आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘व्यसनाचे द्वारे जो रंगला...’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहुचर्चित गुटखाबंदी अखेर महाराष्ट्रात लागू झाली! दोन वर्षांपूर्वी तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्री व सेवनास बंदी करणारा असाच एक आदेश केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केला होता. त्या आदेशाच्या अंमलबजावणीचे राज्यात काय झाले, हे सर्वश्रुत आहे. सार्वजनिक ठिकाणी शाळा, महाविद्यालये, बागा, रस्ते तसेच हॉटेलमध्येही धूम्रपान करण्यास बंदी घालण्यात येऊन धूम्रपान करणा-यांवर 200 रुपयांचा दंड व कारवाई असे शिक्षेचे स्वरूप होते. अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आलेले कारवाई करण्याचे अधिकार मनुष्यबळाची कमतरता असल्याने फारसे परिणामकारक झाले नाहीत! आता लागू करण्यात आलेला हा कायदा समाजात किती प्रमाणात फरक पाडतो, हे येणारा काळच सांगेल.
आपल्या समाजात व्यसनी व्यक्तींची संख्या कमी नाही. कुणाला तंबाखू, गुटखा, दारूचे व्यसन असते, कुणाला धूम्रपानाचे, कुणाला अमली पदार्थ सेवन करण्याचे, तर कुणाला कशाचे! व्यसन म्हणजे काय? सवयीचे गुलाम. एखाद्या गोष्टीची इतकी सवय होणे की त्यावाचून जगणेही अशक्य वाटणे. दारू, भांग, अफू, सिगारेट, बिडी याशिवाय आजकाल नेट र्सफिंग, मोबाइलचा अतोनात वापर, व्हिडिओ गेम्ससारखी नवीन व्यसने जन्माला आली आहेत. कोणाला कधी कशाचे व्यसन लागेल, हे सांगणे कठीण आहे. चाळिशीच्या घरातील व्यक्ती मद्यपाशात अडकल्याने त्याचे सुखी घर उद्ध्वस्त झाल्याचीही उदाहरणे आहेत. उच्चभ्रू घरातील एका स्त्रीला तर चोरी करण्याचे व्यसन होते! सर्वच व्यसने वाईट गोष्टींची असतात असे नाही. काम, वाचन, चहा, कॉफी, नाटक, सिनेमा यांचीदेखील व्यसने असतात. अर्थात ‘अति तिथे माती’ या उक्तीप्रमाणे कुठलाही अतिरेक हानिकारकच!
‘व्यसनाचे द्वारे जो रंगला... कार्यभाग त्याचा तेथेचि संपला!’ व्यसन जडलेली व्यक्ती विचार करायची क्षमता गमावून बसते. परिणामी त्याच्या कौटुंबिक जीवनाला ग्रहण लागते, मित्र दुरावतात, नोकरी पणाला लागते, शिवाय समाजात नाचक्की होते. कित्येक मद्यपींनी तर दारूच्या मोहापायी आपली घरेदारे अक्षरश: विकली आहेत. मद्यपानाने मनुष्य शारीरिक व मानसिकरीत्या दुर्बल होतो, तर धूम्रपान किंवा तंबाखूच्या सेवनाने गंभीर व्याधी जडतात. जुगारासारखे व्यसन जास्तीत जास्त पैसा मिळवण्याच्या नादात गुन्हेगारी करण्यास प्रवृत्त करते. ई-व्यसनाने तरुणांमध्ये अस्वस्थता, चिडचिडेपणा, नैराश्य जाणवते. प्रत्येक व्यसन एक प्रकारचे स्लो-पॉयझनिंगच असते, ज्याची वाट नरकाकडे नेणारीच असते.
मानसिक तणावामुळे किंवा शारीरिक आनंद मिळवण्याकरिता सुरूकेलेली एखादी गोष्ट सवयीत व कालांतराने व्यसनात कधी व कशी परावर्तित होते, हे त्या व्यक्तीलादेखील कळत नाही. ज्या वेळी त्याला याची जाणीव होते, तेव्हा तो आपले सुख-समाधान गमावून बसलेला असतो. मग जीवनातील हा पराभव पचवण्याकरिता तो अधिकाधिक व्यसनी होत जातो. अपवादात्मक असेही चित्र असते की व्यसनी मनुष्य व्यसन सोडायला तयार असतो, पण अथक प्रयत्नांनंतरही त्याला ते सोडवत नाही. असे असूनही व्यसनावर नियंत्रण शक्य आहे! मनाचा पक्का निर्धार व चिकाटी असल्यास तसेच योग्य मार्गदर्शन, औषधे, नियमित योगाभ्यासाच्या साहाय्याने व्यसनी व्यक्तीत सकारात्मक बदल घडू शकतो. याकरता क्वचित संमोहनाचादेखील उपयोग केला जातो. व्यसनी व्यक्तीला मानसिक व भावनिक आधाराची नितांत गरज असते. व्यसनमुक्तीकरिता अनेक स्वयंसेवी संघटना तसेच सामाजिक संस्था कार्यरत आहेत. अनेक व्यसनी ‘मुक्तांगण’ संस्थेच्या मदतीने व्यसनमुक्त झाल्याची खात्रीलायक माहिती डॉ. अनिल अवचट यांनी एका मुलाखतीत दिली होती. व्यसन नियंत्रणात आल्यानंतरही त्यातून पूर्णपणे सुटका होण्याकरिता व्यसनी व्यक्तींवर बारीक लक्ष ठेवणे जरुरी असते. रिकामे मन हे सैतानाचे घर असते, असे म्हणतात. त्यामुळे व्यसनाधीन व्यक्तीला मन रिझवतील अशा किंवा कुठल्याही सामाजिक कार्यात व्यग्र ठेवणे जरुरी असते. त्याचप्रमाणे ज्याचे व्यसन आहे तो पदार्थ जवळपास मिळू नये अशी काळजी घेणे आवश्यक असते. पुन्हा घातलेल्या बंदीने तंबाखू व गुटख्यावर काळाबाजार होणार, हे भाकीत ब-याच अनुभवींनी केले आहे. जी सवय आपल्या रक्तातच मुरली आहे, ती बंदीने सहजासहजी सुटणे अशक्यच आहे. परंतु या गोष्टी सहज उपलब्ध नसल्याने त्याचे सेवन काही अंशी का होईना कमी होईल, असे अनुमान आहे. अशीच बंदी हजारो कोटींचा महसूल मिळत असलेल्या परंतु हजारो लोकांच्या मृत्यूचे कारण बनत असलेल्या मद्यविक्रीवर येईल?
संत तुकाराम म्हणतात, ‘निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेचि फळ!’ अंगी निश्चयाचे बळ असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही, अगदी व्यसनमुक्तीदेखील! परंतु असा निश्चय व्यसनी करतील? आणि केलाच तरी शासनाचे धोरण तसेच इतर लोक तो किती यशस्वी होऊ देतील, याचा अंदाज बांधणे या घटकेला तरी अशक्य आहे! तूर्तास तरी आपण गुटखाबंदीचा आनंद साजरा करूया!