आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बेपारी’ आपडो छे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी मतांचा जोगवा मागून हिंदुत्वाचा अजेंडा हाती घेतलेल्या शिवसेनेला त्यांचेच नेते तोंडघशी कसे पाडतात हे 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राज्यातील जनतेला पाहायला मिळाले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकदा राज्याची सत्ता हाती आलेल्या शिवसेनेला आता पुन्हा एकदा सत्तेवर येण्याचे स्वप्न पडू लागलेले आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देऊन शिवसेनेने गुजराती मतांची बेगमी करून ठेवली होती. मोदींचा झंझावात केंद्रात छाप पाडेल आणि त्या बळावर राज्याची सत्ताही महायुतीकडे येण्याची शक्यता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाटू लागली आहे. पण 1 मेच्या ‘सामना’च्या अग्रलेखातून ‘बेपारी’ समाजावर टीका झाल्यामुळे गुजराती समाज प्रचंड नाराज झाला आणि राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला. अखेर सुटीसाठी युरोपात गेलेल्या उद्धव ठाकरे यांना ‘बेपारीआपडो छे’ अशी साद घालत मराठी-गुजराती एकजूट असून त्यांच्यात काही जण बिब्बा घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगावे लागले. आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने गुजराती समाजाची नाराजी परवडणे शक्य नसल्याची जाणीव उद्धव ठाकरे यांना झाली हे त्यामागचे एक कारण, तर दुसरे कारण असे की, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा हायजॅक करून व मोदी यांना पाठिंबा देऊन गुजराती समाजाला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर गुजराती समाजाविरोधातील भूमिका धोकादायक ठरेल, असे उद्धव ठाकरे यांना वाटणे साहजिकच आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे स्वप्न मराठी आणि गुजराती समाजच पूर्ण करू शकतो, असे त्यांना सांगावे लागले. अर्थात उद्धव ठाकरे यांना आपल्याच मुखपत्रातील अग्रलेख बिब्बा घालत असल्याचे उशिरा का होईना जाणवले हे बरे झाले. यापूर्वीही दोन वेळा अग्रलेखामुळे उद्धव ठाकरे यांना तोंडघशी पाडले होते. यामुळे आणखीही एक गोष्ट स्पष्ट झाली आणि ती म्हणजे ‘सामना’चा अग्रलेख म्हणजे पक्षाची अधिकृत भूमिका नाही.