अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौर्यात कोणत्याही प्रकारचे दहशतवादी हल्ले व्हायला नकोत, असा सज्जड दम अमेरिकेने पाकिस्तानला भरला. तो आश्चर्यकारक आहे. म्हणजे ओबामा यांच्या दौ-याआधी किंवा नंतर भारतात होणारे पाकपुरस्कृत हल्ले अमेरिकेला मान्य आहेत, असा याचा अर्थ घ्यायचा काय? दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारण्याचा अमेरिकेचा कंठशोष खोटा असल्याचेच यातून स्पष्ट होत नाही काय?
ओबामा यांच्या सुरक्षेची चिंता जेवढी अमेरिकेला आहे, त्याहून अधिक भारतालाही आहे. ओबामा यांच्या भारत दौ-यातील निर्धारित कार्यक्रमादरम्यान मुंगीच्या चालीवरही सुरक्षा यंत्रणेची करडी नजर राहणार आहे. वरील इशारा देण्यापूर्वी अमेरिकेने हा विचार करायला हवा की, जेवढे ओबामा हे महत्त्वाचे आहेत, त्याचप्रमाणे भारतातील सव्वाशे कोटी जनतेचे जीवनही महत्त्वाचे आहे. ही जनता त्यांना का आठवली नाही?
हल्ले झाल्यास परिणाम भोगण्याची तयारी ठेवा, अशी धमकीही या इशा-यात दडलेली आहे. यावरून एक धक्कादायक गोष्टही सिद्ध होते ती म्हणजे अमेरिकेचे पाकिस्तानवर एवढे जबरदस्त नियंत्रण आहे की अतिरेकी हल्लेही ते रोखू शकतात. मग कायमसाठीच का रोखत नाहीत?
मुळात अमेरिकेची ती इच्छाच नाही. पाकिस्तानबद्दल अमेरिकेची काही वेगळी धोरणे आहेत. लष्करी हितसंबंध तर आहेतच, राजनैतिक करारही आहेत. शिवाय पाकचे लष्कर आणि अर्थव्यवस्थेसाठी अमेरिकी काँग्रेसने मागील दहा वर्षांत अधिकृतपणे १८०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. मात्र २०१० नंतरच्या मदतीसंबंधीचे पूर्ण आकडे अद्याप समोरही येत नाहीत. त्यानंतरच पाकिस्तानी लष्कर व आयएसआयमार्फत दहशतवादी प्रशिक्षण अड्ड्यांसाठी हा पैसा खर्च करण्यात येत असल्याचे आरोपही वाढले आहेत.
ही झाली अमेरिकेच्या निधीची बाब. भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून येणारे ओबामा पहिले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांच्याकडून वेगळ्या अपेक्षाही आहेत.
आपल्या दौ-याच्या काळातच नव्हे, तर कधीही भारतावर किंवा कोठेही हल्ले होऊ नयेत, असा इशारा त्यांनी पाकिस्तानला द्यावा. फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ला झाला तेव्हा जागतिक नेत्यांसोबत एकजूट दाखवण्यासाठी ओबामा पॅरिसला गेले नाहीत. त्यावरून बरीच टीकाही त्यांना सहन करावी लागली. नंतर त्यांनी खेदही व्यक्त केला. पण त्यांच्या अशा इशा-यांतून वेगळाच अन्वयार्थ निघतो एवढेच. पण ओबामा आपले पाहुणे आहेत. त्यांचे स्वागत आहेच. या दौ-यात ओबामा नवा पायंडा पाडतील, अशी अपेक्षा तर वाटतेच.