आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लखलखीत विजय! ( अग्रलेख )

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विश्वचषक २०१५ पेक्षाही प्रतीक्षा असलेली भारत विरुद्ध पाकिस्तान लढत रविवारी तमाम विश्वाने पाहिली. विश्वचषकाचा अंतिम सामना अशी जाहिरातबाजी करून मार्केटिंग कंपन्यांनी आपला हेतू साध्य केला असला तरीही मैदानावर भारतीयांची विश्वचषकातील पाकिस्तानला हरविण्याची परंपरा कायम राहिली.
भारतीयांनी फलंदाजी चांगली केली आणि त्यानंतर गोलंदाजी व क्षेत्ररक्षण. विराट कोहली, शिखर धवन, सुरेश रैना यांच्या फलंदाजीचे सूर आणि मोहंमद शमी, उमेश यादव यांच्या गोलंदाजीची सुरावट यांचा उत्तम ताळमेळ रविवारी साधला गेला. भारतीय फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, धोनीच्या नेतृत्वाचे सप्तसूर एकत्र नांदले आणि त्या सुरांनी पाकिस्तानवरील विश्वचषक विजयाचे आणखी एक उत्कृष्ट सौंदर्यगीत साकारले. १२६ चेंडूत १०७ धावांची शतकी खेळी करणारा विराट कोहली याने संघाच्या त्रिशतकी धावसंख्येचा पाया रचला. त्यावर ७६ चेंडूंत ७३ धावा आणि ५६ चेंडंूत ७४ धावा पटकावून धावांची टोलेजंग इमारत अनुक्रमे धवन आणि रैनाने उभी केली. यंदाच्या विश्वचषकात तीनशे धावसंख्या गाठणे अाताशा अशक्य कोटीतील गोष्ट वाटत नाही. मात्र मोहंमद शमी, उमेश यादव यांनी ते आव्हान किती खडतर आहे याची जाणीव पाकिस्तानला पदोपदी करून दिली. फलंदाजीच्या विश्वातले सर्वोच्च सम्राट म्हणजे सर डॉन ब्रॅडमन यांच्या भूमीत विराट कोहलीने महिनाभरापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीच्या दोन्ही डावांत शतके झळकाविली होती. तोच पवित्रा कायम ठेवत विराटने त्याच मातीत आपले तिसरे शतकही साकारले. अॅडिलेडमध्ये भारतीय संघाने आपला विश्वचषक मोहिमेच्या तयारीचा तळ ठोकला होता त्याचे आज सार्थक झाले.
विश्वचषक स्पर्धेच्या पाकिस्तानवरील विजयाची सिडनी, बंगळुरू, मँचेस्टर, सेंच्युरियन, चंदिगड येथे सुरू असलेली परंपरा अॅडिलेडमध्येही कायम राहिली. गेल्या ८६ दिवसांत एकही विजय न मिळविलेल्या भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्धची लढाई मात्र सहज जिंकली. शारजातील अखेरच्या चेंडूवरच्या षटकाराचा जावेद मियाँदादचा आघात केव्हाच पुसला गेला आहे. एकेकाळी पाकिस्तानविरुद्ध लढतीत दबावाखाली खेळणारे भारतीय खेळाडू गेल्या दोन दशकांत मात्र मुक्तपणे खेळताना दिसताहेत. धावसंख्या कितीही असो, ती पाकिस्तानला गाठू न देण्याची जिद्द भारतीयांनी अलीकडच्या काळात कायम दाखविली. रविवारी फलंदाजीला उतरल्यानंतर रोहित शर्मा हा मोहरा लवकर गमाविल्यानंतरही धवन-विराट जोडीने जिद्द दाखविली. त्यानंतर फलंदाजांना खेळपट्टीवर लय सापडल्यानंतर गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकांना सूर गवसला नसता तर आश्चर्य वाटले असते.
सिडनीच्या डार्लिंग हार्बरनजीक असलेल्या क्रिकेट ग्राउंडवर भारताने पाकिस्तानवरील विश्वचषक विजयाची मुहूर्तमेढ रोवली त्या वेळी पाकिस्तानला प्रोत्साहन देणाऱ्यांमध्ये खलिस्तानचे समर्थकही होते. दोन पारंपरिक योद्धे बंगळुरूमध्ये लढले तेव्हा तमाम भारतीय टीम इंडियाच्या पाठीशी होते. मँचेस्टरला मूठभर भारतीयांच्या प्रोत्साहनावर प्रचंड पाकिस्तानी समर्थकांच्या दडपणाखालीही भारतीयांनी विजय साकारला होता. दक्षिण आफ्रिकेत सेंच्युरियनला सचिनच्या बॅटच्या प्रभावाखाली पाकिस्तानचा संघ आला. चंदिगडला तर सचिनवर जीवदानांची खैरात करणारा पाक संघ - अखेर धारातीर्थी पडला. भारतीय संघाच्या या विजयांचे दडपण पाकिस्तान संघावर अधिकच वाढत आहे. अॅिडलेडला तर पाकिस्तान संघ निरुत्तर झाला व हरला. भारतीय संघाने १९९२च्या विश्वचषकापासून निर्माण केलेले हे दडपण आहे. इंग्लंड व ऑस्ट्रेलियाविरुद्ध अलीकडच्या काळात झालेल्या सलग पराभवांची मालिका, नामुष्की विसरून भारतीय संघ खेळला.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना एकमेकांविरुद्ध विजयाचा ‘स्पार्क’ हवा असतो. पाकिस्तानवरील विजय भारतीयांना स्फूर्ती देतो. आश्चर्याची गोष्ट अशी की याउलट भारताविरुद्धचा पराभव पाकिस्तान संघात अधिक ईर्ष्या, जिद्द, विजयी होण्याची प्रेरक शक्ती निर्माण करतो. भारताकडून हरल्यानंतर पेटून उठलेल्या पाकिस्तानने याच ऑस्ट्रेलियन भूमीमध्ये २३ वर्षांपूर्वी विश्वचषक जिंकला होता. इंग्लंडमध्येही भारताकडून हरल्यानंतर पाकिस्तानने थेट अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे भारताविरुद्धचा पराभव पाकिस्तानसाठी त्यांची झोप, सुस्ती उडविणारा असतो.
पाकिस्तानवरील विजयामुळे सुस्ती, बेफिकिरी येणार नाही याची काळजी आता भारतीयांनी घ्यायला हवी. ही विजयी सुरुवात म्हणजे, सध्याच्या टीम इंडियाच्या क्षमतेबद्दल निर्माण झालेल्या शंका-कुशंकांनाही पूर्णविराम देणारी म्हणावी लागेल. गटातून ४ संघ बाद फेरीत जाणार आहेत. मात्र, गटातील क्रमांक जेवढा वरचा असेल तेवढा दुबळा प्रतिस्पर्धी बाद फेरीत समोर येईल हेही लक्षात ठेवायला हवे. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत कोण प्रतिस्पर्धी हवा याची आखणी भारतीयांनी आत्तापासूनच करायला हवी. खेळाडूंना स्वत:ला आणि देशवासीयांसाठीही एक आश्वासक सुरुवात हवी होती. पाकिस्तानवरील विजयामुळे ती मिळाली आहे.