आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसटता विजयस्पर्श!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विम्बल्डनच्या टेनिस स्पर्धा पाहत असताना मला नेहमी वाटते, माझा भारत कुठे आहे? जगाच्या लोकसंख्येत दुस-या क्रमांकावर असलेला हा देश आंतरराष्‍ट्रीय स्पर्धेच्या नकाशात शोधूनही का सापडत नाही? नाही म्हणायला काही नावे डोळ्यासमोरून तरळून जातात. विजय अमृतराज, रमेश कृष्णन, लिएंडर पेस आणि महेश भूपती. ह्या सगळ्या खेळाडूंचा खेळ अप्रतिम होता. त्यापैकी काहींनी या स्पर्धेत आपला ठसा उमटवला होता. रमेश कृष्णनने तर 1979 मध्ये विम्बल्डन आणि फ्रेंच ओपन या दोन्ही स्पर्धांमध्ये ज्युनियर गटात पहिला क्रमांक मिळवून त्या वर्षीच्या जागतिक ज्युनियर गटात पहिला क्रमांक मिळवला होता. त्याच्या वडिलांनी, रामनाथन कृष्णन यांनीदेखील असाच विम्बल्डनला ज्युनियर गटातून 1959 मध्ये पहिला क्रमांक पटकावला होता. (पण त्यानंतर सीनियर गटात त्या दोघांना कधीही अजिंक्यपद मिळवता आलेले नाही!). 1999 मध्ये लिएंंडर पेस आणि महेश भूपती यांनी विम्बल्डन मेन्स डबल्समध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे. ह्या सगळ्या आपल्या देशासाठी अतिशय अभिमानाच्याच गोष्टी आहेत.


पण ह्याच विम्बल्डन स्पर्धेमध्ये रॉजर फेडरर याने मेन्स सिंगल्स स्पर्धा दहा वर्षांत सात वेळेस जिंकली आहे. फ्रेंच ओपन स्पर्धा नुकतीच पार पडली, त्यामध्ये पुरुषांत राफेल नदाल आणि स्त्रियांमध्ये सेरेना विल्यम्स हे विजयी ठरले. नदालने ही स्पर्धा आठव्यांदा जिंकली! सेरेनाने अनेक वर्षांच्या गॅपनंतर परत ही अत्यंत चुरशीची स्पर्धा जिंकली. हे सर्वच विजय परिश्रम, सातत्य, चिकाटी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जिंकण्याची उच्चतम असोशी, ह्यामुळे साध्य झाले. ह्या पार्श्वभूमीवर आपल्या वर दिलेल्या खेळाडूंचा पराक्रम फार झाकोळून जातो.

विश्वविजेतेपदाचा इतिहास बघितला तर आपल्या प्रकाश पदुकोनने 1980 मध्ये All England Badminton स्पर्धा जिंकून इतिहास निर्माण केला होता. ह्याचा आपल्याला अतिशय अभिमान वाटला होता, पण त्यानेदेखील ही स्पर्धा फक्त एकदाच जिंकली. त्याला पुन्हा या यशाची पुनरावृत्ती करता आलेली नाही. हीच कथा पुलेला गोपीचंद या गुणी खेळाडूची. 2001 मध्ये ह्यानेही All England Badminton स्पर्धा जिंकून भारताची मान उंचावली होती, पण पुन्हा काही त्याला असे यश मिळवता आले नाही. दुखापतींनी तो त्रस्त झाला आणि स्पर्धात्मक खेळातून त्याला निवृत्ती घ्यावी लागली.
माझा ह्या सर्व महान भारतीय खेळाडूंना कुठल्याही प्रकारे कमी लेखण्याचा उद्देश नाही. त्यांची कामगिरी अजोड अशीच आहे. माझा मुद्दा वेगळाच आहे. नदाल, सेरेना, फेडरर, असे खेळाडू वर्षानुवर्षे आपले अजिंक्यपद सोडीत नाहीत. चिकाटीने आणि अतिशय परिश्रमपूर्वक ते लढत आणि जिंकत राहतात, पण आपले भारतीय खेळाडू एकदा मिळवलेले यश सहसा टिकवू शकत नाहीत आणि त्यांना पुन्हा ते परत साध्य करता येत नाही. (ह्याला दोन सन्माननीय अपवाद म्हणजे, बिलियडर््सपटू विल्सन जोन्स आणि बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद!) पण सर्वसाधारणपणे भारतीय खेळाडूंच्या यशाचे सातत्य नसण्याचे कारण काय असावे, असा मला प्रश्न पडतो.


परदेशी खेळाडूंच्या बाबतीत असे दिसते की असे यश मिळाले की हे खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक आपल्या अपयशाची पूर्ण छाननी करतात. जिंकलेल्या खेळाडूंच्या व्हिडिओ टेप्स बघून त्यांच्या खेळाचे पूर्ण विश्लेषण करतात. त्यांच्या खेळण्याच्या पद्धतीतले कच्चे दुवे हेरून त्यावर मात करण्याची योजनाबद्धरीत्या तयारी करतात. त्यानुसार स्वत:च्या प्रशिक्षण पद्धतीत योग्य ते बदल करून, पुढच्या वेळेस नव्या दमाने आणि नव्या तयारीसह ते सामन्यासाठी पुढे येतात. ह्या सगळ्या मेहनतीचे फळ त्यांना मिळते आणि ते पुन्हा अजिंक्यपदी विराजमान होतात. नुसते आपल्या भारतीय खेळाडूंच्याच विरुद्ध असे डावपेच आखले जातात असे नव्हे, तर इतर कोठल्याही प्रतिस्पर्ध्यासाठी त्यांच्या प्रशिक्षणाची हीच पद्धत असते. तसेच दरवर्षी त्यांचे प्रशिक्षक खेळातल्या नवनवीन क्लृप्त्या शोधून त्यांचा सराव सतत करून घेत असतात. या पद्धतींमुळे त्यांचे खेळाडू दरवर्षी काही तरी नवीन कौशल्य आणून आपल्याला स्तिमित करतात आणि अर्थात त्यामुळे ते सातत्याने जिंकत राहतात.


ह्या उलट आपल्या खेळाडूंची आणि प्रशिक्षणाची वृत्ती जाणवते. आपला विजय हे यशोरेषेवरील शेवटचे नसून पहिले पाऊल आहे, अशी जाणीव कदाचित त्यांची नसावी. विजयाचे सातत्य हा विचारच कदाचित त्यांना नवीन आहे, असे वाटण्यासारखी ही सारी परिस्थिती आहे. विजय झाल्यावर होणा-या कौतुकाने ते आनंदी तर होतातच आणि त्यांनी आनंदी व्हायलाच हवे, पण त्याबरोबरच हा विजय आपल्यावर हे पद टिकवून धरण्याची मोठी जबाबदारी टाकून जात आहे, हे कदाचित त्यांच्या मनात ठसून राहत नसेल! त्यामुळे एक प्रकारची आनंदाची गुंगी आल्यासारखे कधी कधी वाटते. ही गुंगी, अथवा आत्मग्लानी हा एक फारच धोकादायक प्रकार आहे. कारण, एकदा जागतिक क्रमवारीत सर्वश्रेष्ठ पद मिळाले की मग आपल्याकडे अपेक्षेने बघणारे आपले असंख्य देशबांधव आणि खेळ विश्वातले उगवते खेळाडू ह्यांच्यापुढे आपलाच आदर्श उभा राहिला पाहिजे, हे भान आपल्या विश्वविजेत्यांना असायला हवे. तरच त्यांच्याकडून सातत्याने आणि चिकाटीने मेहनत होईल आणि आपण भारतीय स्पर्धकांना विश्वविजेत्यांच्या रांगेत सातत्याने बसवू शकू.


खरे म्हणजे ह्यासाठी सदैव सावध राहून कठोर मेहनत घेत राहण्याला पर्याय नाहीच! तसेच खेळातल्या नव्या नव्या क्लृप्त्या आत्मसात करून त्यांचा सराव हा असाच एक सतत चालणारा उद्योग आहे. त्यासाठी कंबर बांधून तयार राहून सदैव सराव आणि प्रशिक्षण चालू ठेवणे हे अत्यावश्यक आहे. आता ही वृत्ती फक्त खेळांच्या बाबतीतच आवश्यक नाही, तर आपल्या समाजाच्या प्रत्येक अंगात ही वृत्ती बाणवायला हवी. आपले लक्ष्य आपले अंतिम साध्य पूर्ण होईस्तोवर सोडून चालणार नाही. आपण नेहमी म्हणतो की ‘तहान लागल्यावर विहीर खणणे’ हे अतिशय मूर्खपणाचे आहे, पण हा आपल्या वृत्तीचा केवळ अर्धा भाग झाला. तहानेच्या खूप आधी विहीर तयार असायलाच हवी, हे पण तितकेच महत्त्वाचे आहे, आपण तहान ‘भागल्यावर’ काय करतो ते! तहान भागल्यावरसुद्धा आपले ध्येयावरचे लक्ष विचलित होणे परवडणारे नाही. विजयाचे सातत्य सतत डोळ्यासमोर असले पाहिजे आणि त्यासाठी सावध आणि मेहनती वृत्तीची सवय करणे अति आवश्यक आहे.