आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक चैतन्य (अग्रलेख )

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मानवी मनावरील निराशेची मरगळ दूर करणारी, जगभरातील मॅरेथॉनच्या पंक्तीत आदराचे स्थान असणारी मुंबई मॅरेथॉन रविवारी झाली. युगांडाच्या जॅक्सन केप्रोपने पुरुषांमध्ये तर केनियाच्या व्हेलिंटी किप केटरने महिलांमध्ये विजेते होण्याचा मान मिळवला. आघाडीच्या सर्व स्पर्धकांमध्ये अर्थातच केनिया आणि इथिओपियाचेच स्पर्धक होते. जगात सरासरी दिवसाला एक अशा प्रमाणात या मॅरेथॉन शर्यती होत असतात. ग्रीसमधील ऑलिम्पियापासून बोस्टन मॅरेथॉनपर्यंतच्या पारंपरिक शर्यतींमध्ये पुरस्कर्त्यांच्या युगातल्या जाहिरातदारांच्या मॅरेथॉन शर्यतींची भर पडली आहे. जाहिरातदारांचा हा एक उत्सव आणि सोहळा जरी असला तरी जगातल्या प्रत्येक शहरामध्ये सहभागी होणा-यांची संख्या पाहिली की अनेक भिन्न हेतू या चळवळीने एकवटल्याची जाणीव होते.

नॉर्वेसारख्या ठिकाणी मध्यरात्रीच्या सूर्याच्या साक्षीने धावणारे धावपटू असोत किंवा मुंबईच्या घामट, बहुरंगी, बहुढंगी कोलाहलामध्ये सामील होणारे परदेशी पाहुण्यांसोबत धावणारे मुंबईकर असोत, समाजाच्या प्रवाहात स्वत:ला झोकून देणा-याच्या जिद्दीला सलाम करावासा वाटतो. केनिया, इथिओपिया, युगांडा व अन्य देशांचे धावपटू, जे आंतरराष्ट्रीय निकषांच्या उच्च पातळीवर धावत असतात, त्यांच्याच जोडीने, ‘मॅरेथॉन’ या आगळ्यावेगळ्या जिद्दीला, चळवळीला आणि सामाजिक मनोवृत्तीला साथ देण्यासाठी समाज धावत असतो. त्यात एरव्ही रिकामा वेळ नसलेले अनेक उद्योगपती असतात. ग्लॅमरस दुनियेत कायम वावरणारी ‘बॉलीवूड’सृष्टी, सितारे असतात. डॉक्टर, वकील, पत्रकार, इंजिनिअर असतात. वेगवेगळ्या खेळांमधील खेळाडू असतात. कष्टकरी मुंबईकरांच्या उदरभरणाचे प्रमुख माध्यम असलेले डबेवालेही असतात. या सर्वांचा सहभाग जिंकण्यासाठी नसतो किंवा ‘फॅशन’म्हणूनही हे सर्व जण धावत नाहीत.

जगातील आणि देशातील अस्थिर आणि अस्वस्थ वातावरणातही अंगभूत चैतन्याचे दर्शन घडवण्यासाठी ही मंडळी धावत असतात.प्रचंड मेहनत आणि सराव करून शर्यत जिंकण्यासाठी घड्याळाच्या काट्यावर नजर ठेवून धावणा-या मध्येच वर्तमानकाळाशी सामना करणारा समाज धावत असतो. त्या धावण्यातून समाजाच्या विविध अंगांचे दर्शन घडत असते. लंडनहून भारतात धावण्यासाठी आलेले 101 वर्षांचे फौजासिंग असोत वा दृष्टी नसूनही दररोज पोटासाठी धावणारे अंध धावपटू असोत. वृद्ध, अपंग, उपेक्षितांपासून सुशिक्षितांपर्यंत सर्वांनीच आपल्या अंगभूत चैतन्याचे दर्शन सहभागातून घडवले. शरीराच्या सुदृढतेपेक्षाही मनाची सुदृढता फार महत्त्वाची असते. त्या सक्षमतेचे दर्शन समाजाला घडले. जगभरातील प्रत्येक शहरामधील मॅरेथॉनमध्ये हीच गोष्ट प्रतिबिंबित होत असते. जगावर सर्वत्र अस्थिरतेचे मळभ आलेले आहे. आतंकवाद, आर्थिक मंदी, नैसर्गिक आपत्ती यामुळे जवळजवळ सर्वच देश त्रस्त झाले आहेत. त्या वातावरणापासून काही क्षण दूर नेणारी, समस्या विसरायला लावणारी ही चळवळ आहे. कुणी किती पदके पटकावली, किती रकमेचे पुरस्कार मिळवले यापलीकडे ‘तन आणि मन’ यांना घेऊन जाणारी ही धाव आहे. या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारा प्रत्येक जण आपापल्या परीने जिंकत असतो. विजेता असतो. स्वत:चे दु:ख विसरून तो धावत असतो. विरंगुळ्यासाठी, शल्य, पराभव, अपयश विसरण्यासाठी धावत असतो. ख्रिस्तपूर्व 490 च्या काळात ग्रीक योद्धा फिडिपायडस मॅरेथॉन ते अथेन्स हे अंतर विजयाची वर्दी देण्यासाठी धावला आणि गतप्राण झाला. 1896 च्या पहिल्या आधुनिक ऑलिम्पिकपासून या ग्रीक योद्ध्याच्या स्मरणार्थ मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. वर्षभर जगात 500 च्या जवळपास मॅरेथॉन शर्यतींचे आयोजन होते. कॅरिबियन बेटांपासून वाळवंटापर्यंत आणि समुद्रसपाटीपासून उत्तुंग स्थानापर्यंत शर्यत होते. जगातील सातही खंडांमध्ये मानवी सामर्थ्याला कुर्निसात करणारी ही धाव आयोजित केली जाते.

प्रत्येक शहराची, देशाची संस्कृती आपापले रंग घेऊन या चळवळीत सामील होते. लंडन, मुंबई, न्यूयॉर्क यांसारख्या सदैव धावपळीत व्यग्र असलेल्या शहरांचे दैनंदिन व्यवहार काही काळापुरते ठप्प होतात. या मॅरेथॉनची मजा त्या त्या देशांमधील प्रेक्षक, नागरिक घेत असतातच. टेलिव्हिजन कॅमे-यातून जगातील विविध भागांतील समाजाचे आगळेपण अन्य देशांमध्येही पाहिले जाते. रविवारी मुंबई आणि भारताच्या समाजाचा आरसा तमाम विश्वाने पाहिला. आर्थिक उलाढालीपलीकडचे विश्व त्यांनी पाहिले. मुंबईकरांची जिद्द पाहिली. उत्साह पाहिला. मुंबईकरांचे विविधरंगी आविष्कार पाहिले. समाजसेवेच्या कोंदणात बसवून या अशा मॅरेथॉन शर्यतींचे आयोजन केले जाते. विविध हेतूंना त्यात विविध स्तरातील मंडळी सहभागी होतात. प्रत्येकाला त्यातून काहीतरी साध्य होत असते. काही काळापुरते का होईना, त्या शहराला, राज्याला, देशाला आणि समाजाला दु:ख विसरायला लावून नव्या उमेदीची, आशेची किरणे दाखवत ही चळवळ दुस-या शहराकडे कूच करते. जात, धर्म, पंथ, वय आणि वर्ण विसरून सर्वजण समाजाचे चैतन्य सामुदायिकदृष्ट्या प्रगट करण्यासाठी उत्सुक असतात. निराशेचे वातावरण दूर करण्याची क्षमता या मॅरेथॉनमध्ये आहे. शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व समाजापर्यंत, लोकांपर्यंत पोहोचवण्याचे हे उत्तम माध्यम आहे. काही काळापुरता का होईना, समाज आगळ्यावेगळ्या बांधिलकीने एकत्र येतो. काळाची तीच गरज आहे.