आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शर्यतीच्या गाड्याला वेसण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्यातील बैलगाडी शर्यतीच्या मुद्यावरून गेल्या पाच-सहा वर्षात अनेक चढउतार अाले. यासंदर्भातील विधेयकावर २२ जुलैला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शिक्कामाेर्तब केले. तेव्हा शर्यतींचा मार्ग माेकळा झाला असे समजून शाैकिनांमध्ये ‘भिर्रर्रर्र...’ची ललकारी घुमू लागली ताेच मुंबई उच्च न्यायालयाने या शर्यतींना मनाई केली. साहजिकच कृषी संस्कृती रक्षकांच्या अानंदावर विरजण पडले अाता याचे खापर राज्य सरकारवर फाेडले जात अाहे.

तामिळनाडूमध्येही ‘जलिकट्टू’वर बंदी घालण्यात अाली तेव्हा त्याविषयीचे विधेयक अाणि शर्यतीच्या अनुषंगाने नियमावली अवघ्या चार दिवसांत बनवली गेली. लगाेलग ‘जलिकट्टू’ला परवानगी मिळाली, या तुलनेत महाराष्ट्रात फारशा वेगाने हालचाली झाल्या नाहीत; हे खरेच. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींचा मार्ग ६ एप्रिलला माेकळा झाला; त्यासाठी स्पष्ट नियमावली बनवण्याचे निर्देशही काेर्टाने राज्य सरकारला दिले मात्र साधारणपणे गेल्या ६ महिन्यात हे काम झालेच नाही. पुन्हा एकदा शर्यतीचा गाडा नियमांमध्ये रूतला. राज्य सरकारनेे या शर्यतींच्या अनुषंगाने अधिसूचना काढली असली तरी स्पष्ट नियमावली जाेपर्यंत बनवली जात नाही अाणि ती काेर्टासमाेर सादर केली जात नाही ताेवर परवानगी दिली जाणार नाही असे ठणकावत उच्च न्यायालयाने दाेन अाठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे अादेश दिले अाहेत. अजय मराठे यांनी या अधिसूचनेला अाव्हान दिले. शर्यतीमुळे बैलांना क्रूरपणे इजा पाेहाेचवली जाते, शिवाय बैलगाडी शर्यत हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ नाही, असा निर्वाळा सर्वाेच्च न्यायालयाने दिला असल्याचेही त्यांनी म्हटले.
 
विविधतेने समृध्द असलेल्या कृषीप्रधान भारतात संस्कृती-परंपरा अाणि अाधुनिक मूल्य यांच्यात कैक वर्षांपासून संघर्ष सुरू अाहे. सामाजिक उत्क्रांती हाेत असताना कालसापेक्ष बदल अनिवार्य अाणि अपेक्षित अाहेतच. विशेषत: ब्रिटीश राजवटीत कायदे तयार व्हायला लागले तेव्हापासून हा संघर्ष अधिक ठळकपणे दिसू लागला. बैलगाडा शर्यत, दहीहंडीचे थर असाेत की गणेशाेत्सवातील डीजेवरील बंदी या निमित्ताने परंपरा अाणि नव्या मूल्यांमधील न्यायालयीन संघर्ष वाढलेला दिसताे अाहे. कायद्याचे, न्यायालयाच्या अादेशांचे पालन करण्यात गैर काहीच नाही मात्र सामाजिक-अार्थिक विविधता, विषमतेने व्यापलेल्या समाजाचा सर्वंकष विचार केला तर न्यायालयाच्या निर्णयाच्या विराेधात लाेकक्षाेभ का निर्माण हाेताे, याचे उत्तर मिळू शकेल.

मुळात नवी मूल्ये समाजात कायद्याच्या धाकाने रुजवता येणार नाहीत, हे अनेक प्रकरणांतून दिसून अाले. केवळ लाेकजागृती, लाेकशिक्षणाचे माध्यम त्यास अधिक उपयुक्त ठरू शकते म्हणूनच शर्यतींच्या नियमांबाबत जनजागृतीची जबाबदारी लाेकप्रतिनिधींचीच ठरते, नाही का? उल्लेखनिय म्हणजे या शर्यतींना कुणाचाही विराेध नाही, जाे विराेध अाहे ताे केवळ मुक्या जीवांच्या क्रूूर छळाला. त्यासाठी शर्यतीच्या गाड्यांवर स्वार हाेणाऱ्या बेलगाम, बेभान वृत्तीला वेसण घालण्याची खरी गरज अाहे. यापूर्वी काेल्हापूरचे तत्कालीन पाेलिस अधीक्षक माधव सानप यांनी विनालाठी शर्यतीचा प्रयाेग करून पाहिला, ताे तात्पुरताच ठरला. एक मात्र खरे की, शाैकिनांचा अानंद अाणि बैलांच्या शर्यतीसाठी मानवी संवेदनांचा वापर शक्यच नाही असेही नाही. मानवी मनाेरंजनासाठी या दाेन्ही गाेष्टींचा पध्दतशीर मेळ घालता येऊ शकताे अाणि याचीच काळजी नियमावली बनवताना घेतली जावी अशी अपेक्षा अाहे.
 
अगदी पुरातन काळापासून जगभरातील मानवी संस्कृतीने बैलाला सन्मानाने वागवले. मात्र ख्रिस्तपूर्व दाेन हजार वर्षापूर्वी गिल्गमेष व एनहिडू यांनी बैलाशी ‌झुंजून त्यावर मात केल्याची दंतकथा अाहे. याचेच रूपांतर ‘बुल फाइट’मध्ये झाले. स्पेन, पाेर्तुगाल, लॅटिन अमेरिका, फ्रान्समध्ये ताे सुरू अाहे. त्यातच भर पडली ती बैलाला ठार मारणाऱ्या ‘मॅटेडाेर’ची. बैलाशिवाय घाेडा, हत्ती, मेंढा, वाघ, सिंहाला पकडण्याचे क्रूर खेळ खेळले जात. गरूड, ससाणे, लावी, काेंबड्याच्या ‌झुंजी लावत. अर्थातच हे खेळ काही नितीमूल्ये पाळून पार पडत, त्याला सांस्कृतिक अधिष्ठान असायचे कारण या माध्यमातून कराच्या स्वरूपात उत्पन्न मिळत असे. मात्र जसा काळ बदलत गेला तसा क्रूरपणाही बळावत गेला; म्हणूनच प्राण्यांशी क्राैर्य प्रतिबंधक कायद्यान्वये जगभर असे क्रूर खेळ-स्पर्धा थांबवण्यासाठी याचिका दाखल झाल्याच्या पहायला मिळतात.
 
खरे तर मूक प्राण्यांच्या जीवावर खाेटे एेश्वर्य दर्शवणाऱ्या दांभिकांच्या निर्दयी खेळांना संमती देणे हा देखील क्रूरपणाच नव्हे काय? सद्सद्विवेक अाणि भूतदयेवर अाधारित सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करणारा समाज अध:पतनाच्याच वाटेवर वेगाने प्रवास करणार हे निश्चित. ज्या भारतीय संस्कृतीने खऱ्या कृषीमित्राचा सन्मान करण्याची शिकवण दिली त्या जगातील सर्वाेच्च संस्कृतीची हेटाळणी अापणच मग्रूरपणे करत अाहाेत, वृषभ पूजनापासून वृषभनिंदेपर्यंत जाणे हे केवढे दुर्दैव... याचे भान तरी समाजाला नसावे का?
 
बातम्या आणखी आहेत...