Home »Editorial »Agralekh» Signal Of Cold Wave

शीतलहरींचा गर्भित इशारा (अग्रलेख )

दिव्य मराठी नेटवर्क | Jan 10, 2013, 02:00 AM IST

  • शीतलहरींचा गर्भित इशारा  (अग्रलेख )


कडाक्याच्या अन् बोच-या थंडीने सध्या सारा माहोल जणू गोठवून टाकल्यासारखी स्थिती आहे. संपूर्ण उत्तर भारत गारठला असून जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, हरियाणा, दिल्ली, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश अशा विविध ठिकाणी तापमापकातील पारा ‘रेकॉर्डब्रेक’ म्हणावा एवढा उतरला आहे. आपल्याकडेसुद्धा ही शीतलहर तीव्रतेने पसरत असून नाशिक, मालेगाव, अहमदनगर, जळगाव या ठिकाणी तापमान लक्षणीयरीत्या खाली आले आहे. महाबळेश्वरमध्ये तर सकाळच्या वेळी दवबिंदू गोठल्यामुळे लोकांना हिमसृष्टीची अनुभूती घ्यायला मिळत आहे. डोंगरमाथ्यांवरदेखील तसाच नजारा पाहायला मिळत असल्याने सह्याद्रीचे कडे म्हणजे जणू हिमालयातील डोंगररांगा असल्याचा भास निर्माण होत आहे.

साहजिकच थंडीचा विषय सर्वत्र चर्चेत आला असला तरी त्याचे अर्थ जो तो आपापल्या पद्धतीने लावत आहे. अचानकपणे झालेल्या कोणत्याही पर्यावरणीय बदलाचे थेट परिणाम आपल्या जनजीवनावर होतातच. सध्या थंडीच्या कडाक्याचेही तेच झाले आहे. कृषी, आरोग्य, अर्थ, व्यापार, दळणवळण आदी घटकांवर त्याचा परिणाम दिसू लागला आहे. दुसरीकडे थंडीच्या कारणांची मीमांसादेखील सुरू झाली असून सध्या कुठल्याही वातावरणीय बदलाच्या चर्चेत परवलीचा शब्द बनलेल्या ग्लोबल वॉर्मिंगचे लेबल त्याला डकवण्यासाठी चढाओढ लागली आहे. तथापि, केवळ ग्लोबल वॉर्मिंगचे निमित्त पुढे करण्यावर समाधान मानण्याऐवजी थंडी वा अशा स्वरूपाच्या कोणत्याही वातावरणीय बदलामागची कारणे आणि त्याचे संभाव्य परिणाम याचा अभ्यास अधिक सखोल व सजगपणे व्हायला हवा. कारण अशा प्रकारे कुठले तरी एकच कारण वातावरणातील बदलांमागे असते असे नाही. सध्यादेखील थंडीने जो कहर केला आहे, त्यामागे सैबेरियातील थंडगार वा-यांचा वाढलेला जोर हे प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगच्या नावे गळे काढून उपयोग नाही. अलीकडे पर्यावरण विषयात काम करणा-स्वयंसेवी संस्था, त्यांचे हितसंबंधी व या विषयाबद्दल आपल्याला आस्था आहे असे दर्शवणारी काही मंडळी कुठे खुट्ट जरी वाजले तरी ग्लोबल वॉर्मिंगचाच हा प्रकार असल्याचे उच्चरवाने सांगण्यास सरसावतात. काही जण त्याविषयी खरोखरच कळकळीने बोलत असले तरी काही जणांना मात्र त्याआडून आपले ‘फंड रेझिंग’चे ईप्सित साध्य करायचे असते, हेही अनेकदा पुढे आले आहे. या सगळ्यामध्ये विषयाचे गांभीर्य कमी होते, ही बाब दुर्लक्षित होत असल्याचे नाकारता येत नाही. ग्लोबल वॉर्मिंग-ग्लोबल वॉर्मिंग अशा सततच्या नामजपाने फार काही साध्य होणार नाही, हे पर्यावरणाचा गांभीर्याने अभ्यास करणा-यांच्या आता लक्षात येऊ लागले आहे. ‘वर्ल्ड मेटॅरॉलॉजिकलर्गनायझेशन’च्या बहुतेक सदस्यांनीसुद्धा तसाच सूर लावला आहे. वातावरणातील विविध घटकांच्या एकत्रित परिणामांमुळे हवामानात बदल होत असतो.

साधारणत: 20 वर्षांच्या अंतराने हे ऋतुचक्र बदलत असते. त्या वेळी अशा प्रकारचे परिणाम ब-या चदा दिसून येत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. हे पाहता, बदलत्या तापमानाकडे अधिक व्यापकपणे पाहण्याची गरज अधोरेखित होते. कारण सभोवतालच्या वातावरणाचा, त्यातील बदलांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम प्रत्येकावर कितीही नाही म्हटले तरी होतच असतो. पीकपाण्यापासून उद्योग-व्यवसायापर्यंत अनेक बाबींवर त्याचा प्रभाव पडतो. सध्यादेखील त्याची प्रचिती येत आहे. थंडीचा कडाका सहन न झाल्यामुळे मृत्यूला सामोरे जावे लागलेल्यांचा आकडा वाढत आहे. थंडीची ही लाट आणखी आठवडाभर अशीच टिकून राहिली तर गहू वगळता द्राक्षांसारख्या नगदी पिकापासून भाजीपाल्याच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतक-या ंना पुन्हा एकदा चिंतेने ग्रासले आहे. ही स्थिती केवळ शेतकरी वा कृषी क्षेत्रापुरती मर्यादित नाही. त्याची व्याप्ती खूप मोठी म्हणजे सर्व समाजघटकांपर्यंत आहे. शेती उत्पादन घटले तर येत्या काळात भाजीपाला, धान्याचे भाव भडकणार यामध्ये शंका नाही. त्या वेळी ग्राहक म्हणजे पर्यायाने सगळ्यांवरच ताण येणे स्वाभाविक आहे. सध्या अगोदरच विविध संकटांनी घेरलेल्या आपल्या अर्थव्यवस्थेवर त्याचा अनिष्ट परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही.

उद्योग-व्यापार क्षेत्रातील काही उत्पादनांची बाजारपेठ मात्र थंडीमुळे चांगलीच गरम झाली आहे. विंटर वेअर्स, हीटर्स यांचा खप गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. एरवी थंडीच्या मोसमात जेवढी चलती असते त्या तुलनेत तब्बल 40 टक्क्यांनी सध्या अशा साधनांची मागणी वाढल्याचे जाणकारांचे मत आहे. थंडीने वाहतूक आणि दळणवळण विस्कळीत होण्याचे प्रकार तर ठिकठिकाणी अनुभवास येत आहेत. विशेषत: रेल्वे आणि विमानोड्डाणाचे वेळापत्रक कोलमडल्याने अनेकांचे नियोजन व्यर्थ ठरले. थंडीचा हा कडाका बोचरा व चावरासुद्धा असल्यामुळे आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होणे स्वाभाविक आहे. सर्दी, खोकला, ताप, त्वचेचा कोरडेपणा एवढ्यापुरताच हा परिणाम मर्यादित नाही. उत्तर भारतात थंडीच्या कडाक्याने मृत्यू पावलेल्यांची संख्या पाहता त्याचे गांभीर्य स्पष्ट होते. त्यामुळे नेहमीप्रमाणे गुलाबी वगैरे विशेषणे लावून थंडीचे होणारे कोडकौतुक यंदा जरा मागे पडले असून त्याच्या दुष्परिणामांची धास्तीच अधिक जाणवत आहे.

Next Article

Recommended