केले. या काळात आणि 1972 च्या दुष्काळात लोहिया दांपत्याने दुष्काळग्रस्तांचे प्रश्न समजावून घेऊन मदतीचे आणि लोकांच्या पुनर्वसनासाठीचे काम केले. शैलाभाभींनी यादरम्यान योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या स्वामी रामानंद तीर्थ कला व वाणिज्य महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून काम सुरू केले होते, तर डॉ. द्वारकादास लोहिया यांनी रुग्णालयाच्या माध्यमातून ग्रामीण जनतेला आरोग्याच्या सोयीसुविधा तत्परतेने उपलब्ध करून दिल्या होत्या.

या कालावधीत समाजमनावर डॉ. लोहिया यांचे गारूड पडले. तरुणांनी त्यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने केली. आता खर्‍या अर्थाने सामाजिक क्षेत्रात डॉ. द्वारकादास तर साहित्य क्षेत्रात शैलाभाभी या उभयतांची ओळख निर्माण झाली. 1974 मध्ये आपला अतिशय चांगल्या पद्धतीने चालणारा दवाखाना डॉ. लोहिया यांनी हडपसर पुणे येथील साने गुरुजी रुग्णालयास देऊन टाकला व ते सामाजिक कार्यात सक्रिय झाले. 1975 मध्ये आणीबाणीत डॉ. लोहिया यांना अटक झाली. या 19 महिन्यांच्या काळात सर्वसामान्य माणसांशी असलेली नाळ शैलाभाभींनी तुटू दिली नाही. राष्ट्र सेवा दल, लोकनायक जयप्रकाश नारायण आणि समाजवादी विचारांच्या युवकांनी मिळून 1982 मध्ये मराठवाडा नवनिर्माण लोकायत (अर्थात) मानवलोक या संस्थेची स्थापना करून काम सुरू केले. या संस्थेच्या स्थापनेत शैलाभाभींची महत्त्वाची भूमिका राहिली. निराधार, परित्यक्ता, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी भाभींनी पुढाकार घेतला. त्यांच्या या प्रयत्नातून 1984 मध्ये मनस्विनी महिला प्रकल्प ही मानवलोकचीच एक शाखा सुरू करण्यात आली. या संस्थेत स्वयंसेवी वृत्तीने भाभींनी काम पाहिले. आणीबाणीत साने गुरुजी रुग्णालयाची धुरा सांभाळली. कौटुंबिक जबाबदार्‍या सक्षमपणे पार पाडल्या. हे एकीकडे सुरू होते. याच काळात त्यांनी एम.ए., पीएच.डी. आणि संगीत विशारद पूर्ण केले. धर्म, मानवता आणि जात भारतीय मानणार्‍या भाभींनी जर्मनी, इंडो-कॅनेडियन, कोलंबिया विद्यापीठ, बीजिंग (चीन), नेपाळ आदी देशांचे अभ्यासदौरे करून त्या त्या ठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदांमधून भारतीय स्त्रीविषयक जाणिवा समृद्ध करणारे शोधप्रबंध आणि निबंधवाचन केले. नवसाक्षरांसाठी साहित्य निर्मिती केली. महाराष्ट्रातील आघाडीची वर्तमानपत्रे, नियतकालिके, ज्यात बायजा, मेनका, मिळून सार्‍या जणी, माहेर आणि साहित्यविषयक प्रतिष्ठान इत्यादींमधून कसदार लेखन केले. लोकसाहित्यावर विशेष स्नेह ठेवून असणार्‍या भाभींनी ‘भूमी आणि स्त्री’ या विषयावर पीएच.डी. चा प्रबंध लिहिला. याच काळात 2010 मध्ये ‘तिच्या डायरीची पाने’ या कथासंग्रहाला महाराष्ट्रभर वाचकवर्ग मिळाला. राज्य, राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारांमुळे शैलाभाभींना कधीही ‘ग’ची बाधा झाली नाही. सामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी भाभी कायमच जमिनीशी नाते घट्ट करून राहिल्या.

ज्या काळात आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणे हे फार मोठे धाडस समजले जायचे, ते धाडस भाभींनी संस्कारांच्या मुशीतून मिळालेल्या बळामुळेच दाखवले. विवाहापूर्वी डॉ. द्वारकादास लोहिया आणि शैलाभाभींनी अलिखित करार केला. हा करार म्हणजे भाभींनी शैक्षणिक क्षेत्रात राहून नोकरी करीत अर्थार्जन करायचे, तर डॉ. लोहिया यांनी सामाजिक क्षेत्रात राहून समाजाची सेवा करायची. हेच व्रत घेऊन भाभी अखेरपर्यंत जगल्या. स्वत:मधील कुटुंबवत्सल आई, पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी पत्नी, बंडखोर कवयित्री, सृजनशील मनाची शिक्षिका इत्यादी भूमिका ‘तिच्या डायरी’तून उभ्या राहिल्या.
(‘मानवलोक’ संस्थेकडून साभार)