सेना-भाजप युतीमधील तणाव ही आत्मसन्मानाची वाटाघाट नसून राजकीय सौदेबाजी आहे. दोन्ही मित्रपक्षांचे राजकीय उद्देश लक्षात घेतले तर या तिढ्याचे आश्चर्य वाटू नये. शिवसेनेला महाराष्ट्रावरील वर्चस्व कायम राखायचे आहे आणि त्याला
नरेंद्र मोदींच्या विजयानंतर भाजपकडून आव्हान मिळाले आहे.
युती सरकारवर वर्चस्व ठेवीत शिवसेनेने भाजपला अनेकदा अडचणीत आणले. सरकारचे सत्ताकेंद्र मातोश्री हेच असेल याची दक्षता बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हा घेतली. नंतरही तणाव आले; पण सत्ता नसल्याने ते निवळले. मात्र आता सत्तेचा वास लागताच मित्रप्रेम आटून सौदेबाजीला जागा मिळाली. मोदी सत्तेवर आल्यापासून सबुरीने वागणारे उद्धव ठाकरे गेल्या आठवड्यापासून आक्रमक झाले. भाजपने छुपेपणे सुरू केलेल्या दबावतंत्राला हे प्रत्युत्तर होते.
शिवसेना हा भावनेवर चालणारा पक्ष आहे. भाजपसमोर नमते घेतले असा प्रचार होणे उद्धव ठाकरे यांना परवडणारे नाही. मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा उठविण्याची अशी संधीही सेनेला पुन्हा मिळणार नाही. अधिक जागा लढवून विजयी जागांची संख्या वाढवायची आणि मुख्यमंत्रिपदावर हक्क सांगायचा ही सेनेची व्यूहरचना असावी.
भाजपच्या हे लक्षात आल्याने मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा सेनेला देण्यापेक्षा स्वत:च मुख्यमंत्रिपद मिळवावे ही भाजपची व्यूहनीती आहे. तशी राजकीय समीकरणे लक्षात येताच भाजप आक्रमक झाला व जागावाटपाचा तिढा पडला. मोदींच्या तथाकथित लोकप्रियतेवर डोळा ठेवून दोन्ही पक्ष एकमेकांचा दम जोखत आहेत. मुख्यमंत्रिपद मिळवणे हा उद्देश असताना भाषा मात्र जनहिताची व आत्मसन्मानाची सुरू आहे. दोन्ही पक्षांनी जनतेला गृहीत धरले आहे. जनता सत्तेपूर्वीच्या या सौदेबाजीने उद्विग्न झाली असली तरी त्याचे भान या पक्षांना नाही.