आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्येचा खेळ...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
जगभरातील बहुतेक देशांत या ना त्या कारणाने अात्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना साेशल मीडियावरील लाइव्ह व्हिडिअाेच्या माध्यमातून अात्महत्या करण्याचेही फॅड अवतीभोवती पाेहाेचले अाहे. ‘नेटफ्लिक्स’च्या अात्महत्येवर अाधारित मालिकेवरून अलीकडेच माेठा गहजब माजला. त्यानंतर ती बंद करण्यात अाली, ताेच हल्लीच्या अॅप्स अाणि नेटकऱ्यांच्या जमान्यात अाणखी एका ‘सुसाइड गेम’ची त्यात भर पडली. मन्मथ म्हैसकरची आत्महत्या सर्वांनाच चटका लावून गेली. त्यातच मनप्रीतच्या मृत्यूची बातमी अचानक येऊन थडकली. खरे तर पारंपरिक खेळांना नाकारून व्हिडिअाे किंवा माेबाइल गेम्समध्ये अानंद शाेधण्याचा उपद्व्याप जीवघेणा ठरत असून रशिया, ब्रिटन, अमेरिकेच्या पाठाेपाठ भारतातही किशाेरवयीन मुलांच्या अात्महत्या वाढत अाहेत. 
 
विरंगुळा म्हणून अधूनमधून खेळले जाणारे हे गेम्स अाता मुलांच्या जिवाशी खेळत अाहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच संबंधितांनी अंतर्मुख हाेऊन सारासार विचार केला पाहिजे. अलीकडच्या काळात पाॅकेमाॅन जगभर गाजला, मात्र कित्येक खेळगडी अपघातात जायबंदी झाले तेव्हा आभासी जगात भरधाव वेगाने ओढत नेणाऱ्या या खेळातला धाेका कळला. त्यापाठाेपाठ रशियात दहशत माजवलेला ‘ब्ल्यू व्हेल चॅलेंज’ चाेरपावलांनी भारतात अाला. या खुनी खेळाने इथे बस्तान ठाेकले ते कुणाला कळायच्या अातच अंधेरीतील १४ वर्षांच्या मनप्रीत सिंगच्या अात्महत्येची बातमी थडकली अन्् सगळ्यांचे डाेळे उघडले. या खुनी खेळाने एकट्या रशियात १२-१६ वयाेगटातील १३० मुलांचा, तर ब्रिटनमध्ये युलिया अाणि वेराेनिका या विद्यार्थिनींचा बळी घेतला. अमेरिका, पाकिस्तानसह १९ देशांत या ‘सुसाइड गेम’ने उच्छाद मांडला, त्यात एकंदर २०० मुले बळी पडली. मनप्रीतच्या अात्महत्येप्रकणी पाेलिस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी तपास करत अाहेत, त्यातून काही बाबी स्पष्ट हाेतील; मात्र सुखवस्तू काैटुंबिक पार्श्वभूमी असलेली मुले सारासार विचार करण्याचे का टाळतात? मुलांचे भावविश्व समजून घेण्यात पालक कमी पडत अाहेत का? 
 
या मुद्द्यावर समस्त पालकांनी गांभीर्याने अंतर्मुख व्हायला हवे अाणि अशा स्वरूपाच्या घटना टाळायच्या असतील तर पाल्याची केवळ ‘फिजिकल अाॅटाेप्सी’च नव्हे, तर ‘सायकाॅलाॅजिकल अाॅटाेप्सी’देखील करायला हवी, असे वाटते. अलीकडेच दरराेज १२ तास काॅम्प्युटर गेम खेळणारा किशाेरवयीन मुलगा दिल्लीतील रुग्णालयात दाखल झाला. कारण काय, तर या खेळाच्या नादात त्याची सारासार विचार करण्याची शक्तीच खुंटली; झाेप, कुटुंबियांशी संवाद जणू बंदच झाले. अाता त्याच्यावर उपचार सुरू अाहेत. अशा नादावलेल्या मुलांना वेळीच सावरले नाही तर घराेघरी खुनी खेळाचे डाव रंगतील हे सांगायला का हवे?  
 
‘ब्ल्यू व्हेल चॅलेंज’चे वैशिष्ट्य म्हणजे यात खेळाडूस दरराेज १ अशी ५० दिवस निरनिराळी कामे सांगितली जातात, ती पूर्ण केल्याचा पुरावाही द्यावा लागताे. अन्यथा धमकीचे मेसेज येतात म्हणे! दुर्दैवाची बाब अशी की, विशेषत: फेसबुक, इन्स्टाग्राम युजर्सला लक्ष्य बनवले जाते. हा खेळ एकदा डाऊनलाेड केला की, ताे ‘डिलिट’ किंवा ‘अनइन्स्टाॅल’ करता येत नाही; युजर्सची पर्सनल माहिती हॅक केली जाते. या ‘ब्ल्यू व्हेल’शिवाय कायली लिप चॅलेंज, डक्ट टेप चॅलेंज, चाेकिंग गेम, सिनेमन चॅलेंज, कार सर्फिंग असे काही अाॅनलाइन गेम्स अाहेत ज्यास जगभरातील १०-१८ वर्षे वयाेगटातील मुले अाहारी जात अाहेत. यामध्ये पालकांशी बाेलू नका, अशी अट घातली जाते. त्यामुळे तर मुलांची अडवणूक हाेत नाही ना? ‘हाय रिस्क’ असलेले खेळ मुले खेळत अाहेत का? हे तपासले पाहिजे. काैटुंबिक, व्यावसायिक जबाबदाऱ्यांच्या बुलडाेझरखाली चेमटून जाणारा पालक मुलांना पुरेसा वेळ देत नाही, फावल्या वेळात ताे माेबाइल, व्हिडिअाे गेम्स, टीव्हीच्या अाहारी जाताे. शिवाय याेग्य सवंगडी न मिळाल्याने बिचारी मुले अशा अाभासी जगात रमणे पसंत न करतील तरच नवल! म्हणूनच १३-१५ वयाेगटातील मुले नैराश्याच्या अाहारी जात अाहेत. भारताच्या एकूण लाेकसंख्येपैकी ५.८ टक्के म्हणजे ३.९८ काेटी मुले अाणि ३.५७ काेटी मुली किशाेरवयीन अाहेत. यापैकी २५ टक्के मुले वैफल्यग्रस्त अाहेत, तर ११ टक्के मुले अापल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत, ही  गंभीर वस्तुस्थिती अाहे. त्यासाठी बांगलादेश, भूतान, मालदीव, इंडाेनेशिया, श्रीलंकेच्या धर्तीवर भारतात देखील मानसिक आरोग्याशी निगडित उच्च गुणवत्तापूर्ण तसेच सहज सुलभ याेजना, धाेरणे अाखली गेली तरच नव्या पिढीला अविवेकी हाेण्यापासून राेखता येईल. 
बातम्या आणखी आहेत...