आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागोवा - निसर्गाच्या -हासाला आपणच जबाबदार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निवडणुकांच्या काळात विकासाच्या मुद्यावर निवडणुका लढवल्या जातात. परंतु विकास म्हणजे प्रत्येकाकडे जास्तीत जास्त पैसा आणि प्रत्येकाला अमर्याद उपभोगाची संधी, असा अर्थ असेल तर या वसुंधरेचे काय होईल, याची आपण कल्पनाच केलेली बरी.
आंध्र प्रदेशचा इतिहास, "नेमेचि येतो मग पावसाळा' या उक्तीप्रमाणे "नेमेचि येते मग चक्रीवादळ' असा असल्यामुळे आंध्र प्रदेशातील चक्रीवादळ हा नेहमीचा विषय झाल्यासारखे आहे. १९७५ पासून ते २०१४ पर्यंत आंध्र प्रदेशाला ६० चक्रीवादळांचा तडाखा बसलेला आहे. १९७७ च्या वादळात दहा हजार लोक ठार झाले आणि अडीच लाख जनावरे दगावली. दहा लाख घरांची पडझड झाली आणि १. ३५ दशलक्ष हेक्टर भूमीतील पिके नष्ट झाली. असेच दुसरे भयानक चक्रीवादळ १९७९ मध्ये आले होते. या वादळात ७ लाख ४८ हजार घरांची पडझड झाली होती. २०१२ च्या चक्रीवादळात त्यामानाने कमी मनुष्यहानी झाली, ३० जण दगावले आणि ७ लाख हेक्टर भूमीतील पिके नष्ट झाली. १७१० कोटी रुपयांचे नुकसान झाले.

२०१४ मध्ये आलेल्या वादळाने मनुष्यहानी कमी प्रमाणात झाली. कारण हवामान खात्याने या भयानक वादळाचा इशारा अगोदरच दिला होता. आंध्र प्रदेशचे आपत्ती निवारण नियोजन उत्तम झाल्यामुळे २ लाख ४८ हजार लोकांना स्थलांतरित करण्यात आले होते. परंतु दळणवळणाची साधने कोलमडली. पिकांचे अतोनात नुकसान झाले. विशाखापट्टणम येथील कारखान्यांचे प्रचंड नुकसान झाले. वीज, पाणी, टेलिफोन व्यवस्थासुद्धा कोलमडल्या. आंध्र प्रदेशातील लोकांना चक्रीवादळाची सवय झाल्यामुळे 'मोडला नाही कणा' ते पुन्हा उभे राहतील आणि भविष्यात येणाऱ्या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सज्ज होतील.

बंगालच्या उपसागरात ही चक्रीवादळे निर्माण होतात आणि त्यांना वेगवेगळी नावे दिली आहेत. लैला, विल्मा, कतरिना, गिल्बर्ट, हुदहुद. वादळाच्या तीव्रतेनुसार ही नावे दिली आहेत. अशी वादळे केवळ बंगालच्या उपसागरात होतात असे नाही, तर ती जगात अन्य ठिकाणीदेखील होतात. मेक्सिकोचे आखात, कॅरेबियन आखात, उत्तर अटलांटिक समुद्रात या अशा प्रकारची वादळे निर्माण होत असतात. २००५ मध्ये अमेरिकेच्या न्यू ऑरलिन्स येथे कतरिना वादळ झाले. हे वादळ अमेरिकेच्या वादळांच्या इतिहासातील अतिशय भयानक वादळ ठरले. या वादळात १८३३ लोक ठार झाले आणि १०८ दशकोटी संपत्तीचा नाश झाला. न्यू ऑरलिन्स शहर पाण्यात बुडाले, आठवडाभर पाणी शहरात राहिले.

प्रश्न असा निर्माण होतो की, समुद्रात अशी वादळे का निर्माण होतात? आणि ही वादळे निर्माण करण्यात आपला म्हणजे मनुष्यजातीचा सहभाग असतो का ? निवडणुकांच्या धामधुमीत या प्रश्नांची चर्चा करायला आपल्याला वेळ नसतो आणि त्यात कोणाला फारसा रसही नसतो. परंतु हा प्रश्न टाळून चालणारा नाही, त्याचे गांभीर्य फार मोठे आहे. चक्रीवादळांचा शास्त्रीय अभ्यास केला जातो. चक्रीवादळाचा आणि जागतिक तापमानात होणाऱ्या बदलाचा घनिष्ठ संबंध असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. गेल्या नव्वद वर्षांचा अभ्यास करून असा निष्कर्ष काढला गेला की, सृष्टीच्या तापमानात ०.७ से. बदल झाला आहे आणि या बदलाचा परिणाम म्हणून २००५ मध्ये न्यू ऑरलिन्स येथे कतरिना वादळाचा तडाखा बसला. अभ्यासांती असा निष्कर्ष निघाला की, समुद्राचे तापमान २६ से. च्या वर गेले की, जोरदार चक्रीवादळ सुरू होते. समुद्र-पाण्याचे तापमान, वातावरणाचे तापमान, हवेतील आर्द्रता, वाऱ्याचा वेग या सर्वांचे एकमेकांवर गुंतागुंतीचे परिणाम होतात आणि यातून जबरदस्त वादळांचा जन्म होतो. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित होत चालली आहे की, सृष्टीचे वाढत जाणारे तापमान आणि समुद्रात उठणारी वादळे यांचा अन्योन्य संबंध आहे. अभ्यासकांचे असे म्हणणे आहे की, यापुढे लहानसहान वादळे होणार नाहीत तर फार मोठ्या वादळांचा सामना करावा लागेल.

सृष्टीचे तापमान का वाढत चालले आहे, असा दुसरा प्रश्न निर्माण होतो. सृष्टीचे तापमान वाढण्याचे कारण मनुष्यजातच आहे. जगभर विकासाच्या वेगवेगळ्या मॉडेलचा विचार केला जातो. कोणतेही मॉडेल घ्या, त्यामध्ये दरडोई उत्पन्न आणि उपभोग याची आकडेवारी दिली जाते. जेवढे उत्पन्न अधिक तेवढा उपभोग अधिक. उपभोगाची लयलूट करणारी साधने विज्ञानाने आणि तंत्रज्ञानाने निर्माण केलेली आहेत. मोटारगाड्यांची संख्या लोकसंख्यावाढीच्या दिशेने चाललेली आहे. जगाची लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढत चालली आहे. आपण स्वतंत्र झालो तेव्हा आपली लोकसंख्या ३३ कोटी होती, आता ती १२५ कोटी झाली आहे. विकासाचा विचार करीत असताना प्रत्येकाला अन्न-वस्त्र-निवारा, शिक्षण, आरोग्य याचा विचार केला जातो. याचबरोबर दरडोई उत्पन्न कसे वाढेल याचाही विचार केला जातो आणि विकासाचा विचार करीत असताना आपल्यासमोर अमेरिका आणि युरोपातील देश असतात. आशियातील सिंगापूर, मलेशिया,जपान, कोरिया इत्यादी देश असतात.

जगभर वाढणारी लोकसंख्या आणि तिला आवश्यक असणारी उपभोगाची साधने निर्माण करण्यासाठी प्रचंड ऊर्जा लागते. ही ऊर्जा पेट्रोलियम तेलापासून मिळवली जाते. त्याचप्रमाणे दगडी कोळशापासूनही मिळवली जाते. या ऊर्जासाधनांतून वातावरणात प्रचंड प्रमाणात कार्बन सोडला जातो. त्याचा परिणाम सृष्टीचे तापमान वाढवण्यात होताे. विसाव्या शतकात सृष्टीचे तापमान ०.८ से. ने वाढले. १९८० च्या दशकामध्ये वर दिलेल्या आकडेवारीतील तापमानवाढीला चार घटक कारणीभूत आहेत. १) कार्बन डायऑक्साइड २) नैसर्गिक वायुजलन ३) सिमेंटचे उत्पादन ४) जंगलांचा नाश. जागतिक स्तरावर Intergovernmental Panel on Climate Change ( IPCC) स्थापन करण्यात आली. वातावरण आणि समुद्राचे तापमान वाढण्यासाठी मानवजातीचे कारनामे कारणीभूत आहेत. यामुळे जागतिक पर्जन्यमानामध्ये बदल होत चालले आहेत. ध्रुवीय प्रदेशावरील बर्फ वितळत चालले आहे आणि समुद्राच्या पातळीत वाढ होत चालली आहे. थोडक्यात, जागतिक तापमान वाढीसाठी मनुष्यजातीचा प्रभावच कारणीभूत ठरला आहे.

निवडणुकांच्या काळात विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या जातात. परंतु विकास म्हणजे काय आणि तो सृष्टिचक्राशी कसा संबंधित असेल, यासंबंधी कुणीच काही बोलत नाही. विकास म्हणजे प्रत्येकाकडे जास्तीत जास्त पैसा आणि प्रत्येकाला अमर्याद उपभोगाची संधी असा अर्थ झाला तर या वसुंधरेचे काय होईल, याची आपण कल्पना केलेली बरी. नैसर्गिक साधनसंपत्ती दोन प्रकारची असते. पहिल्या प्रकारात जी साधनसंपत्ती आपण वापरतो ती सृष्टीतून पुन्हा निर्माण केली जाते आणि दुसऱ्या प्रकारात जी साधनसंपत्ती आपण वापरतो ती सृष्टीतून पुन्हा निर्माण होत नाही. पुन्हा निर्माण न होणाऱ्या साधनसंपत्तीत पेट्रोलियम तेल, सर्व प्रकारची खनिजे, सर्व प्रकारचे धातू येतात. या साधनसंपत्तीची सध्या लूटमार चाललेली आहे. आपल्या हे लक्षात येत नाही की, या ब्रह्मांडात फक्त पृथ्वीच अशी आहे की, जेथे जीवसृष्टी आहे. अन्य ग्रहांवर जीवसृष्टी आहे की नाही हे आपल्याला माहीत नाही. मानवजातीची माता भूमी आहे. या मातेचे आपण वाटेल तसे शोषण करीत चाललो आहोत.

मानवजातीच्या अस्तित्वापुढे वेगवेगळया प्रकारची संकटे आहेतच. त्यातील अमर्याद उपभोगाची लालसा हे सर्वात मोठे संकट आहे. लालसा हाव निर्माण करते, स्पर्धा निर्माण करते, ईर्षा निर्माण करते, साधनसंपत्तीवर ताबा मिळवण्यासाठी अस्त्र,शस्त्र, शक्ती संपादन करण्याचा सर्वच जण प्रयत्न करतात. यामुळे सृष्टीचे तापमान आपणच वाढवत चाललेलो आहोत. त्याचा परिणाम म्हणून ऋतुचक्रात बदल होत चालला आहे. यंदा पावसाळा जून महिन्यात सुरू होण्याऐवजी जुलै महिन्यात सुरू झाला. काही ठिकाणी अजिबात पाऊस पडला नाही,तर काश्मीरमध्ये प्रलय निर्माण झाला. निसर्ग आपल्यापरीने मानवजातीला सावध करण्याचा प्रयत्न करीत असतो. आपण निसर्गाचे इशारे समजून घेतो का, असा प्रश्न आहे.