आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shekhar Magars Article About Need Of Improvement In Universities Of India

मोदीजी, पंचतीर्थ समजले पण सहाव्या ज्ञानतिर्थाचे काय...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डाॅ. बाबासाहेब अांबेडकरांनी ‘मिलिंद’च्या रूपाने अाैरंगाबादेत ज्ञानतीर्थ उभारले. जगातील सर्वाेत्तम विद्यापीठांमध्ये भारतातील किमान पाच विद्यापीठांचा समावेश हाेण्यासाठी पंतप्रधान माेदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने प्रयत्न केले तरच आंबेडकर अनुयायांना अभिप्रेत असलेली पंचतीर्थे साकार हाेतील.

केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात नवे सरकार आल्यानंतर आंबेडकर अनुयायांना किंचित खुश करणारे काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणांना ‘पंचतीर्थे’ म्हणून विकसित करण्याच्या निर्णयाचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. पंचतीर्थे जाहीर करण्यापूर्वी प्रज्ञावंताने दिलेल्या ‘मिलिंद’ कॉलेजच्या दुरवस्थेचे आणि त्यांच्या नावाने चालणाऱ्या विद्यापीठाचे स्मरण व्हायला हवे होते. पंचतीर्थांवर खर्च कराच, पण या सहाव्या तीर्थाचे काय..? असा प्रश्न अाजच्या नामविस्तारदिनी उपस्थित करण्याची वेळ आली आहे.

स्मारकांवर कोट्यवधींचा खर्च करायचा अन् बाबासाहेबांच्या ‘मिशन’ला मात्र सोयीस्करपणे विसरायचे, असे तर नरेंद्र मोदींना करायचे नाही ना..? अशी शंका येत आहे. उच्चशिक्षणच गुलामीतून बाहेर निघण्याचे मुक्तद्वार आहे अन् ते सर्वांसाठी खुले झाले पाहिजे. त्यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती केली गेली पाहिजे, असे बाबासाहेबांना कायम वाटायचे. औरंगाबादेत ‘मिलिंद’च्या रूपाने त्यांनी ते करूनही दाखवले.

मागील ६० वर्षांत देशातील उच्चशिक्षणाने कदाचित विशिष्ट उंची गाठली असेल; पण जागतिक पातळीच्या दर्जाची विद्यापीठे निर्माण करण्यात आपण कमी पडलो आहोत, हे तर मान्यच करावे लागणार आहे. कॅलिफोर्निया, केम्ब्रिज, स्टॅनफोर्ड, कोलंबिया, हॉर्वर्ड आणि ऑक्सफर्ड अशा विद्यापीठांच्या रांगेत आपण अखेरच्या क्रमांकावरदेखील नाही. जगातील सर्वोत्तम २०० विद्यापीठांच्या रांगेत भारतातील एकही विद्यापीठ किंवा इन्स्टिट्यूट नाही, तरीही ‘पंचतीर्थे’ विकसित करण्याच्या घोषणेचे स्वागतच! ज्या प्रज्ञासूर्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ‘मिलिंद’ महाविद्यालयाची स्थापना केली त्याच भूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि चळवळीची पार्श्वभूमी असलेल्या या विद्यापीठाला मोदींनी सहावे तीर्थ ठरवले तर किती चांगले होईल..!

१९२१-२२ दरम्यान बाबासाहेबांचे वास्तव्य असलेले लंडनच्या किंग हेन्री रोडवरील घर देवेंद्र फडणवीस सरकारने ३५ कोटींना विकत घेऊन त्यास पहिले तीर्थस्थळ ठरवले. दिल्लीच्या अलीपूर रोडवरील बाबासाहेबांच्या सरकारी बंगल्याला दुसरे तीर्थ केले जाईल. भाजपशासित मध्य प्रदेशच्या महू येथील बाबासाहेबांच्या जन्मस्थळालाही तिसरे तीर्थ म्हणून विकसित केले जात आहे. दादरच्या राजगृहाला चौथे तीर्थ अाणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, चैत्यभूमीच्या स्मारकासाठी इंदू मिलची सर्वच साडेबारा एकर जागा देऊन येथे पाचवे आणि सर्वाधिक भव्य तीर्थ उभारण्याचे मोदींनी जाहीर केले. सुमारे ४०० कोटींच्या खर्चातून चैत्यभूमीत आंतरराष्ट्रीय स्मारक उभे करू, असे सांगून त्यांनी टाळ्या मिळवल्या. महापुरुषांचे प्रेरणादायी कार्य नव्या पिढीसमोर ठेवण्यासाठी स्मारके असावीत; पण महापुरुषांनी दिलेल्या विचारांचे काय..? त्यांचे विचार प्रत्यक्षात साकारण्यासाठी, त्यांच्या ‘मिशन’ला अधिक गतीने पुढे नेण्यासाठी ठाेस काही याेजना आहेत का..? देशातील विद्यापीठांनी जगातील अन्य विद्यापीठांशी स्पर्धा करावी यासाठी मोदीजी, आपण काही ठोस पावले उचलणार आहोत की नाही...? मोदीजी आपण जगभर फिरता आहात, त्यानिमित्ताने तेथील विद्यापीठांकडे कटाक्षही टाकला असेलच ना..! स्मारकांच्या चमक-धमकवर जेवढे पैसे खर्च केले जाणार आहेत तेवढे किंबहुना त्याहून अधिक निधी विद्यापीठांना द्यायला काहीच हरकत नाही. बाबासाहेबांच्या ‘मिलिंद’ महाविद्यालयाला व त्यांच्या नावाच्या विद्यापीठाला बाराशे कोटींचे विशेष पॅकेज देऊन प्रज्ञावंतांचे मिशन पुढे नेण्यास हातभार लावणे गरजेचे आहे. गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी पीईएसला साडेतीन कोटी रुपये दिले होते. आता पुन्हा एकदा ‘मिलिंद’ आणि विद्यापीठाच्या विकासासाठी विशेष पॅकेज पाहिजेच. पाचही तीर्थांमागे बाबासाहेबांचे वास्तव्य हाच जर निकष असेल तर "मिलिंद'ची वीट न् वीट बाबासाहेबांच्या वास्तव्याची साक्ष देऊ शकते. जागतिक दर्जाच्या विद्यापीठांशी स्पर्धा करण्यासाठी हे विद्यापीठ तयार आहे, उणीव अाहे ती फक्त पायाभूत सुविधांची. येथील विद्यार्थी देश-विदेशातील गुणवंतांच्या रांगेत उभे आहेत. त्यामुळे मोदींनी विद्यापीठ व "मिलिंद'ला सहावे तीर्थ घोषित करून सर्वांनाच खुश करण्याची गरज आहे. केवळ डॉ. आंबेडकर विद्यापीठच नव्हे, तर देशातील किमान पाच विद्यापीठे जागतिक पातळीची बनवली तरच सर्वांना अभिप्रेत असलेली तीर्थे साकार होतील; आणि तीच प्रज्ञावंतांची खरी पंचतीर्थे ठरतील..!