आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Editorial By Prashant Dixit On Delhi Assembly Election Results

विशेष संपादकीय: विलक्षण आणि भीतिदायक (प्रशांत दीक्षित)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली विधानसभा निकालांचे वर्णन विलक्षण आणि भीतिदायक या दोन शब्दांत करावे लागेल. विलक्षण यासाठी की कार्यक्षमतेच्या गप्पा करणा-यांपेक्षा सचोटीला मतदारांनी प्राधान्य दिले. सचोटी होती म्हणून झालेली चूक दुरुस्त करण्याची संधी दिली. पोशाखी, भपकेबाज प्रचारापेक्षा चोख, स्वच्छ स्वभावाला महत्त्व दिले. वल्गनांपेक्षा स्वच्छ चारित्र्याकडे अधिक लक्ष दिले. पुढील पाच वर्षांच्या विकासाच्या स्वप्नांवर भुलण्यापेक्षा अवघ्या ४९ दिवसांचा रोकडा कारभार महत्त्वाचा मानला. काम होत नसेल, दिलेली आश्वासने पुरी केली जात नसतील तर अवघ्या आठ महिन्यांत बहुमताचे रूपांतर दारुण अल्पमतात करण्याची किमया जनतेने करून दाखविली. आणि ही किमया कोणा जातीने, धर्माने, पंथाने वा समाजातील एका गटाने केली नाही, तर समग्र समाजाने केली. चेहरे व मुखवट्याचे फसवे राजकारण चालणार नाही, गप्पा विकासाच्या असतील तर रोकडा विकास करून दाखवा, अन्यथा चालते व्हा, अशी स्पष्ट समज सत्ताधा-यांना दिली. दिल्ली विधानसभेचा निकाल विलक्षण ठरतो तो यामुळे.

तथापि, हा निकाल तितकाच भीतिदायकही आहे व हे आत्ताच समजून घेणे गरजेचे आहे. सचोटीला मिळालेले बहुमत हे पाशवी आहे. विरोधी आवाजाला या बहुमताने जागाच ठेवलेली नाही. सत्ताधा-यांवर अंकुश ठेवण्याची संधीच दिलेली नाही. सत्ताधा-यांना तक्रार करण्यास जनतेने जागा ठेवली नाही, त्याचबरोबर सत्ताधा-यांबद्दल तक्रारीचा आवाज विधिमंडळात उठणार नाही, अशीही व्यवस्था केली. जनमताचा असा कौल लोकशाहीसाठी धोकादायक आहे. जनमताचा झोका इतका एकांगी झुकणार असेल तर लोकशाही व्यवस्थेचे आरोग्य संकटात पडू शकते. लोकशाहीमध्ये सचोटीच्या सत्ताधा-यांबरोबर काकदृष्टीच्या विरोधकांचीही गरज असते. या दोघांमधील संतुलनावरच लोकशाहीचा डोलारा उभा राहतो. संसद वा विधिमंडळ हे एकखांबी बनले तर जनतेमधील असंतोषाचा, जनतेच्या व्यथांचा, जनतेच्या मागण्यांचा आवाजच सभागृहात उठत नाही.
आघाडी सरकारांचा गबाळा कारभार विकासाला मारक असतो तसाच पाशवी बहुमताचा आधारही विकासाचा समतोल ढासळवू शकतो. रशिया, चीनसारख्या अन्य काही देशांतील निवडणुकांमध्ये सत्ताधा-यांना ९५ टक्क्यांहून अधिक मते मिळतात. त्या निवडणुकांची भारतातच नव्हे, तर जगात खिल्ली उडविली जाते. मात्र, दिल्लीतील मतदारांनी लोकशाही मार्गाने, नि:पक्षपातीपणे हाताळलेल्या निवडणुकीत रशिया, चीनसारखे मतदान करावे ही वस्तुस्थिती विलक्षण व भीतिदायक आहे.