आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Special Comment On Spliting In Political Alliances In Maharashtra By Prashant Dixit

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विशेष भाष्य: उत्तम झाले ( प्रशांत दीक्षित)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंचवीस व पंधरा वर्षांचा संसार मोडून जनतेच्या मनातील संभ्रम संपविण्याचे उत्तम काम महाराष्ट्रातील चार प्रमुख पक्षांनी केले. आजपर्यंत एकमेकांच्या साथीने दंड फुगविणा-या चार पक्षांना आता जनता खरी ताकद दाखवून देईल. मुळात युती वा आघाडी ही मित्रपक्षांतील नव्हती. एकमेकांच्या साथीने मोठे होण्याची धडपड चारही पक्ष करीत होते. त्याला आता आळा बसेल. महाराष्ट्रावर पूर्ण नियंत्रण हाच उद्देश प्रत्येकाच्या मनात होता. हा उद्देश साध्य करण्यास दुसऱ्या पक्षाबरोबरची युती वा आघाडी ही अडचण होत होती. ती अडचण सर्वांनी स्वत:हून दूर केली.
देशातील जनमत आघाडीकडून एकपक्षीय राजवटीकडे झुकविण्याची कामगिरी नरेंद्र मोदींनी करून दाखविली. त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात करून दाखविण्याची संधी त्यांना आता मिळेल. लोकसभा निवडणुकीत भाजपची मतसंख्या ३० टक्क्यांवर गेली आहे तर शिवसेनेची २० टक्क्यांवर रेंगाळली आहे. मोदींनी देशात करून दाखविलेला चमत्कार उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रात करून दाखविणे शक्य होईल असे वाटत नाही. यामुळे स्वबळावर सत्तेवर येणे शिवसेनेसाठी अशक्य आहे. राष्ट्रवादीने सरंजामी पद्धतीने काही विधानसभा मतदारसंघ बांधले आहेत. तेथे त्या पक्षाला यश मिळाले तरी अन्यत्र त्यांच्या विरोधात वातावरण आहे.
विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा ढंग कोण ठरविणार यावर बरेच काही अवलंबून आहे. हा ढंग मोदी ठरवतील. मंगळ अभियान असो वा आजचे मेक इन इंडिया अभियान असो, अप्रत्यक्ष प्रचाराला मोदींनी सुरुवात केली आहे. हे दोन्ही इव्हेंट राज्यातील तरुण, मध्यमवर्ग व प्रगत शेतक-यांनाही भुरळ घालणारे आहेत. आजपासूनच सुरू झालेल्या अमेरिका दौ-यामुळे ते जनतेसमोर रोज राहतील. पाठोपाठ राज्यात १०-१२ प्रचारसभा घेऊन ते धुरळा उडवून देऊ शकतात. विकासाचा मुद्दा घेऊन ते प्रचारात उतरले तर महाराष्ट्र त्यांना साथ देऊ शकतो.
मोदींकडे गुजराती नेता वा शाहू, आंबेडकरांचा वैरी म्हणून पाहिले जात नाही हे अन्य पक्षांना लक्षात घ्यावे लागेल. यामुळे शिवसेनेला भावनेचे राजकारण खेळून फार मजल मारता येणार नाही. तरीही स्वबळावर सत्ता मिळण्यासारखी स्थिती कोणाची नाही. सत्तेसाठी साथसंगत करण्याची मोकळीक असावी म्हणून युती व आघाडी तोडण्यात आली आहे. देशाप्रमाणे राज्यातही एकपक्षीय राजवट आणण्याचा प्रयोग होणार आहे. तो यशस्वी ठरला नाही तर पुन्हा आघाड्यांचे राजकारण होईल व प्रचारातील शत्रू पुन्हा सत्तेसाठी मित्र बनतील.