आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपेक्षितांचा जागर...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

समलिंगी स्त्री- पुरुष आणि तृतीयपंथी यांचा साधा विषय जरी निघाला तरी जणू पाल अंगावर पडावी, अशी सर्वसाधारण प्रतिक्रिया उमटते. गावात असले काही नसते, शहरातच असली थेरं चालतात, अशी टिप्पणी केली जाते. शहरात गेल्यावर गरीब वस्त्यांत किंवा सिनेमा, फॅशनच्या श्रीमंत जगात पाश्चिमात्य प्रभावामुळे हे घडते, अशी निराधार प्रतिक्रिया नोंदवली जाते. त्याहीपुढे जाऊन धार्मिक संस्था, धर्मगुरू, अगदी काही डॉक्टर आणि मनोविश्लेषक धडधडीतपणे हे अनैसर्गिकच आहे, असेही ठोकून देतात. एखाद्या समाज घटकाचे अस्तित्वच नाकारले, की त्यांना समजून, सामावून घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सरकार असो वा समाज, त्याच्याबाबत कोणाचेच उत्तरदायित्व राहात नाही...
भीतीने म्हणा किंवा दयेने काही जण तृतीयपंथीयांना अपवाद म्हणून रस्ता, सिग्नल वा रेल्वेत त्यांच्या हातावर काही पैसे देऊन एकप्रकारे आलेली ब्याद घालवतात. लग्न, बारशासारख्या काही निवडक प्रसंगी त्यांना दान देऊन पुण्य कमावतात. एकीकडे, समलिंगी स्त्री- पुरुष यांच्याबाबत समाजात असलेले गैरसमज आणि शरमेची भावना, यामुळे त्यांच्यापैकी काही धैर्यवानच आपली लिंगओळख सर्वांसमोर उघड करतात, अन्यथा बहुतेक जण आपल्या ओळखीच्या किंवा समभावना असलेल्या लोकांमध्येच आपली खरी ओळख घेऊन वावरण्याचे धाडस करतात. समाजातल्या एका मोठ्या घटकाला असे दुहेरी आयुष्य जगणे नशिबी येते. या घटकाच्या वाट्याला येणारे ताण, त्यांची घुसमट याची जाणीवही उर्वरित समाजाला नसते. अशा व्यक्तिमत्त्वांचा कुठे सुगावा लागलाच, तर त्यांच्या वाट्याला हेटाळणी आणि मस्करीशिवाय दुसरे काहीही येत नाही. यातील बहुसंख्य व्यक्तींचे बालपण, तरुणपण त्यात करपून जाते...
आपण कोण याचा शोध, आपण आहोत तसे स्वत:ला स्वीकारणे, त्यानंतर आपली लिंगओळख (सेक्स) आणि लिंगभावना (जेंडर) यांचा मेळ घालून जगायला शिकणे, त्यानुसार बाह्यरूपातही बदल करणे, हा खरे तर खूप खडतर प्रवास असतो. या प्रवासात घरच्यांची, समाजाची साथ मिळाली नाही तर मध्यातच पाय लटपटायला लागतात. अनेकदा तर कोणाचीच साथ मिळत नाही. हे सारे विषण्ण करणारे अनुभव आता-आताशा वर्तामानपत्रे, पुस्तकातून येऊ लागले आहेत. मात्र, समाज त्यांना जेवढे नाकारतो तेवढाच हा समाज बंदिस्त आणि गूढ होत जातो किंवा समाजाने दिलेल्या तिरस्कार‘चे प्रत्युत्तर अत्यंत भडक आणि आक्रमक बंडखोरीने देतो... कायद्यातील ब्रिटिशकालीन कलम-377ने समलिंगी-तृतीयपंथी समाजाचे अस्तित्वच बेकायदा ठरवले. या व्यक्तींची लैंगिक आवड आणि निवड विरुद्धलिंगी नाही, हा त्यांचा गुन्हा! त्याविरुद्ध या समाजाने नेटाने लढा दिला, त्याला दिल्ली उच्च न्यायालयाने दुजोरा दिला म्हणून आज परिस्थितीत जरा फरक पडला असला, तरी अजून बरीच लढाई बाकी आहे. पालक, भावंडांनीच नाकारल्यामुळे घर, नातेवाईक तुटलेले. शिक्षण कौशल्यांचा वापर करून अर्थार्जनाचे ‘प्रतिष्ठित’ मार्ग वेगळ्या लैंगिक ओळखीमुळे बंद होतात. बहुतांश व्यक्तींची इच्छा असो वा नसो, वेगळा लिंगव्यवहार हेच उपजीविकेचे साधन ठरते. कायद्याच्या कक्षेत या व्यक्ती आणि त्यांचे व्यवहार आणखीच संदिग्ध होतात. हे सगळे पोलिसांच्या पथ्यावरच पडते. धमक्या देऊन वा ब्लॅकमेल करून यांच्याकडून पैसे उकळणे, खोटे आरोप लावून तुरुंगात टाकणे, धाक दाखवून शरीरसंबंध ठेवणे, हे नित्याचेच होऊन बसते. मग पोलिसांनीच केलेल्या अत्याचाराची दाद त्यांच्याकडेच कशी मागायची, हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकतो. त्यामुळे बºयाच वेळा या अन्यायकारक घटनांची पोलिस दप्तरी नोंदच होत नाही. साधे या समाजातील लोकांवर बलात्कार होऊ शकतो, हेही मान्य केले जात नाही. घरगुती सार्वजनिक जीवनातील हिंसा, बलात्कार, शिक्षण आणि नोकरीचा वारसा हक्क नाकारला जाणे आदी पातळ्यांवर त्यांच्यावर अन्याय होतो, त्यापैकी फारच कमी घटना पोलिस, न्याययंत्रणा आणि माध्यमांपर्यंत पोहोचतात. अशा वेळी सहवास, कुटुंब,अपत्य या त्यांच्या भावनिक गरजांवर विचार होण्यासाठी आणखी बराच पल्ला गाठायचा आहे, हे आजचे वास्तव असले तरीही हैदराबाद येथे झालेल्या चर्चासत्राने समलिंगी, तृतीयपंथी आणि शरीरविक्रय करणार्‍या घटकांमधली उमेद दुणावली आहे, हेही नाकारून चालणार नाही.

‘आमच्यावर होणारा अन्याय समजून घ्यावा’
‘सेक्स वर्कर वा तृतीयपंथी व्यक्तींना समाजात कमीपणाची वागणूक दिली जाते. हीदेखील माणसेच आहेत, याची जाणीव ठेवली जात नाही. त्यामुळे ही परिस्थिती बदलण्यासाठी प्राधिकरणाच्या सर्व अधिकार्‍यांनी या व्यक्तींना स्वत:हून कायद्याची मदत उपलब्ध करून दिली पाहिजे, असे मत प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष न्यायमूर्ती पी. सदाशिवम यांनी हैदराबाद येथील चर्चासत्रात व्यक्त केले. तर ‘सेक्स वर्कर, तृतीयपंथीयांपर्यंत कायदा सेवा नेणे अत्यावश्यक असल्याचे सांगून न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी या जनसमूहांना प्रामुख्याने पोलिस, सरकारी सुधारगृहे आणि उपलब्ध कायदे यांच्या कमतरता व संवेदनहीनतेमुळे अन्याय सहन करावा लागतो, हे वास्तव लक्षात घेता राज्य व राज्येतर अशा दोन्ही यंत्रणांकडून होणाºया अन्यायाविरुद्ध कायद्याची मदत द्यावी लागणार आहे, असे म्हटले. ‘न्यायदानाचे काम ज्यांच्यावर सोपवले आहे, त्यांच्यासमोर बोलण्याची संधी आम्हाला मिळाली ही खूप मोठी गोष्ट आहे. रोजच्या जगण्यात आम्हाला सतत अन्याय सहन करावा लागतो, या बाबी न्यायालयाने समजून घ्याव्यात, अशी भावना सोलापूरच्या ‘क्रांती महिला संघा’च्या काशीबाई जाधव यांनी व्यक्त केली. चर्चासत्रात महाराष्ट्रातून तृतीयपंथीयांसाठी काम करणाºया संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले.

mesanyogita@gmail.com