आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shankaracharya Swarupanand And Sai Baba Controversy

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुका म्हणे ऐसे, मावेचे मर्इंद.. (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साईबाबांना देव मानू नका, या स्वरूपानंद सरस्वतींच्या म्हणण्याशी स्वत: साईबाबा शंभर टक्के सहमत झाले असते. साईबाबा देव नव्हते, पण संत खचितच होते आणि संत हे देवाचे अंश असल्यामुळे संतत्वाभोवती गर्दी जमा होत असते.

द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी शिर्डीच्या साईबाबांबद्दल वक्तव्य करून अनावश्यक धुरळा उडवून दिला आहे. द्वारकापीठ हे मान्यवर पीठ आहे व स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय भाग घेणार्‍या स्वरूपानंद सरस्वती यांचा अधिकारही मोठा आहे. यामुळे त्यांच्याबद्दल अधिक-उणे लिहिणे हे मनाला आनंद देणारे नाही. तरीही काही वेळा ज्येष्ठांनाही चार शब्द सांगावे लागतात. स्वरूपानंदांचे साईबाबांबद्दलचे वक्तव्य केवळ अनाठायी नाही, तर संतांच्या शिकवणीने भारतीय मानसात रुजविलेल्या उदार, व्यापक व सर्वसमावेशक दृष्टिकोनाशी विसंगत आहे. हिंदू धर्म कोणत्याही पीठाच्या अधीन नसला तरी पीठाधीशांबद्दल आदराची भावना असते. ज्यांचे नाव घेऊन ही पीठे चालविली जातात ते आदि शंकराचार्य हे वाद घालण्यात निपुण होते. मात्र, वाद आणि वितंडवाद यांमध्ये फरक असतो. आदि शंकराचार्य हे तत्त्वचर्चेतील खंडन-मंडणासाठी प्रसिद्ध होते, कोणाच्या कानशिलात लगावण्यासाठी नाही. मूळ आचार्यांची खंडन-मंडणाची परंपरा आता लोप पावली असून अधिकाराचे वाद, दुरभिमान, राजकारण व अर्थकारण यासाठी आचार्यांची पीठे लक्षात राहू लागली आहेत. पीठाधीश आचार्यांकडून खंडन-मंडण अपेक्षित आहे, वादग्रस्तता नव्हे. स्वरूपानंद सरस्वती यांच्या वक्तव्याचे दोन भाग होतात. साईबाबांना बहाल करण्यात आलेले देवत्व आणि त्या देवत्वाभोवती उभारण्यात आलेले अवडंबर या दोन्हींवर स्वरूपानंद सरस्वती यांनी आक्षेप घेतला आहे. याशिवाय ‘सबका मालिक एक’ या साईबाबांच्या उक्तीवरही त्यांनी टीका केली. यापैकी साईबाबांना देवत्व देऊन त्याभोवती जो पसारा गेल्या पंचवीस वर्षांत उभा राहिला आहे, त्यावर आक्षेप घेण्यात गैर काही नाही. साईबाबा आज अस्तित्वात असते तर त्यांना हा पसारा नक्कीच पसंत पडला नसता. उपाधीचा वीट येणे हे संतांचे प्रमुख लक्षण आहे व साईबाबांमध्ये ते लक्षण होते, असा प्रत्यय त्यांच्या चरित्रात ठायीठायी येतो. साईबाबांना देव मानू नका, या स्वरूपानंद सरस्वतींच्या म्हणण्याशी स्वत: साईबाबा शंभर टक्के सहमत झाले असते. साईबाबा देव नव्हते, पण संत खचितच होते आणि संत हे देवाचे अंश असल्यामुळे संतत्वाभोवती गर्दी जमा होत असते. साईबाबांचे देव्हारे माजविण्याच्या वृत्तीबद्दल स्वरूपानंद सरस्वती यांनी टीका केलेली नाही, तर शिर्डीत जमा होणार्‍या धनराशीबद्दल केली आहे. त्याचबरोबर हिंदूंना फितविण्याचा हा ब्रिटिश कट असल्याचा भलताच शोध त्यांनी लावला आहे. ही त्यांची वक्तव्ये पाहता ते धर्माभिमान, पंथाभिमान, देशाभिमान व अहंकार याच्या पलीकडे अद्याप पोहोचलेले नाहीत, असे म्हणावे लागते. हे सर्व अभिमान सर्वार्थाने वाईट नसतात. राजकारण, समाजकारण, अर्थकारण अशा प्रांतांत त्यांचे मर्यादित स्थान असते. तेथे ते गुण असतात, पण शुद्ध अध्यात्माच्या क्षेत्रात एकदा प्रवेश झाला की ते अवगुण ठरतात. कर्मकांड तेथे कवडीमोल ठरते. हिंदू असूनही हिंदुत्वाचा जरासुद्धा अभिमान नसणे हे हिंदू धर्मातील अध्यात्माचे प्रधान लक्षण आहे. अशा आध्यात्मिक क्षेत्रात ज्याने प्रवेश केला त्याचे लिंग, गोत्र, पंथ, धर्म हे सर्व निरर्थक ठरतात आणि श्रद्धावान हिंदू अशा व्यक्तीपुढे नतमस्तक होतो.
संतत्वाची खूण लोकांना पटते ती संतांच्या सहजतापूर्ण वागण्याबोलण्यातून आणि आचारातून. पद, पैसा, महत्त्व याच्या पलीकडे ते गेलेले असतात. ते बँक बॅलन्स ठेवीत नाहीत वा आपली भक्तसंख्या किती याची पर्वा करीत नाहीत. पिंडात आणि ब्रह्मांडात एकच आत्मतत्त्व भरलेले आहे याची खात्रीशीर प्रचिती, केवळ शब्दज्ञान नव्हे, आली की ‘विश्व होऊनी विचरे विश्वामाजी,’अशा मुक्त व सुंदर अवस्थेत संत राहतो. सबका मालिक एक असे उद््गार त्या आत्मप्रतीतीतून येतात. ‘पै गा भक्ती एकी मी जाणे, तेथ साने, थोर न म्हणे,’ अशा लहान-थोरपणाच्या मूढभावातून ते बाहेर पडलेले असतात. भौतिक सुखाचे दारिद्रय हे भारतावरचा शाप असेल, पण संतांची मांदियाळी हे केवळ याच देशाचे वैभव आहे. साईबाबांवर आक्षेप घेणारे स्वरूपानंद सरस्वती हे कबीर, रामकृष्ण परमहंस, रमण महर्षी, शेगावचे गजानन महाराज अशांना कुठे बसविणार आहेत? गजानन महाराजांनी समाधी घेतली तेव्हा साईबाबांना दु:ख अनावर झाले असल्याचे दाखले दोन्ही संतांच्या चरित्रात सापडतात. संतांचे देव्हारे माजवून पैशाचे पाट काढणारे समाजात नेहमीच असतात. त्यांचा बंदोबस्त केलाच पाहिजे; पण त्यामुळे मूळ संतत्व खोटे ठरत नाही. कर्मकांडांतून पीठाधीश होणार्‍यांना अधिकार मिळतो आणि या अशा अधिकारातून ते टीकाही करू शकतात. स्वरुपानंद या पठडीतील टीकाकार नसावेत. तरीही अशा वेळी ‘तुका म्हणे ऐसे मावेचे मर्इंद, त्यापाशी गोविंद नाही नाही,’ या उक्तीची आठवण आल्याशिवाय राहात नाही. विश्वरूप गोविंद फक्त संतांजवळ असतो.

छायाचित्र : द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती आणि शिर्डीचे साईबाबा.