आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shesharao More Article About Partition And Babasaheb Ambedkar

फाळणी आणि बाबासाहेब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दोन-तीन महत्त्वाच्या विचारांची फारशी चर्चा झालेली नाही. त्याबाबत जनतेत गैरसमज पसरवले आहेत. उदाहरणार्थ अरुण शौरी यांनी ‘वर्शिपिंग फॉल्स गॉड’ ग्रंथात त्यांच्यावर काही आरोप केले आहेत. दुर्दैवाने शौरींना उत्तर म्हणून बाबासाहेबांची बाजू नीट मांडली गेली नाही. मी ती येथे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. १९४० मध्ये मुस्लिम लीगने फाळणीचा ठराव केल्यावर काही महिन्यांनी बाबासाहेबांनी ‘पाकिस्तान’ नावाचा ग्रंथ लिहून फाळणी कशी आवश्यक आहे हे विविध कारणे देऊन प्रतिपादन केले.
फाळणीचे समर्थन म्हणजे देशद्रोह होय, अशी भूमिका घेऊन बाबासाहेबांवर कठोर टीका झाली. मुस्लिमधार्जिणेपणाचाही आरोप झाला. उलट बाबासाहेबांनी फाळणीचे समर्थन करत अखंड भारत देशासाठी कसे अरिष्ट ठरणार आहे हे सप्रमाण दाखवून दिले. ते स्पष्टपणे कोणी मांडत नाही. त्या काळात फाळणी मागणारे, मान्य करणारे, पाठिंबा देणारे सारेच गुन्हेगार मानले गेले. त्यामुळे बाबासाहेबांनी मांडलेल्या भूमिकेचेे ठामपणे समर्थन करणारा एकही ग्रंथ लिहिला गेला नाही. उलट त्यांना अखंड भारतच पाहिजे होता, असे खोटेच सांगणारे ग्रंथ आले. बाबासाहेबांनी फाळणीचे समर्थन का केले हे त्यांचा ग्रंथ वाचल्याशिवाय समजणार नाही. त्यांचा मध्यवर्ती मुद्दा असा आहे की, भारत अखंड राहिला तर त्याची राज्यघटना कोणत्या स्वरूपाची असेल? केंद्र, राज्यात अधिकाराचे वाटप कसे होईल? केंद्र सरकार प्रबळ राहील का दुबळे? राज्यसत्तेत हिंदू-मुस्लिमांत वाटप कोणत्या प्रमाणात होईल? यासंबंधात अखंड भारताची व राष्ट्रवादी मुस्लिम संघटनांनी, नेत्यांनी त्याच्यासाठी ज्या मागण्या केल्या होत्या, त्या बाबासाहेबांनी ग्रंथात सविस्तरपणे मांडल्या आहेत. त्यानुसार अखंड भारत
संघराज्य राहील. केंद्राकडे संरक्षण, दळणवळण व परराष्ट्र व्यवहाराचाच अधिकार असेल.

उर्वरित सर्व विषयांचे अधिकार राज्याकडे असतील. केंद्रीय, प्रांतिक विधिमंडळात, मंत्रिमंडळात, सार्वजनिक संस्था, नोकऱ्यांत मुसलमानांना ५० टक्के राखीव प्रतिनिधित्व असेल. पंतप्रधान, उपपंतप्रधान आळीपाळीने हिंदू, मुसलमान असेल. मुस्लिम देशांविरुद्ध लढाई, करारासाठी आणि राज्यघटनेत बदलासाठी लोकसभेतील २/३ मुस्लिम सदस्यांची संमती आवश्यक असेल. अखंड भारत हिंदूंसाठी आपत्तीकारक, धोकादायक आहे. बाबासाहेबांची ही कारणमीमांसा राष्ट्रवादी नाही का? त्यांची ही भूमिका म्हणजे त्यांच्या प्रखर राष्ट्रवादाचा ज्वलंत पुरावाच होय. त्यांनी ग्रंथात स्पष्टपणे म्हटले आहे की, भारतात हिंदू व मुसलमान अशी दोन राष्ट्रे आहेत. ही दोन राष्ट्रे परस्परविरोधी व युद्धमान अवस्थेत असून एका राज्यघटनेखाली एक राष्ट्र म्हणून राहू शकत नाहीत. त्यांच्या भाषेत सांगायचे म्हणजे “भारत अखंड राहिला तरी प्रत्यक्षात ते पाकिस्तान, हिंदुस्थान या देशांना जबरीने बांधून ठेवलेले कृत्रिम ऐक्य असेल. अखंड भारत द्विराष्ट्र सिद्धांताच्या तणावाखाली असेल. हा द्विराष्ट्रवाद ऐक्यासाठीच्या भावनेची वृद्धी होण्यास वावच देणार नाही.” त्यांनी असेही म्हटले आहे की, ‘‘हिंदू व मुसलमान जोपर्यंत परस्परांना संकट मानतात, तोपर्यंत त्यांचे लक्ष त्या संकटाचा सामना करण्याच्या तयारीकडेच असेल. हे संकट हिंदू व मुसलमान यांना एका राज्यघटनेखाली राहावे लागेल तोपर्यंत राहील. यासाठी पाकिस्तान हाच उपाय आहे. अन्यथा ते दोघे दोन राष्ट्रांप्रमाणे संघर्ष करीत राहतील.” याचे मूलभूत कारण सांगताना ते म्हणतात की, मुस्लिम राजकारण मुख्यत: धार्मिक असते. त्यांच्या राजकीय विश्वाचा नियंत्रक एकच म्हणजे धर्म असतो. भारत हा दार-उल-हरब (इस्लामी सत्ता नसलेला) असल्यामुळे जिहाद घोषित करणे समर्थनीय ठरते. तिसऱ्या सिद्धांताविषयी ते म्हणतात की, इस्लामच्या निष्ठा प्रदेशातीत असल्याने भारतातील मुसलमान स्वत:ला प्रथम मुसलमान व नंतर भारतीय मानतो. त्यामुळे भारत अखंड ठेवण्याचा प्रयत्न चुकीचा ठरेल. त्यांची फाळणीची ही कारणमीमांसा जनतेसमोर न मांडताच त्यांच्यावर शौरींसारखे विरोधक पाकिस्तान समर्थक म्हणून आरोप करीत असतात हे दुर्दैवी आहे.

त्याच ग्रंथात बाबासाहेबांनी असेही म्हटले आहे की इस्लामचा बंधुभाव केवळ मुसलमानांचा मुसलमानांसाठीच बंधुभाव आहे. जेथे इस्लामचे राज्य असते तोच त्यांचा देश असतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे म्हणजे इस्लाम हा खऱ्या मुसलमानाला कधीही भारताला आपली मातृभूमी आणि हिंदंूना आपला स्नेही, बंधू मानण्यास परवानगी देत नाही. मुस्लिम भारताला भारतमाता का म्हणू शकत नाहीत हे बाबासाहेबांनी ७५ वर्षांपूर्वी सांगून ठेवले आहे. यासाठीच अखंड भारत नको; दोघांसाठी दोन स्वतंत्र मातृभूमी करा, असे त्यांचे म्हणणे होते. आरोपाचा दुसरा मुद्दा हा की, १९४२च्या ‘छोडो भारत’ स्वातंत्र्य आंदोलनात बाबासाहेबांनी भाग घेतला नाही. त्या काळात ते व्हाइसरॉयच्या कार्यकारी मंडळात मजूरमंत्री बनले होते. या आंदोलनावर ‘अनावश्यक’, ‘असमर्थनीय’, ‘बेजबाबदार’, ‘वेडेपणाचे’, अशा शब्दांत कठोर टीका केली होती. त्यांनी भारतीयांना आवाहन केले होते की, ‘सर्व शक्तीनिशी व साधनांनिशी आंदोलनाला विरोध करा.’ त्यांचा आंदोलनाला विरोध का होता? त्याचे मुख्य कारण हे की, त्यांचे म्हणणे की भारतासमोरचा खरा, मूलभूत प्रश्न स्वातंत्र्य मिळवणे हा नाही. तर स्वातंत्र्यानंतर भारतात कोणाचे राज्य येणार आहे, राज्यघटना
कशा प्रकारची राहणार आहे, हा होता.

त्यांच्या मते देशासमोरचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न फाळणीविषयी निर्णय घेण्याचा आहे. जोपर्यंत तो घेतला जात नाही, तोपर्यंत स्वातंत्र्य मिळूनही काही उपयोग नाही. हिंदू मुस्लिम प्रश्नावर तोडगा न काढता स्वातंत्र्य मिळाल्यास अराजक माजेल, यादवी युद्ध होईल. ब्रिटिश जाण्यासाठीच आलेले आहेत. हिंदू, मुसलमानाचा वाद मिटताच स्वातंत्र्य दिले जाणार आहे. त्यासाठी आंदोलन करण्याची गरज काय? फाळणी मान्य करा. स्वातंत्र्य घेऊ नका, आंदोलनाची नाटके कशाला अशी त्यांची भूमिका होती. १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांची ही बरोबर, योग्य भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. त्याचे जागरण केले पाहिजे.