आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोतिबा फुले : एक झंझावात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या देशात वेळोवेळी जी वादळे उठली त्यात एक अनोखे वादळ होते आणि ते म्हणजे जोतिबा फुले. या वादळाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने मार्गातील अडथळे भुईसपाट करतानाच नवीन रोपट्यांसाठी जमीन तयार केली. ते वादळ केवळ विध्वंसक नव्हते तर त्याने नव्या युगाचा पाया रचण्याचे अलौकिक काम केले.

जोतिबांचा जन्म माळी कुटुंबात झाला आणि माळ्याने समाजातील तण निपटून काढून त्यात नव्या दमाचे, सुगंधाचे बीज रोवण्याचा प्रयत्न केला. जोतिबांनी तत्कालीन समाजाचे प्रश्न घेतले. पण ब्राह्मण समाजातील बालविधवांचा प्रश्न होता. बहुजन समाजात हे प्रश्न नव्हते. त्यांना ब्राह्मण समाजापेक्षा अधिक स्वातंत्र्य होते.

जोतिबामधली कणव ब्राह्मण विधवांचे दु:ख पाहून जागी झाली. त्यांच्या बाळंतपणाची सोय त्यांनी केली. चुकलेल्या विधवांसाठी एक निवारा त्यांनी उपलब्ध करून दिला. विधवा स्त्रियांचे केस कापू नयेत यासाठी चळवळ उभारली.
जातिव्यवस्थेने शूद्र, अस्पृश्यांना गुलाम म्हणून ठेवले होते. त्यांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक दिली जात होती. जोतिबांचे हृदय कळवळले. पण केवळ सहानुभूती दर्शवून ते गप्प बसले नाहीत. त्यांच्यातील योद्धा पुढे सरसावला. त्यांनी समाजाच्या या प्रश्नाची चिकित्सा केली. ब्राह्मणी मानसिकतेमागे त्यांची शास्त्रे आहेत, हे जोतिबांनी जाणले. त्यांनी या शास्त्रावर प्रखर हल्ला चढवला. वेदांना ते भेद मानत. त्यांच्या दृष्टीने वेद हे वाळवंटासारखे होते. मनुस्मृतीची निर्मिती विकृत विचारसरणीतूनच झाली होती. मुळावरच घाला घातला तर झाड कोलमडतं. परंतु हिंदू मानसिकतेची मुळे इतकी खोलवर रुजलेली असतात की, ती पूर्णपणे नष्ट करणे शक्यच नव्हते. डोंगर हालत नसला तरी तो हालवण्याचा प्रयत्न सुरूच तर ठेवलेच पाहिजेत ना?

जोतिबा या परिस्थितीच्या कारणांचा विचार करू लागले होते. त्यांना जे दिसले या परिस्थितीमागे शिक्षणाचा अभाव हेच कारण आहे. शिक्षणामुळे काय घडू शकते याचे चिंतन त्यांनी केले. ते जर नसेल तर मनुष्यांची स्थिती कशी होते हे त्यांनी जाणले. म्हणूनच ते म्हणतात,
विद्येविना मती गेली । मतीविना गती गेली ।।
नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले ।।
वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले।।

जोतिबांनी समाजाची नाडी तपासून त्याची कारणमीमांसा केली. रोगनिदान करून औषधोपचार सुचवला. जोतिबा दृष्टे होते. त्यांना समाजाची नवरचना करायची होती. शिक्षणाच्या स्तंभावरच आधारित असेल तर जे स्तर शिक्षणापासून वंचित आहेत अशांसाठी शिक्षणाची सोय करणे आवश्यक ठरते. जोतिबांनी हे हेरले आणि त्यांनी अस्पृश्यांच्या मुलांमुलींसाठी वेगवेगळ्या शाळा काढल्या. सावित्रीबाई स्वत: शिक्षिका बनल्या. भारतातील पहिली शिक्षिका होण्याचा बहुमान त्यांच्याकडेच जातो. जोतिबांचे आणि सावित्रीबार्इंचे कार्य म्हणजे वाघाच्या गुहेत शिरून वाघांशी दोन हात करण्यासारखे होते. जोतिबांचे धैर्य असामान्य होते. त्यात माणुसकी, मानवता अतोनात भरलेली होती. शिक्षणाची आवश्यकता हेरून त्यांनी शाळा सुरू केल्या. शिक्षक त्याच जातीचा, वर्गाचा असेल तर तो अधिक तळमळीने शिकवू शकतो, असे ठामपणे सांगितले. त्यांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे हवे होते.

शिक्षणाचा उपयोग जीवनात व्हावा, शेतक-यांच्या मुलांनी शेती शिक्षण घेऊन त्याचा उपयोग शेतीसाठीच करावा, असे त्यांना वाटत होते. ते शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत. शेती सुधारणा, पाण्याचा संचय हे त्यांच्या आवडीचे विषय होते. त्या काळी पुणे तर जातीयतेचा किल्लाच होता. तिथे ब्राह्मणांचे वर्चस्व होते. त्या पुणे शहरात जोतिबांचे कार्य सुरू झाले. त्यांना सहकारीही तसेच मिळाले. प्रिन्स आॅफ वेल्सला भेटण्यासाठी त्यांनी शेतक-याचा पेहराव केला होता. सुरुवातीला त्यांना आतमध्ये जाऊ देण्यात आले नाही, परंतु सहका-यांच्या मदतीने ते राजपुत्रास भेटण्यास गेले. त्यांच्याशी इंग्रजीतच त्यांनी भाषण केले. त्यांना विनंती केली की, इंग्लंडला परत गेल्यावर आपल्या आईला सांगावे की, भारतातील शेतकरी अत्यंत दैन्यावस्थेत राहतो आहे. निर्भीडता, चपखल बुद्धिमत्ता, नि:स्वार्थीपणा, शास्त्रांचा चिकित्सक अभ्यास हे गुण जोतिरावांच्या कार्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. जे युग अंधारयुग मानले जाते त्या युगात एका माळी कुटुंबातील माणसाने क्रांतीची मशाल पेटवावी ही इतिहासातील अघटित घटना म्हटली पाहिजे.

जोतिबांचा सत्यशोधक समाज महाराष्ट्रात दूरवर पसरला. त्याने बहुजन समाज ढवळून निघाला. महाराजा सयाजीराव गायकवाडांसारखी मंडळी त्यांच्या कार्यात सामील झाली. यातून प्रचंड जनजागरण घडून आले. आजचा महाराष्ट्र नव्हे, तर आजचा भारत जोतिबांनी घातलेल्या मजबूत पायावर उभा आहे. आजची प्रत्येक सुधारणा जोतिबांच्या संदर्भाशिवाय पूर्ण होत नाही.