आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Special Article On Shivaji Maharaj Birth Anniversary

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवरायांचा आठवावा प्रताप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवरायांनी जनहिताची कामे केली. प्रजेची वाईट प्रथांच्या जाचातून सुटका केली. त्यामुळे लोकांना हे स्वत:चेच राज्य आहे असे वाटायचे आणि जो राजा आपल्यासाठी एवढे करतो, त्याच्यासाठी प्राणार्पण करण्याचीही त्यांची तयारी होती.
स्वत:साठी जगणारी माणसे आपण नेहमीच पाहत असतो. सर्व काळामध्ये अशी माणसे असतात. गरीब माणसे तर दुसर्‍याचा विचारच करू शकत नाहीत. परंतु ज्यांच्याकडे सुबत्ता आहे, जी परमार्थाचा विचार करू शकतात, अशी माणसे संख्येने खूप कमी आहेत आणि तो जर राजा असेल तर त्याने जनतेची काळजी घेण्याची जबाबदारी पार पाडलीच पाहिजे असे नाही. तो राजा असतो. त्याने राज्य करावे, आपले राज्य टिकवावे एवढीच त्याची भूमिका असते. एवढेच नव्हे तर रयतेचा छळ करून, प्रजेला वेठीस धरून, स्वत:च्या खजिन्यात भर पाडून आपल्या राज्याचा विस्तार करणारे राजे खूप आढळतात. किंबहुना, राजाचा इतिहास हा असाच आहे. रक्तपात, छळ आणि विलास हेच त्यांचे जीवन असते.
आधुनिक काळातील राजे सयाजीराव गायकवाड, छत्रपती शाहू महाराज हे वगळले तर त्यांच्या पूर्वकालीन राजांमध्ये रयतेचे कल्याण करणारे राजे शिवाजी महाराज हेच आपल्यासमोर येतात. सम्राट अशोकानंतर हेच नाव प्रकाशमान होऊन आपल्यासमोर येते. शिवाजी महाराजांनी जे कार्य केले ते स्वबळावर, एखाद्या राज्याचा वारसदार म्हणून ते जन्मास आले नाहीत. त्यांनी आपल्या राज्याची स्थापना स्वसामर्थ्याने केली. त्यांना रयतेचा पूर्ण पाठिंबा मिळत गेला. कारण या राजाने जनहिताची कामे केली. प्रजेची वाईट प्रथांच्या जाचातून सुटका केली. त्यामुळे लोकांना हे स्वत:चेच राज्य आहे असे वाटायचे आणि जो राजा आपल्यासाठी एवढे करतो, त्याच्यासाठी प्राणार्पण करण्याचीही त्यांची तयारी होती.
महाराजांच्या ताफ्यात सर्व प्रकारचे लोक होते. महाराजांसाठी आत्माहुती देण्याची त्यांची तयारी होती. असे अनेक प्रसंग आहेत की ज्यात प्राणांची आहुती देऊन महाराजांची संकटातून त्यांनी सुटका केली. महाराजांचे सैनिक पूर्णवेळ सैन्यात सामील नव्हते. ते शेतकरी मावळे होते. शेती करून पीकपाणी हाती आल्यानंतर कर्तव्यनिष्ठेने ते महाराजांच्या सेवेत सामील होऊन लढायांवर जात. लढाई संपल्यावर घरी कुटुंबात परत येत, ही आगळीवेगळी परिस्थिती होती. त्यात महाराजांवर निष्ठा दिसून येत होती. त्याआधीचे राजे रयतेला त्रासून सोडत असत. शेती पिकली नाही तर शेतसारा वसूल करत. या जुलमातून शिवाजी महाराजांनी रयतेची सुटका केली. जमिनीच्या आकारमानावर नव्हे तर पीक उत्पादनावर आधारित शेतसारा पद्धती शिवाजी महाराजांनी सुरू केली. त्यांच्या राजवटीत दुष्काळात शेतसारा वसूल करण्यात येत नव्हता.
वृक्षतोड करण्यास राजांनी मनाई केली. झाडे म्हणजे रयतेची लेकरे असे ते मानत असत. त्यांनी सैन्याला ताकीद दिली : जिथे तुमचा डेरा बसेल तेथे तुम्ही तुमच्या जेवणाची व्यवस्था तुमच्याजवळील पैशाने करावी. ‘रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये,’ अशी त्यांची आज्ञाच होती. सैन्य जर प्रवासात असेल तर त्यांनी उभ्या पिकातून जाता कामा नये. शेतकर्‍यांच्या कष्टातून वर आलेले हे पीक आहे, कोणत्याही परिस्थितीत शेतीचं, शेतकर्‍यांचं नुकसान करू नये, ही त्यांची ताकीद होती.
असा राजा जनतेच्या हृदयातील राजा होता. त्यामुळे या राजासाठी सर्वस्व अर्पण करण्याची जनतेची तयारी होती. महाराजांची एकंदरीत राज्यव्यवस्था योजनाबद्ध होती. आपल्या राज्यकारभारात त्यांंनी जातीयता आणली नाही. अस्पृश्य मानल्या गेलेल्या पण कर्तृत्ववान पुरुषांना त्यांनी मानाचे स्थान दिले. ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ या म्हणीची इतिहासाने नोंद घेतली आहे. मदारी मेहतर, हिरोजी फर्जंद ही माणसे अमर झाली आहेत. उच्च हिंदू जातीयवाद्यांनी शिवाजी महाराजांना शूद्र म्हणून जवळ केले नाही. त्यांच्या राज्याभिषेकातही आडकाठ्या आणल्या. शेवटी महाराजांना आपला राज्याभिषेक घडवून आणावा लागला.
शिवाजी महाराज मुस्लिमांच्या विरोधात नव्हते. त्यांनी सुरू केलेले राज्य धर्मवादी नव्हते. ती धर्मासाठीची लढाई नव्हती. त्या काळात लढाया केल्या जात, त्या वर्चस्वासाठी असत. त्यातून मिळणार्‍या फायद्यासाठी, धर्मासाठी लढाया असल्या असत्या तर मुसलमान मुसलमानांसोबत लढले नसते. शिवाजींच्या यंत्रणेत अनेक मुसलमान होते. त्यातील काही मोठ्या हुद्द्यावर होते. शिवाजींच्या सैन्यामध्येही मुस्लिमांची संख्या मोठी होती.
शिवाजींचा आरमारप्रमुख दौलत खान होता, तर त्यांचे वकील काजी हैदर अली हे होते. औरंगजेबाचा सरदार मिर्झाराजे जयसिंग होते, तर शिवाजींचा तोफखाना प्रमुख इब्राहिम खान होता. यात धर्मनिष्ठा नव्हती, तर ती केवळ स्वामिनिष्ठा होती.
शिवाजी महाराजांची भूमिका नेहमीच व्यापक राहिली. त्यात मानवधर्म होता. त्यांनी फर्मान काढले, माझ्या राज्यात स्त्रियांची व पुरुषांची गुलाम म्हणून खरेदी करण्यास संमती नाही. बेलवाडीच्या किल्ल्याची किल्लेदार एक महिला होती. तिने 27 दिवस किल्ला लढवला. परंतु तिला पराभव स्वीकारावा लागला. सकुजी गायकवाड या सेनापतीने त्या किल्लेदार महिलेवर अतिप्रसंग केला. ही घटना महाराजांच्या कानावर गेली. महाराजांचा संताप अनावर झाला. त्यांनी सकुजी गायकवाड याला कठोर शिक्षा सुनावली. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा प्रसंगही सर्वश्रुत आहे. महाराजांनी वतनदारी, जमीनदारी पद्धती बंद केली होती. रयतेच्या कल्याणासाठी झटणार्‍या कल्याणकारी राजास आमचा त्रिवार मानाचा मुजरा!