आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूकनामा : मोहितेंना तारले सहकारातील संपर्काने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमा लाटेत माढ्यातून विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीचा ‘किल्ला’ कसाबसा राखला. परंतु केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना सोलापुरातील काँँग्रेसचा ‘गड’ राखता आला नाही. निवडणूक काळात प्रचारात खरी चुरस सोलापूरपेक्षा माढा मतदारसंघात होती. मोहिते हे तशा अर्थाने सहकार क्षेत्रात जनसंपर्क असलेले वजनदार नेते. प्रतिस्पर्धी उमेदवार सदाभाऊ खोत हे ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे नेते. ऊस दरवाढीचा केवळ शेतकर्‍यांच्या आर्थिक हितसंबंधाचा मुद्दा न ठेवता स्वाभिमानी संघटनेने तो राजकीय, सांस्कृतिक हत्यार म्हणूनच प्रचारात वापरला. शेतकरीवर्गाच्या सन्मानपूर्वक श्रमहक्काचा आंदोलनातून बुलंद केलेला आवाज मतपेटीतून उमटला. राष्ट्रवादीच्या बुलंद किल्ल्याला निवडणुकीत तडा गेला नाही, पण ते टप्प्यात होते हे मतमोजणीनंतर दिसले.
वादळात तगली नाही प्रतिमा
सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसमधील वजनदार नेते अशी समाजमनात छबी. पण त्यांची प्रतिमा नागरी समाजाचे नेते, अशी काहीशी बनलेली. सोलापूर मतदारसंघाचा सुमारे चाळीस टक्क्यांहूनअधिक मतदार ग्रामीण. या भागात काँग्रेसचे संघटनात्मक जाळे तुलनेने नगण्य. शरद पवार यांचा जसा ग्रामीण जनतेच्या अस्मितेशी सहकार क्षेत्रावरील पकडीमुळे स्नेहसंबंध आहे, तसा व्यक्तिगत स्तरावर शिंदे यांची ग्रामीणवर्गाशी पूर्वी असलेलं सूत सध्या उसवलेलं. त्यामुळे सोलापूर मतदारसंघातील निवडणूक राष्ट्रवादीवर विसंबून असल्याचे लपून राहिले नाही. राखीव मतदारसंघ हे सुरक्षाकवच असताना राजकारणात नवखे असलेल्या अ‍ॅड.शरद बनसोडे यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. याचाच दुसरा अर्थ राष्ट्रीयस्तरावरील विकासशील नेतृत्व या त्यांच्या प्रतिमेपुढे ‘अच्छे दिन आनेवाले है.. या मोदी वादळात कामी आली नाही.
मोहितेंना तारले संपर्क नि प्रतिमेने
स्वाभिमानीचे खोत यांनी ऊस उत्पादकांच्या आंदोलनातून शेतकरीवर्गात विशेषत: अल्पभूधारक शेतकर्‍यांमध्ये निर्माण केलेला विश्वास. सलग तीन-चार वर्षांतील आंदोलनाच्या माध्यमातून साखर कारखानदारांविरुद्ध जनक्षोभ निर्माण करण्यात त्यांना मिळालेले यश. मराठा तत्सम माळी व धनगर जातवर्गातील मतदारांशी जवळीक या खोत यांच्या जमेच्या बाजू होत्या. राष्ट्रवादीचे मोहिते यांना उमेदवारी मिळवण्यापूर्वीपासूनच पक्षांतर्गत धुसफुसीचा सामना करावा लागला. त्यानंतर बंधू प्रतापसिंह यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधत बंडाचे निशाण फडवले. सत्तेविरोधी जनमत असले तरे मोहिते यांच्या व्यक्तिगत प्रतिमेबद्दल जनमानसात तेवढा विरोध नव्हता. राष्ट्रवादीकडे मतदारसंघातील दूध संघ, सहकारी बँँक, साखर उद्योगाच्या माध्यमातून असलेला संपर्क यामुळे त्यांची नाव मोदी वादळात कशीबशी तरली. सहकाराच्या माध्यमातून पक्ष व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मतदारांच्या दारापर्यंत असलेल्या लोकसंपर्काने मोदी लाटेला माढ्यात रोखले. शहरी नवतरुणांच्या तुलनेत ग्रामीण नवतरुण मतदार सोशल मीडियापासून दूरच आहे. त्यामुळे शहरातील तरुण ज्याप्रमाणे मोदींच्या पाठीशी होता तसे माढ्यात सार्वत्रिक चित्र नव्हते.