आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्न हेच पूर्णब्रह्म!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय संस्कृतीने अन्न हे पूर्णब्रह्म मानले. मात्र दैनंदिन जीवनात अापण अन्नाला खऱ्या अर्थाने पूर्णब्रह्म मानताे का? जागतिक क्रमवारीनुसार भुकेल्या देशांच्या यादीत भारत ६७ वा तर अन्न वाया घालवणाऱ्यांमध्ये सातव्या क्रमांकाचा देश ठरला अाहे. अाणि हे वास्तव नक्कीच सर्वांना सुन्न करणारे अाहे.
 
भारतासारख्या देशाचा विचार करता अन्नाची हाेत असलेली नासाडी हा मानवाधिकाराच्या दृष्टीनेदेखील गंभीर प्रश्न ठरताे. मुळात अन्न वाया घालवण्याने किंवा त्याची नासाडी केल्यामुळे अनेक नैसर्गिक स्राेतांचीदेखील नासाडी हाेते, याकडे कुणी लक्ष देत नाही.

अन्नधान्याच्या उत्पादनासाठी वीज, पाणी, खते, कीटकनाशके, इंधन, मनुष्यबळ अशा कित्येक गाेष्टींचा वापर केला जाताे, त्यामुळे अप्रत्यक्षपणे त्याचीही नासाडी अापणच करताे की नाही? फेकून दिलेल्या अन्नातून ३.३ अब्ज टन ग्रीन हाऊस गॅसची निर्मिती हाेते. शिजवलेले तांदूळ अर्थात ज्याला अापण भात म्हणताे त्यामुळे तर पर्यावरणाचे सर्वाधिक नुकसान हाेते. अन्नाची नासाडी राेखणे सहजी शक्य नसेलही, मात्र नियंत्रणात अाणणे तितकेसे कठीण नाही, हे तितकेच खरे. ‘फूड अँड अॅग्रिकल्चर अाॅर्गनायझेशन’ची अाकडेवारी पाहता जगभरात १.३ अब्ज टन अन्न वाया जाते. याचा अर्थ असा की, जागतिक अन्नधान्य उत्पादनाच्या एक तृतीयांश अन्न फेकून दिले जाते.  
 
‘सेंट्रल इन्स्टिट्यूट अाॅफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन’च्या अहवालात लग्न, समारंभांत अन्न माेठ्या प्रमाणावर वाया जात असल्याचे म्हटले अाहे. तथापि, अन्नधान्याच्या उत्पादनात सातत्याने हाेत असलेली घट अाणि वाढती दरवाढ लक्षात घेता ही नासाडी थांबवण्यासाठी अन्न अाणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागाने घेतलेला पुढाकार, केंद्र सरकार उभी करीत असलेली राष्ट्रीय चळवळ याशिवाय उल्लेखनीय म्हणजे शालेय अभ्यासक्रमात हाेत असलेला समावेश या बाबी दिलासादायक म्हणाव्यात. मात्र यापलीकडे जात न्यूयाॅर्कमधील भारतीय वंशाच्या अनुज झुनझुनवाला, मार्गारेट टंग अाणि जेसाॅन चेन या संशाेधकांनी अन्नाची नासाडी राेखण्यास अाणि भुकेल्यांना अन्न मिळवून देण्यात मदत करणारे अॅप विकसित केले अाहे.

दरवर्षी १६५ अब्जांची हाेणारी अन्नाची नासाडी राेखण्यात हे अॅप मदत करेल, असा विश्वास अमेरिकेच्या नैसर्गिक साधन संरक्षण परिषदेने व्यक्त केला. मात्र प्रत्येकानेच कुटुंब पातळीवर काही वेगळे प्रयत्न केले तर निश्चितच अन्न सत्कारणी लागेल, हे नि:संशय. अन्नधान्याच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण असला तरी उत्पादित मालाची नासाडी परवडणारी नाही. भाज्या, फळांच्या उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर अाहे. मात्र शीतगृहे, वातानुकूलित वाहन सुविधा अशा पायाभूत बाबींचा अभाव त्यांच्या नासाडीला कारणीभूत ठरताे. ‘इमर्सन क्लायमेट टेक्नाॅलाॅजीज इंडिया’च्या अहवालानुसार दरवर्षी भारतात ४४ हजार काेटी रुपयांच्या अन्नधान्याची नासाडी हाेते.

त्यात साधारणपणे १३ हजार ३०० काेटींच्या फळे, भाज्यांचा समावेश असताे. महाराष्ट्राचा विचार करता कांदा, टाेमॅटाे, फळे, भाज्यांचे विशेषत: मेथी, काेथिंबीर, चुका, पालक यांचे माेठ्या प्रमाणावर उत्पादन हाेते. मात्र त्यासाठी उपयुक्त, पुरेशी साठवण व्यवस्था अाणि क्षमता नसल्यामुळे मिळेल त्या दरात शेतीमाल विकण्याची किंवा ताे फेकून देण्याची वेळ येते. काेकणातील अांबा, काजू, जांभूळ, रातांबे यावरील प्रक्रिया उद्याेगांमुळे उत्पादकांची अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत झाली अाहे. मराठवाडा, खान्देश, विशेषत: प. विदर्भात असे प्रयाेग करण्यास भरपूर वाव अाहे, हे लक्षात घेऊन सरकारनेदेखील पुढील पावले टाकायला हवीत.
 
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी ‘मन की बात’मधून अन्न वाया जात असल्याबद्दल काळजी व्यक्त केली. त्यापाठाेपाठ साऱ्या देशावर ती बिंबवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने सुरू केला. त्याचाच एक भाग म्हणून हाॅटेल अाणि रेस्टाॅरंटमधील अन्नाची नासाडी राेखण्याचे प्रयत्न हाेत अाहेत. जागतिकीकरणानंतर गेल्या २२ वर्षांत भारताने विविध क्षेत्रांत प्रगती करीत विकासाेन्मुख देश म्हणून ठसा उमटवला. मात्र सर्वसाधारण उत्पन्न असलेल्या व्यक्तीला अाजच्या महागाईच्या परिस्थितीत अगदीच सामान्यपणे जगणेदेखील कठीण हाेऊन बसले अाहे. कदाचित या बाबीची पुरेशी जाणीव झाल्यामुळेच केंद्र सरकारने अन्न सुरक्षा याेजना प्रत्यक्ष कार्यवाहीत अाणली, ज्याचा लाभ सुमारे ६७ टक्के लाेकांना हाेऊ शकेल. अन्नधान्याची नासाडी राेखण्यासाठीच तर अापल्या संस्कृतीने त्यास पूर्णब्रह्म या अर्थाने संबाेधित केले. मात्र त्याकडे कानाडाेळा केला जाताे म्हणूनच अाजही सुमारे २० काेटी लाेक भुकेल्यापाेटी राहतात, हे निश्चितच भूषणावह नव्हे. त्यासाठीच तर अन्नाची नासाडी ही राष्ट्रीय हानी ठरवणे गरजेचे अाहे.
बातम्या आणखी आहेत...