आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल रुहानी!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इराणसारख्या कर्मठ देशात उदारमतवादी नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणे साहजिकच. एकीकडे धर्मांध शक्तींशी सामना करायचा अाणि त्याच वेळी अमेरिकेसह अन्य लाेकशाहीवादी देशांना खुश ठेवायचे हे तितकेसे साेपे नाही. हसन रुहानी कितीही पुराेगामी असले तरी इराणचे मूलभूत धाेरण त्यांना ताबडताेब बदलता येत नाही. कधी दाेन पावले मागे, तर कधी एक पाऊल पुढे, अशी भूमिका त्यांना घ्यावी लागेल. कारण ज्या देशातील समाज धार्मिक पगड्याखाली असताे त्या देशातील राज्यकर्ते एकाएकी भूमिका बदलवू शकत नाहीत. इतकेच नव्हे तर ज्या देशात पूर्णपणे लाेकशाही नसते तिथे लाेकशाहीवाद्यांना जपून मार्ग काढावा लागताे. लाेकशाहीची मुळे रुजवण्यासाठी प्रसंगी धार्मिक नेत्यांशी जुळवून घ्यावे लागते. अन्य लाेकशाहीवादी देशांत स्त्री-पुरुष समानता गृहीत धरता येते तशी इराणमध्ये शक्य नाही. मात्र त्यासाठी प्रयत्न जरूर करता येतील.
 
काेणतेही सरकार कितीही पुराेगामी अाणि व्यवहारवादी असले तरी सनातन्यांची मर्जी सांभाळल्याशिवाय प्रगती साधता येत नाही हे हसन रुहानी यांच्या पहिल्या कारकीर्दीत पाहायला मिळाले. तरीही इराणींनी रुहानींनाच पुन्हा पसंती दिली. २.३ काेटी मते मिळवत त्यांनी १.५ काेटी मतांवर प्रतिस्पर्धी इब्राहिम रईसी यांना राेखले. इराणचे १२ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून हसन रुहानी पदग्रहण करतील. जगात अन्यत्र प्रतिगामी, कट्टरवादी गटांकडे देशाची धुरा साेपवली जात असताना फ्रान्स, उत्तर काेरियापाठाेपाठ इराण हा तिसरा देश ठरला, जिथे वेगळे काही घडते अाहे. राज्यकर्ता पुराेगामी असल्याने शासकीय व्यवस्था उत्तम चालतेच असे नाही, तसेच त्याची इच्छाशक्ती असली तरी काही उपयाेग हाेत नाही या सार्वत्रिक अनुभवास अर्थातच हसन रुहानीदेखील अपवाद ठरले नाहीत.
 
१९७९ च्या ‘इस्लामी क्रांती’नंतर अार्थिक निर्बंधाची झळ साेसलेल्या रुहानींनी इराणला जागतिकीकरणाशी जाेडण्याचा प्रयत्न केला. अाेबामांच्या कारकीर्दीत अमेरिकेशी अर्थपूर्ण संवादाच्या पातळीवर पाेहाेचलेल्या रुहानींनी २०१४ मध्ये व्हिएन्नात सहा बड्या देशांकडून अणुकरारास मान्यता मिळवली. ‘इराणच्या अस्मितेसाठी जग खाक झाले तरी बेहत्तर’ म्हणणाऱ्यांच्या तुलनेत रुहानी इथेच निराळे ठरले अाणि अंशत: का हाेईना अार्थिक निर्बंध उठले. २०१५ नंतर इराणमधील बेराेजगारीचा दर १२ टक्क्यांपर्यंत खाली अाला. अर्थव्यवस्थेची घसरणही थांबली, उलट ६.६ टक्के इतकी वाढ झाली. नेमका हा बदल तरुणाईला भावला. कारण अणुकरार किंवा अन्य मुद्द्यांपेक्षा अामच्या वैयक्तिक अायुष्यात किती बदल हाेताे हेच अामच्यासाठी अधिक महत्त्वाचे अाहे अशी प्रतिक्रिया तरुण मतदारांनी व्यक्त केली. त्याचा माेठा परिणाम या निवडणूक निकालात पाहायला मिळाला.
 
अणुकराराशिवाय मानवाधिकार, राजकीय अधिकार, अर्थव्यवस्था या प्रमुख मुद्द्यांसाेबतच माध्यम अाणि विचारांच्या स्वातंत्र्याचे गारूड मतदारांवर दिसून अाले. खरे तर रुहानी यांच्यासाठी ही निवडणूक सहजसाेपी नव्हतीच. इब्राहिम रईसीसारखा कट्टरवादी नेता अाणि अयातुल्ला खाेमेनी यांचा त्यास असलेला पाठिंबा पाहता सुधारणावाद माेडून पडणार की काय, अशी स्थिती निर्माण झाली. मात्र साऱ्या अाव्हानांवर हसन रुहानींनी मात केली. जगभरातील अन्य देशांसाठीदेखील त्यांची निवड महत्त्वाची ठरते. कारण खनिजतेलाचा पुरवठा, त्याचे दर नियंत्रण याशिवाय इराक, सिरियामध्ये शांतता, स्थैर्य प्रस्थापित हाेण्यासाठी इराणची भूमिका निर्णायक असेल. पश्चिम अाशियाई देशांत इराणचा प्रभाव वाढत असल्यामुळे एकूणच जगभरातील देशांचे लक्ष इराणमधील निवडणूक निकालांकडेच हाेते. या साऱ्या पार्श्वभूमीवर अाता हसन रुहानी यांच्याकडून अपेक्षा वाढल्या अाहेत. एकीकडे सुधारणावाद्यांचा दबाव, तर दुसऱ्या बाजूला अयातुल्ला खाेमेनींसारख्या अमर्याद अधिकार असणाऱ्या सर्वाेच्च नेत्याकडून हाेणारा विराेध, त्यांचा नकाराधिकार अशा अाव्हानात्मक परिस्थितीतून रुहानी यांना रचनात्मक विकासाचा साेपान साधायचा अाहे.
 
मुळातच धर्मसत्ता अाणि तिच्याशी असणारे लागेबांधे मिळून जी व्यवस्था तयार हाेते ती सुधारणावाद्यांसमाेर पेच निर्माण करते हा सार्वत्रिक अनुभव अाहे. इराणसारख्या मूलत: कर्मठ देशात ‘पुराेगामी’ या शब्दाला बऱ्याच काही मर्यादा अाहेत. हसन रुहानी हे धर्मगुरू अाहेत. पाश्चात्त्य विद्यापीठात त्यांचे शिक्षण झालेले असले तरी धार्मिक नेत्यांशी मतभेद झाल्यामुळे ते बाहेर पडले. रुहानींचा हा भूतकाळ विसरून कसे चालेल? तथापि, अांतरराष्ट्रीय पातळीवर इराणची प्रतिष्ठा जपत, हितसंबंध वाढवण्यासाठी हसन रुहानी यांना राजनैतिक काैशल्य पणाला लावावे लागणार हे निश्चित!
 
बातम्या आणखी आहेत...