आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक-शुकाट!(अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांना ‘ठाकरी’ भाषेत सुनावले आहे की, उगीचच ‘शुक-शुक’ करणे आणि ‘डोळे मारणे’ बंद करावे. ‘शुक-शुक’ करणे आणि ‘डोळे मारणे’ या बाबींना विशिष्ट संदर्भ आहेत. ‘रेड लाइट एरिया’ म्हणून ज्या वस्त्या ओळखल्या जातात; वा ज्या ठिकाणी तत्सम व्यवसाय चालतात, तेथे ‘शुक-शुक’ करून बोलावले जाते. परंतु राजने इतक्या असभ्य पातळीवर भाजप नेत्यांना आणले असेल असे वाटत नाही. कारण राजने शिवसेना-भाजप-रिपाइं यांच्या महायुतीत सामील व्हावे, ही तो साक्षात नरेंद्र मोदींची इच्छा आहे. राज यांचे नरेंद्र मोदी हे दैवत आहेत. मोदींच्या पायाचे तीर्थ इतर राजकीय नेत्यांनी घ्यावे, अशा अर्थाचे (पण अधिक अनुचित शब्दांत!) उद्गार राज ठाकरेंनी पूर्वी काढले आहेत.

आपण महाराष्ट्राचे नरेंद्र मोदी होऊ शकू, असे राज यांना वाटते की मोदींची तशी इच्छा आहे, हे सांगणे कठीण आहे. परंतु मोदींच्या तथाकथित ‘सद्भावना’ समारोहात राज यांना विशेष निमंत्रण होते आणि उद्धव ठाकरेंना नव्हते. मोदी यांची ‘विकासपुरुष’ म्हणून प्रतिमा उभी करण्यापूर्वी दीर्घकाळ, म्हणजे 2002 मधील मुस्लिमांच्या हत्याकांडानंतर नरेंद्रभाईंना ‘हिंदुहृदयसम्राट’ असा किताब गुजरातेतील कट्टर हिंदुत्ववाद्यांनी बहाल केला होता. त्यामुळे शिवसेना बरीच नाराज झाली होती. कारण त्यांच्या मते, बाळासाहेब ठाकरे हेच एकमेव हिंदुहृदयसम्राट! बाकी सर्व तोतया! बाळासाहेबांना मोदींविषयी प्रेम नव्हते. मोदींच्या मुंबईतील कोणत्याही सभेला बाळासाहेब बोलावल्यानंतरही हजर राहिले नव्हते. नरेंद्रभाईंनीही ‘मातोश्री’वर जाऊन बाळासाहेबांचे आशीर्वाद मागितले नव्हते. लालकृष्ण अडवाणींनाही मोदींचे ‘हिंदुहृदयसम्राट’ हे बिरूद पसंत नव्हते. कारण 1990 मधील रथयात्रा लालकृष्ण अडवाणींनी काढली तेव्हा त्या यात्रेचे सारथ्य व संयोजन मोदींकडे होते. आता सारथीच जर सम्राट झाला तर अडवाणींनी काय करायचे? म्हणूनच सारथ्याच्या पदोन्नतीच्या निषेधात अडवाणींनी राजीनामा दिला होता. परंतु मोदींच्या अश्वमेधाला तसा अपशकुन नको म्हणून थेट सरसंघचालकच मैदानात उतरले आणि त्यांनी अडवाणींना राजीनामा मागे घ्यायला लावला. स्वत:ला ‘सांस्कृतिक’ म्हणवणा-या संघटनेने अशा रीतीने प्रत्यक्ष राजकारण प्रवेश केल्याने बरीच मंडळी अस्वस्थ झाली.

भाजपमधील काही नेत्यांची समजूत होती की रा. स्व. संघाची व भाजपची ‘लिव्ह-इन’ रिलेशनशिप आहे. त्या खासगी संबंधांना असे जाहीर करणे प्रशस्तपणाचे नाही. द्विभार्याप्रतिबंधक कायदा असला तरी हिंदू समाजात अंगवस्त्र ठेवण्याची परंपरा बरीच प्राचीन आहे. अंगवस्त्र ठेवणे म्हणजे एक प्रकारे ‘लिव्ह-इन’ रिलेशनशिपच. परंतु अलीकडेच एका न्यायालयाने म्हटले की ‘लिव्ह-इन’ हे अधिकृत विवाहसदृश रिलेशन मानले जावे. मग कुणीही म्हणेल की संघाने त्यांचे भाजपबरोबरचे नाते असे जाहीर केले तर काय बिघडले? जेव्हा ते नाते गुप्त होते तेव्हा ‘शुक-शुक’ करून बोलावणे अपरिहार्य होते. पण राज ठाकरेंना तो न्यायालयीन निर्णय माहीत नसावा. त्यांना वाटले भाजप नेते सवयीनुसार ‘शुक-शुक’ करत आहेत आणि बाहेरून डोळे मारत आहेत. म्हणजे ते राज ठाकरेंना काय गि-हाईक समजतात की काय? राज तो अपमान कधीही सहन करणार नाहीत. त्यांचे व मोदींचे संबंध राजकीय सहकारातून व शैलीतील साधर्म्यातून आले आहेत. परंतु भाजपचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांना ‘शुक-शुक’ केले आणि असे गि-हाईकत्व पत्करण्यास (सध्या तरी) अजिबात तयार नसलेले राज फणकारले, ते योग्यच म्हणावे लागेल. कारण कधी उद्धव त्यांची टाळी मागतात, तर कधी रामदास आठवले राजना आवतण देतात.

राज यांना जर खात्री वाटत असेल की महाराष्ट्राचे मोदी तेच, तर ते कशाला कुणाला टाळी देतील वा डोळे मारतील? मोदी जर अडवाणींना जुमानत नाहीत तर राजने फडणवीसांना का दाद द्यावी? शिवाय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकसभा निवडणुका होतील. राजच्या पक्षाचे नाव आहे ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’. राज ठाकरेंच्या पक्षाला दिल्लीतील सत्तेची महत्त्वाकांक्षा नाही. मनसे जरी लोकसभा निवडणुका लढवणार असली तरी ते केवळ महाराष्ट्राचा बुलंद आवाज केंद्रात ऐकवण्यासाठी. समजा, नरेंद्रभाई पंतप्रधान झालेच तर ते कृतज्ञतेपोटी मनसेला एखादे खाते देतीलसुद्धा. परंतु त्या पदाचा उपयोगही मनसे महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी करणार, हे उघड आहे. म्हणजे विकासपुरुष व महाराष्ट्र-निर्माण सम्राट अशी ही युती असेल.

शिवसेनेच्या मते, मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार करायचे असेल तर ‘एनडीए’कडून ‘एनओसी’ घ्यायला हवी. परंतु ‘एनडीए’च जर खिळखिळी होत असेल तर? शिवसेनेने स्वतंत्रपणे सुषमा स्वराज यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार (बाळासाहेबांच्या इच्छेनुसार) मानले होते. तसेच अडवाणींना संघाने जरी ‘मोडीत’ काढले असले तरी शिवसेनेने मात्र त्यांना ज्येष्ठ, अनुभवी, मुत्सद्दी नेते मानले आहे. राज ठाकरेंना (सध्या तरी) ‘एनडीए’शी काहीही देणे-घेणे नाही. त्यांची आणि मोदींची स्वतंत्र ‘लिव्ह-इन’ रिलेशनशिप आहे. ‘लिव्ह-इन’ संबंधांमध्ये सवतीचे स्थान काय (किंवा तशा संबंधात सवत असू शकते का), याबद्दल न्यायालयीन निर्णय आलेला नाही. त्यामुळे राज व उद्धव एकाच वेळेस मोदींबरोबर कसे असतील? म्हणूनच राज यांनी भाजप नेत्यांना सुचवले आहे की ‘शुक-शुकाट’ बंद करा!