आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषारी वायूचा विळखा!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत अाणि चीनमध्ये आता वायूप्रदूषणाची जणू स्पर्धा लागली आहे. अमेरिकेतील ‘हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूट’ने जगभरातील वायुप्रदूषणाचा अभ्यास केला, त्यातून ही बाब निदर्शनास अाली. या विषारी वायूचा विळखा इतका घट्ट अावळला जाताेय की दरवर्षी १० लाख भारतीय त्याचे बळी ठरत अाहेत; त्यापैकी एकट्या दिल्लीत दरवर्षी ३००० लाेक मृत्युमुखी पडतात. गेल्या वर्षी जागतिक अाराेग्य संघटनेने जाहीर केलेल्या संख्येपेक्षा ती अधिक अाहे. भारताच्या गतिमान अर्थकारणाला बळ देणारे अाैष्णिक विद्युत केंद्र, अाैद्याेगिकीकरण, बांधकाम क्षेत्र, वाढती वाहन संख्या या बाबी त्यास प्रामुख्याने कारणीभूत अाहेत. वाहनांच्या पाठाेपाठ वायुप्रदूषणास बांधकाम क्षेत्र कारणीभूत ठरते अाहे, कारण जिथे म्हणून सिमेंट अाहे, तिथे अॅसिनाे बॅक्टर नावाचा बॅक्टेरिया वाढताे. त्यापासून श्वसनाचे अाजार, फुप्फुसाचा कर्कराेग अशा व्याधी बळावतात. 
 
अर्थातच धूळ अाणि प्रदूषणाचा फटका केवळ भारतालाच नव्हे तर पाकिस्तानसह दक्षिण अाशियायी देश, इंग्लंड, फ्रान्स, जपान, ब्राझील, बांगलादेश, युराेपियन युनियनप्रमाणेच चीनलादेखील माेठ्या प्रमाणावर बसला अाहे. २०१० पासून भारत अाणि बांगलादेशात वायुप्रदूषण सातत्याने वाढत असल्याचे दिसून अाले. वायुप्रदूषणामुळे २०१५ मध्ये भारतात १०,९०,४०० तर चीनमध्ये ११,०८,१०० लाेक मृत्युमुखी पडले अाहेत. तात्पर्य, वायुप्रदूषण हा थेट अाराेग्यावर परिणाम करणारा घटक असल्याने त्याचा विळखा अधिकाधिक सैल हाेण्याच्या दृष्टीने जगभरात रिअल टाइम माॅनिटरिंग हाेणे अत्यंत गरजेचे ठरते. अगदी अापल्या शेजारच्या नाशिक, पुणे, चंद्रपूर, डाेंबिवलीत याविषयी अभ्यास झाला, त्यानंतर दाेन काेटी झाडे लावण्याची घाेषणा झाली खरी, पण ती झाडे अाहेत कुठे? महाराष्ट्राचा विचार करता अाैरंगाबाद, नाशिक, नागपूर, चंद्रपूर, मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, साेलापूर या ९ जिल्ह्यांमध्ये २४ तास हवेेतील प्रदूषित घटक माेजले जातात. धुळीच्या प्रदूषणात देशभरात जी शहरे अग्रेसर अाहेत त्यात साेलापूरचा समावेश हाेताे. 
 
भुुरेलाल समितीने या प्रश्नावर नेमके बाेट ठेवले, उपाय सुचवले; मात्र प्रदूषण काही थांबले नाही. काेल्हापुरात तर सर्वत्र सहकाराचा धूर. तब्बल २० साखर कारखाने, ५० कापड प्रक्रिया केंद्र, धाग्याला चिवटपणा अाणणारे २०० कारखाने, फाउंड्री अाणि वीटभट्ट्यांचा विळखा अाहेच. मुळात अापल्याकडेच म्हणून नव्हे तर जगभरात दीर्घकालीन उपायांवर भरीव काम अाणि प्रदूषण नियंत्रणविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठाेर कारवाई या दाेन्ही गाेष्टी गांभीर्याने घेतल्या जात नाहीत. एक मात्र खरे की, गेल्या वर्षी बीजिंगमधील नागरिकांवर अाॅक्सिजनचे सिलिंडर विकत घेण्याचा बाका प्रसंग अाेढवला, त्यानंतर उपाययाेजना प्रामाणिकपणे राबवल्या जात अाहेत. सेंट्रल लंडनमध्ये स्वत:च्या वाहनातून जायचे असेल तर १००० रुपये दंड भरावा लागताे. त्यामुळे अापाेअापच वाहन संख्या कमी झाली, परंतु खासगी वाहनांना अशी कठाेर मनाई करतानाच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तितकीच सक्षम करण्यात आली. पॅरिसमध्ये तर प्रदूषण नियंत्रणासाठी सार्वजनिक वाहनांतून माेफत प्रवासाची साेय सर्वांनाच उपलब्ध करून देण्यात अाली, हे उल्लेखनीय. 
 
तात्पर्य, कडक नियम अमलात अाणतानाच पूरक यंत्रणा, व्यवस्था असेल तर प्रभावी नियमन हाेऊ शकते याचे ते उदाहरण ठरावे. भारतीयांची पिढी अाजारी पाडणारे किंवा जन्मापासूनच तिला दिव्यांग बनवणारे ‘अच्छे दिन’ काय उपयाेगाचे अाहेत? एकीकडे दिल्ली अाणि पंजाब धूळ, दूषित वातावरणाने त्रस्त असताना पाकिस्तान्यांनी भारतावर अागपाखड सुरू केली अाहे. बांधकामामुळे उठणारी धूळ, अाैद्याेगिक अाणि शेतातील टाकाऊ घटकांना जाळल्यामुळे हाेणारा धूर यामुळे अाराेग्यविषयक अाणीबाणीसदृश्य स्थिती निर्माण झाल्याचा कांगावा पाकव्याप्त पंजाबमधून केला जात अाहे. मुळात यासंदर्भात केवळ भारतावर दुगाण्या झाडण्यापेक्षाही पाकिस्तान तसेच दक्षिण अाशियायी देशांनी एकत्र बसून प्रदूषण नियंत्रणासाठी ठाेस, रचनात्मक कार्य केले तरच काही साध्य हाेऊ शकेल. अर्थकारणाचा वाढता प्रभाव, सातत्याने हाेत असलेले अाैद्याेगिकीकरण अाणि वाहनांची वर्दळ नियंत्रणात ठेवता अाली तर एकूणच जल-वायू परिवर्तनामुळे हाेत असलेल्या बदलांच्या परिणामांना अावर घालता येऊ शकेल. जगभरामध्ये सध्या प्रदूषण, पर्यावरण या दाेन्ही बाबी चिंतेच्या बनल्या अाहेत, म्हणूनच निसर्ग अाणि मानव यांच्यात संतुलन राखले गेले तरच विषारी वायूचा विळखा हळूहळू सैल हाेण्यास मदत हाेईल हे निश्चित!
बातम्या आणखी आहेत...