आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खलिस्तानचे भूत...BLOG

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाेपाळमधील ‘जेल ब्रेक’ प्रकरण राजकीय वादाचा विषय ठरला. हे वादंग निवळण्यास सुरुवात हाेते न हाेते ताेच पंजाबच्या पतियाळा जिल्ह्यातील अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या नाभा कारागृहातून ६ जण फरार झाले. याचा अर्थच असा की, भाेपाळ जेल ब्रेकनंतर देशभरातील कारागृह प्रशासन किंवा केंद्र-राज्य सरकारांनी कायदा अाणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा हा विषय फारशा गांभीर्याने घेतलेला दिसत नाही. किंबहुना राजकीय तसेच सुरक्षा, प्रशासनातील हितसंबंधदेखील अशा घटनांना पाेषक ठरत असावेत, असे म्हटले तर फारसे वावगे ठरू नये.

भारतीय लष्कराने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर ‘सर्जिकल स्ट्राइक’ केल्यानंतर या दाेन्ही घटना घडल्या, यामागे निश्चित संकेत असावेत. भाेपाळ कारागृहातून फरार झालेल्या सिमीच्या अाठ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश अाले असले तरी खलिस्तानी दहशतवाद्यांचा म्हाेरक्या हरमिंदर मिंटू याच्यासह फरार झालेल्या ६ जणांचा अद्याप सुगावा लागलेला नाही. ‘हाय सिक्युरिटी’ असलेल्या दाेन कारागृहांतून काही अाठवड्यांच्या अातच कैदी फरार हाेतात या घटनेने सुरक्षा सेवेविषयी चिंता तसेच संशयाचे सावट निर्माण हाेणे साहजिकच अाहे. तथापि, या घटनांचा अन्वयार्थ असा की, ‘सर्जिकल स्ट्राइक’नंतर अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानने जुन्या विघातक शक्तींचे पुनरुज्जीवन करून भारतातील वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न चालवले अाहेत. ‘सिमी’ अाणि ‘खलिस्तानी’ या दाेघांनाही यापूर्वी पाकिस्तानी मध्यस्थांकडून पुरेशी रसद मिळायची. त्या बळावर या शक्ती भारतात विघातक कारवाया करीत. गेल्या काही वर्षांत दाेघांचेही अवसान गळण्यास सुरुवात झाली, ताेच सर्जिकल स्ट्राइकमुळे काेलित मिळाले. अलीकडेच पंजाबातील हाेशियारपूरमध्ये खलिस्तानी लिबरेशन फाेर्सच्या तीन दहशतवाद्यांना पंजाब पाेलिसांनी पाकिस्तानी शस्त्रास्त्रांसह अटक केली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईमुळे राजकीय तलवारी उपसल्या गेल्या.

पंजाबचे गृहमंत्री सुखबीरसिंग बादल अाणि अन्य बहुतेक मंत्र्यांनी ही बाब मान्य केलीय की पंजाबात हितसंबंध असलेल्या, मात्र विदेशात बस्तान बसवलेल्या खलिस्तान समर्थक कट्टरवादी गटांना पंजाबातील वातावरण बिघडवण्यासाठी पाकिस्तान साहाय्य करीत अाहे, जेणेकरून दहशतवाद पुन्हा थैमान घालेल. हे तिघे दहशतवादी विदेशातील कट्टरवादी जत्थेदारांच्या संपर्कात अाणि घातपात घडवण्याच्या प्रयत्नात हाेते. याप्रकरणी अमेरिकेतील ‘सिख फाॅर जस्टिस’चे नेते हरजापसिंग अाणि इटलीतील अवतारसिंग या दाेन अनिवासी भारतीयांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात अाले. उल्लेखनीय म्हणजे खलिस्तान लिबरेशन फाेर्सच्या तिघांना अटक केल्यानंतर पहिल्यांदाच ‘सिख फाॅर जस्टिस’चे दहशतवादाशी लागेबांधे असल्याचे उघड झाले. दरम्यान, डेरा सच्चा साैदाचे प्रमुख गुरमित रामरहीमसिंग यांच्यावर २००८ मध्ये झालेला हल्ला अाणि २०१० मध्ये हलवाडा येथील वायुसेनेच्या तळावर स्फाेटके पेरून ठेवण्यासह १० प्रकरणांत खलिस्तान लिबरेशन फाेर्सचा म्हाेरक्या हरमिंदर मिंटूला पंजाब पाेलिसांनी अटक केली हाेती. हरमिंदर २०१० मध्ये युराेपातील इटली, बेल्जियम, जर्मनी अाणि फ्रान्समध्ये वास्तव्यास हाेता. त्याने २०१३ मध्ये पाकिस्तान साेडले हाेते. त्याला कारागृहातून बाहेर काढण्यासाठी रविवारी सकाळी ९.०० वाजेच्या सुमारास पाेलिसांच्या वेशात अालेल्या १० हल्लेखाेरांनी १०० फैरी झाडत फिल्मीस्टाइल हल्ला केला. गृहमंत्री सुखबीरसिंग बादल यांनी कारवाईचे साेपस्कार पार पाडले. विशेषत: तिहार कारागृहासह उत्तर भारतातील विमानतळांवरील सुरक्षा वाढवण्यात अाली तसेच माेहालीत भारत-इंग्लंड संघात सुरू असलेल्या तिसऱ्या क्रिकेट कसाेटी सामन्यात
घातपात घडू नये यासाठी सुरक्षेचे कडक उपाय याेजण्यात अाले.

तथापि, ज्या कारणांमुळे ‘जेल ब्रेक’ झाला त्याचा छडा लावणे, दाेषींवर कठाेर कारवाई करणे अाणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत यासाठी सुरक्षा व्यवस्थेत कसूर न ठेवणे हे अधिक महत्त्वाचे ठरणार अाहे. उल्लेखनीय म्हणजे १९७०-८०च्या दशकांत खलिस्तानी दहशतवादाचे थैमान माजले हाेते. जनरल अरुणकुमार वैद्य, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी, पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री बेअंतसिंग या दहशतवादाचे बळी ठरले. १९८६-८७ मध्ये पंजाबातील दहशतवादाच्या नांग्या ठेचल्या गेल्या, मात्र पाकिस्तानातील काही सक्रिय शीख संघटनांकडून पुन्हा भारतातील दहशतवादी हल्ल्यांना बळ मिळू शकते. त्यासाठी पाकिस्तानी तरुंंगात खितपत पडलेले कैदी, गुन्हेगार, तस्करांची मदत घेतली जाऊ शकते. सद्य:स्थितीत भारत-पाक अाणि भारत-चीन सीमेवर तणाव अाहेच; काश्मिरात अशांतता माजवली जात अाहे, अशा वातावरणात पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या पाठबळावर खलिस्तानचे भूत पुन्हा भारताच्या मानगुटीवर बसू पाहत असेल तर त्याची तातडीने दखल घेतलीच पाहिजे.

श्रीपाद सबनीस
बातम्या आणखी आहेत...