आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
सन 1972 नंतर या वर्षी महाराष्ट्रात पाण्याच्या प्रश्नाने उग्ररूप धारण केले आहे. जानेवारी महिन्यातच अनेक गावांमध्ये, वस्त्यांत टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. जानेवारी महिन्यात जर ही स्थिती असेल तर एप्रिल व मे महिन्यात कशी परिस्थिती निर्माण होईल या कल्पनेनेसुद्धा अंगावर शहारा येतो. या परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकार सर्व बाजूंनी प्रयत्न करत आहे. नुकतेच केंद्र सरकारकडून 750 कोटी रुपयांचे अनुदान आपल्या राज्याला प्राप्त झाले आहे. अशा बिकट परिस्थितीत केवळ सरकार दुष्काळ निवारण्यासाठी प्रयत्न करेल यावर अवलंबून न राहता राज्यातल्या प्रत्येक नागरिकाने पाणी वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असा प्रयत्न केला तर निश्चित या दुष्काळी परिस्थितीवर मात करता येईल.
पुणे महानगरपालिकेतर्फे जो पाणीपुरवठा केला जातो, तो मिनिटाला 5 ते 8 लिटर एवढा असतो. आपल्याला सरासरी 4 तास पाणीपुरवठा होतो. म्हणजे एकूण 240 मिनिटांत 1920 लिटर पाणीपुरवठा केला जातो. (या पाणीपुरवठ्यावर बिल्डिंगमधील किती फ्लॅटधारक अवलंबून आहेत त्यावर प्रत्येकाला सरासरी किती पाणी मिळेल हे ठरते) आपण तळमजल्याला टाकीत पाणी साठवतो. पंपाने 30 ते 40 फूट उंचीवरील टाकीमध्ये पाणी चढवतो. टाकीतून पाणी येताना पाण्याचा स्पीड वाढते व प्रत्येक नळातून कमी-जास्त 8 लिटर ते 15 लिटर या प्रमाणात पाणी येते. तळमजल्यातील घरांना प्रतिमिनिट 12 ते 15 लिटर पाणी येते (सध्या तर 4 मजली ते 14 मजली घरे पुण्या-मुंबईत होत आहेत. अंदाजे 70 ते 140 फूट उंचीवर टाक्या बसवल्या जातात. यातून प्रतिमिनिटाला 15 ते 20 लिटर पाणी येते.) सर्वसामान्यपणे वॉश बेसिन, सिंक आणि शॉवर या ठिकाणी पाण्याचा वापर जास्त होतो. यामध्ये 25 टक्के पाणी वापरले जाते व सुमारे 75 टक्के पाणी वाहून जाते (दिवसभरात वॉश बेसिन, सिंक आणि शॉवर या ठिकाणचे नळ किमान 1 तास चालू राहतात. मिनिटाला 12 लिटर याप्रमाणे एका तासात 720 लिटर पाणी खर्च होते. यापैकी 25 टक्के पाणी म्हणजेच 180 लिटर पाण्याचा प्रत्यक्ष वापर होतो. 75 टक्के पाणी म्हणजेच 540 लिटर पाणी वाहून जाते. सध्या एक लिटर पाणी 15 रुपयांना मिळते. म्हणजेच या वाहून जाणा-या पाण्याची किंमत प्रतिदिवस अंदाजे 8100 रुपये इतकी आहे.)
इस्रायल आणि ऑस्ट्रेलियामध्ये मिनिटाला 3 ते 5 लिटर पाणी नळामार्फत मिळते. एवढेसे पाणी पुरेसे असते, परंतु आपण मात्र मिनिटाला 12 ते 15 लिटर पाणी वापरतो. आज आपल्याला इस्रायल आणि ऑस्ट्रेलियाचे अनुकरण करण्याची वेळ आली आहे. आता नळातून पाणी कसे पडते ते पाहू. नळ शंभर टक्के सोडला तर 12 ते 15 लिटर पाणी पडते. नळ बारीक करत 50 टक्क्यांपर्यंत सोडला तरी पाण्याचा वेग वाढल्यामुळे 12 ते 15 लिटर पाणी पडते. 50 टक्क्यांच्या खाली गेल्यानंतर हळूहळू पाणी वाचवण्यास सुरुवात होते. नळ 25 टक्क्यांवर सोडल्यानंतर 3 ते 5 लिटर पाणी पडते. सर्व नागरिकांनी वरील तिन्ही ठिकाणी 25 टक्के नळ सोडल्यास 540 लिटर पाणी प्रतिघरटी वाचू शकेल. पुण्याचे उदाहरण घेतल्यास 12 लाख कु टुंबे आहेत. 12 लाख गुणिले 540 लिटर म्हणजेच 64 कोटी 80 लाख लिटर पाणी एका दिवसात वाचू शकेल. नाशिक, नगर आणि पुणे या तीन शहरांतील सर्व नागरिकांनी अशा पद्धतीने पाणी वाचवल्यास संपूर्ण मराठवाड्याला पिण्याचे पाणी सहज पुरेल.
इस्रायल व ऑस्ट्रेलियास संशोधन करावे लागेल अशा नॉझलचा शोध आम्ही लावलेला आहे. असे नॉझल बसवल्यानंतर नळ कितीही सोडला तरी मिनिटाला 3 ते 5 लिटरच पाणी पडेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.