आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाज व्यवस्थेवरचा प्रभावी भाष्यकार, उदारमतवादी लेखक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी रात्री अरुण साधूंना रुग्णालयात दाखल केल्याचा फोन आला. सोमवारची सकाळ उजाडली. ती त्यांच्या निधनाच्या बातमीनेच थोडावेळ सैरभैर झालो. मन गलबलून गेले. तसे साधू सर जाणार याची पुसटशी कल्पना होतीच.

काही दिवसांपासून ते आजारीच होते. पण एवढ्या लवकर बातमी येईल. असे वाटले नव्हते. चार-पाच महिन्यापूर्वीच त्यांच्याशी एका लेखाच्या संबंधाने बोललो. त्यांचा आवाज खूप खाली गेल्याचे जाणवत होते. आज साधू नाहीत. पण त्यांच्या आठवणी मनात घर करुन राहिल्या आहेत. दिवसभर या आठवणीने व्याकुळ झालो होतो. अरुण साधू गेल्याने माझ्या घरातलाच एक माणूस गेला अशी भावना होत गेली. साधूच्या कितीतरी आठवणी आज माझ्या मनात आहेत.
 
सौ अरुणा वहिनींची बहिण श्रीमती कविश्वर सिडकोत रहायच्या तेंव्हा अधून मधून वहिणी आणि साधू सर त्यांना भेटायला यायचे. साधू सर आले की, “श्यामराव मी आलोय गप्पा मारायला येतो. फारस कुणाला बोलावू नका. अशा मृदू सौम्य आवाजात त्यांच्या फोन यायचा आणि अर्ध्या तासातच सर ऑफिसात येवून पोहचायचे.” इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या. चहा बरोबरच सिगरेटचा झुरका मारत सर वाड्मय व्यवहारात काय चाललय, कोणती पुस्तके चालतात नवीन लिहिणारे कोण याची चौकशी करायचे. सभौवताली माणस असली तरी ते अलिप्त असत.
 
अरुण साधूंची आणि माझी पहिली ओळख औरंगाबादेत झाली. ग्रंथालीची चळवळ नुकतीच सुरु झाली होती आणि ग्रंथालीने औरंगाबादला एक भव्य कार्यक्रमही घेतला होता. त्याला दिनकर गांगल,कुमार केतकर,अरुण साधू,र.कृ.जोशी आणि कितीतरी मान्यवर मंडळी आली होती. त्यावेळी मी नुकताच पुस्तकाच्या व्यवसायात शिरकाव केला होता. त्यामुळे दिनकर गांगलांची ओळख होती. त्यांनीच माझी अरुण साधूंशी ओळख करुन दिली. मी राजहंस प्रकाशनामध्ये आलो आणि अरुण साधू माझ्या आयुष्यात आले. राजहंसने अरुण साधूंची अनेक पुस्तके प्रकाशित केली.त्यामुळे त्या निमित्ता मला का होईना साधूंच्या जवळ जाता आले. राजहंसमध्ये आल्यानंतर मी राजहंस गप्पा सुरु केल्या. योगा योगाने कमलेश वालावलकर यांच्या मुलाखतीच्या दिवशी अरूण साधू औरंगाबादेत होते. कमलेश वालावलकर हा पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट मधील त्यांचा विद्यार्थी त्यांनीच त्याला लिहायला प्रोत्साहित केले होते. हे लक्षात घेवून अरूण साधूंच्या हस्ते मी कमलेशचा सत्कार या कार्यक्रमात केला. साधूची त्यावेळी एकच अट होती. ती म्हणजे मी स्टेजवर बसणार नाही. प्रेक्षकात बसेल आणि बोलणार तर अजिबातच नाही. अरुण साधू ख्यातनाम कादंबरीकार असल्यामुळे त्यांची उपस्थिती राजहंस गप्पांना एक मोलाचं स्थान देवून गेली.
 
अरुण साधूंचे ड्रॅगन जागा झाला हे वैचारिक पुस्तक २००५ मध्ये प्रकाशित झाले. त्यानिमित्ताने मराठवाड्यात चीन या विषयावर त्यांची व्याख्याने आयोजित केली. त्यातला एक अविस्मरणीय कार्यक्रम म्हणजे नांदेड येथे संजीव कुलकर्णी यांच्या अभंग पुस्तकालयाच्या वतीने आयोजित केलेल्या राजहंस गप्पा. अरुण साधू आणि कविता महाजन नांदेडच्या स्टेशनवर उतरले तेंव्हा या दोघांभवती वाचकांचा गराडा पडला. लोक लेखकांवर ऐवढे प्रेम करतात. हे पाहून त्यांना एकदम भरुन आले. तसे त्यांनी मला बोलवून दाखवले. या कार्यक्रमात साधूंचे चीनवर अप्रतिम भाषण झाले. जवळजवळ ते एक तास बोलले.

“जागतिकीकरणामुळे प्रगतीच्या बाबतीत अमेरिकेच्या तुलनेत चीनचा प्रभाव वाढला आणि हाच वेग कायम राहिला तर २०१५ पर्यंत चीन महासत्ता बनेल. ” असे भाकित २००६ मध्ये या कार्यक्रमात साधू यांनी केले होते. ते आता खरे ठरल्याचे दिसत आहे. याच वेळी भारताने १९७८-८९ पासूनच खुली अर्थव्यवस्था स्विकारायला हवी होती. असेही सांगितले होते. अरुण साधू हे द्रष्टा लेखक होते. दुसऱ्या दिवशी आम्ही सेलू या गावी गेलो. ते एका पुरस्कार समारंभाचे अध्यक्ष होते.त्याच बरोबर अभिनेता मकरंद अनासपुरेही होता. मकरंद अनासपुरे बरोबर आला नाही. त्याला पाहण्यासाठी खूप गर्दी जमली होती. या गर्दीसमोर अरुण साधूंना संयोजकांनी मकरंद येईपर्यंत भाषण करण्याची विनंती केली. तेंव्हा साधू माझ्याकडे पाहून “ हेची फळ मम काय तपाला” अशा अविर्भावात पहात होते.त तोच मकरंद आला आणि साधूंनी सुटकेचा निश्वास टाकला.
 
अरुण साधू प्रवासात असतांना त्या त्या गावचे वैशिष्टय जाणून घ्यायचे. विशेषत: मराठवाड्यातील राजकारण, तेथील राजकीय नेतृत्व याविषयी त्यांना खूप ममत्व वाटत असे ८० व्य अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी अरुण साधूंनी उभे रहावयाचे ठरवले. तेंव्हा मी मराठवाडाभर त्यांच्या बरोबर होतो. आमचा मित्र बबृवान रुद्रकंठावर त्यांना धनंजय चिंचोलीकर माहित होता. त्यांनी बबृवानच्या भाषा शैलीवर स्वतंत्र लेख लिहिला. अरुण साधूंनी खूप कादंबऱ्या लिहिल्या. परंतु “मुखवटा” ही कादंबरी त्यांना अतिशय आवडायची. या कादंबरीची दखल समीक्षकांनी घेतली नाही.याची खंतही त्यांना वाटायची ती त्यांनी माझ्याकडे बोलून दाखवली. अरुण साधू हे माझ्या मते शैलीदार लेखक होते. पत्रकार असल्यामुळे त्यांची भाषा अतिशय साधी आणि सोपी होती. त्यामुळेच राजकारणासारख्या विषयावरही ते अतिशय स्पष्ट परंतु लालित्यपूर्ण शैलित लिहायचे. राजकारणावर लिहिणारा असा लेखक निराळाच. त्यांनी माझे आयुष्य समृद्ध करुन टाकले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
बातम्या आणखी आहेत...