आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जय हाे ! (श्रीपाद सबनीस)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिअोमधील अाॅलिम्पिक ज्वर उतरताे न उतरताे ताेच पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतीय स्पर्धकांनी डबल धमाका उडवून दिला. मरियप्पन थंगवेलूने सुवर्ण उडी घेतली तर वरुण भातीने ब्राँझ पदकाची कमाई केली. दिव्यांगत्व तसेच पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेविषयीची उदासीनता यावर मात करीत या दाेघांनी केलेली कामगिरी ही १३५ काेटी भारतीयांना अभिमान वाटावा अशीच अाहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या अाॅलिम्पिकसारख्या क्रीडा प्रकारात तिरंगा फडकावणे ही भारतीय खेळाडूंसाठी अवघड कामगिरी मानली जाते. पदकांची लयलूट करणाऱ्या अॅथलेटिक्ससारख्या क्रीडा प्रकारात एका भारतीय खेळाडूला अाजवर पदक मिळवता अाले नाही. अशा परिस्थितीत मरियप्पन थंगवेलू अाणि वरुण भाटी यांनी पॅरालिम्पिकमध्ये मिळवलेेले यश हे शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या खेळाडूंसाठीच नव्हे, तर सर्वांसाठीच प्रेरक ठरते हे निश्चित.
मरियप्पन किंवा वरुणच नव्हे, तर या पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या १९ भारतीय खेळाडूंची पार्श्वभूमी लक्षात घेता केवळ क्रीडा क्षेत्रातच नाही, तर सामान्य जीवन जगतानादेखील त्यांना किती संघर्ष करावा लागताे याची कल्पना येते. मुळात संघटनात्मक स्तरावरील वाद अाणि एकाच क्रीडा प्रकाराच्या विविध संघटना हा जणू क्रीडा क्षेत्राला लागलेला शापच म्हणावा, अशी परिस्थिती अाहे. पॅरालिम्पिकदेखील यास अपवाद ठरले नाही. पॅरा राष्ट्रीय स्पर्धेच्या वेळी खेळाडूंचे अतिशय हाल झाले. मैदानावर अनेक त्रुटी तर हाेत्याच, शिवाय पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाची दुरवस्था, गैरसाेयीच्या ठिकाणी केलेली निवास व्यवस्था यामुळे स्पर्धकांना शारीरिक अाणि मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे खेळाडूंनी अापले गाऱ्हाणे केंद्रीय क्रीडा मंत्रालय, अांतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक महासंघापुढे मांडले. परिणामी राष्ट्रीय पॅरालिम्पिक संघटनेवर बंदी अाली. मात्र केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने मध्यस्थी करून पॅरालिम्पिकमधील भारतीय खेळाडूंचा सहभाग निश्चित हाेण्यासाठी प्रयत्न केले. एकीकडे सर्व प्रकारच्या सुविधा लाेळण घेत असतानाही काही अॅथलिट अाॅलिम्पिकमध्ये स्वत:च्या वैयक्तिक सर्वाेत्तम कामगिरीपेक्षा किंबहुना राष्ट्रीय विक्रमापेक्षाही खराब कामगिरी करून परत येत अाहेत. सुखवस्तू नाेकरी अाणि सरावासाठी कामावरून सवलती मिळवणारे अॅथलिट अाॅलिम्पिकच्या प्राथमिक फेरीच्या पुढे सरकत नाहीत. इतकेच नव्हे तर पहिल्या २५ मध्ये स्वत:चे स्थान पक्के करीत नाहीत. एकूणच या पार्श्वभूमीवर फारशा सुविधा किंवा साेयी उपलब्ध नसताना मरियप्पन थंगवेलू अाणि वरुण भाटी यांनी मिळवलेले यश हे अतुलनीय ठरते. उल्लेखनीय म्हणजे मरियप्पनची अॅथलेटिक्सची कारकीर्द घडवण्यासाठी कुटुंबीयांनी जे कर्ज घेतले त्याची फेड ते अजूनही करीत अाहेत. साधारणपणे चार वर्षांपूर्वी गिरिशा नागराजेगाैडा याने पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीतच राैप्यपदक मिळवले. मात्र अर्जून पुरस्कारासाठी, चांगल्या नाेकरीसाठी त्याला संघर्ष करावा लागला हाेता. मरियप्पन, वरुण यांच्या वाट्याला तरी अशी वणवण येऊ नये, त्यांना तरी सन्मानपूर्वक वागविले जायला हवे. दिव्यांग असल्याचा बाऊ त्यांनी कधी केला नाही की कुठल्या तक्रारी करीत बसले नाहीत. उपलब्ध सुविधांवर समाधान मानत त्यांनी यशाचा जाे अादर्श पायंडा घालून दिला अाहे त्यातून अनेक गाेष्टी शिकण्यासारख्या अाहेत. वयाच्या पाचव्या वर्षी शाळेत जात असताना बसच्या चाकाखाली पाय चिरडल्यामुळे दिव्यांग बनलेल्या मरियप्पनने पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीतील तिसरे सुवर्णपदक भारताला मिळवून दिले. यापूर्वी १९७२ मध्ये जलतरणात मुरलीकांत पेटकर अाणि २००४ मध्ये भालाफेकीत देवेंद्र झझारिया यांनी सुवर्णपदके मिळवून दिली हाेती.
या वर्षी मरियप्पनने १.८९ मीटर उंच सुवर्ण उडी घेत अमेरिकेच्या सॅम ग्रेव्हे यास मागे टाकले. ग्रेव्हेने १.८६ मीटर उंच उडी मारली. पाेलिअाेमुळे दिव्यांगत्व अालेल्या वरुण भातीनेदेखील १.८६ मीटर इतकी उंच उडी मारली. मात्र उडी मारण्यातील कमीत कमी निर्दाेष प्रयत्न करणाऱ्या स्पर्धकाला वरचे स्थान दिले गेले. त्यामुळे सॅमला राैप्य, तर वरुणला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. शरदकुमारदेखील याच क्रीडा प्रकारात सामील हाेता, परंतु त्यास पदक मिळवता अाले नाही. चुरशीच्या ठरलेल्या या पॅरालिम्पिकमध्ये उंची गाठण्यासाठी चाललेल्या स्पर्धेत भारतीयांनी रंगत कायम ठेवली अन् निर्णायक क्षणी मरियप्पनने वेलू गगनावरी नेला.
बातम्या आणखी आहेत...