आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष संपादकीय : दोन भारतरत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पृथ्वीतलावरच्या कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना आपल्या क्रिकेटने आणि नम्रतेने प्रेरित आणि प्रोत्साहित करणारा सचिन तेंडुलकर व रसायनशास्त्रामध्ये जगन्मान्य संशोधन करणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ सीएनआर राव यांना ‘भारतरत्न’ हा देशातील सर्वोच्च सन्मान जाहीर करून दोन वेगळ्या क्षेत्रांतील दिग्गजांच्या मौलिक कामगिरीचा केंद्र सरकारने यथार्थ गौरव केला आहे. या दोन महनीय व्यक्तींपैकी सचिन तेंडुलकरने क्रिकेट या खेळाचा खरा आनंद आपल्या क्रीडा कौशल्याने आणि वर्तणुकीने दिला. सर्वार्थाने अजातशत्रू असलेल्या भारताच्या या मास्टर ब्लास्टरची क्रिकेटच्या मैदानावरची निवृत्ती प्रत्येकाच्या मनात घर करून राहिली. ज्यांचा देव-अध्यात्मावर विश्वास नाही, त्यांनाही त्याने दैवी-आध्यात्मिक आनंद दिला. ही त्याची आध्यात्मिक ताकद आणि सामर्थ्य त्याच्या खेळातूनच व्यक्त झाले नाही तर त्याच्या अवघ्या व्यक्तिमत्त्वातच प्रतीत होत गेले.
क्रिकेट हा खेळ त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे एक अविभाज्य अंग होते. एक अब्ज भारतीयांचे आणि जगातील कोट्यवधी क्रिकेटरसिकांचे प्राण त्याच्या बॅटमध्ये आणि मनात साठवले होते. त्याची लोकप्रियता केवळ क्रिकेट या खेळापुरतीच मर्यादित राहिली नव्हती. त्या परिसीमा अमर्यादित होण्याचे कारण त्याची साफ-स्वच्छ प्रतिमा. भारतीय संस्कृतीची नीतिमूल्ये स्पष्ट करणारी त्याची व्यक्तिरेखा. मैदानावरची त्याची खिलाडू वृत्ती. प्रतिस्पर्धी खेळाडूंकडूनही व्यक्त होणारा त्याच्याविषयीचा पराकोटीचा आदर. वरिष्ठांबद्दल आदर बाळगण्याची त्याची मानसिकता. समोरच्यांना समजून घेण्याची आकलनशक्ती. गुरुजनांचा आदर करण्याची सवय. या सर्व गुणांनी संपन्न अशा क्रिकेटच्या दुनियेतल्या या एका महान खेळाडूला त्या खेळाचेच प्रेषित केले. क्रिकेट या खेळाच्या सतत मलिन होत चाललेल्या प्रतिमेला उंचावण्याचा सतत प्रयत्न करणारा तो एक राजदूत ठरला. आपल्या क्षेत्रात सर्वोत्तम होताना केवळ त्या क्षेत्रापुरतीच त्याची लोकप्रियता मर्यादित राहिली नाही, हे विशेष.
क्रिकेट या खेळाचा आनंद गेली 24 वर्षे तमाम विश्वाला देत असतानाच आचरणाचे आदर्श पाठही त्याने जगाला दिले. एखाद्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची उंची गाठताना अन्य आघाड्यांवरही सत्शील, सुयोग्य, आदर्श वागणुकीची शिकवण देणारा असा भारतरत्न आगळावेगळा ठरला. सचिनच्या ज्या गुणांची चर्चा होते, त्या स्वभावाला अनुसरून सचिनने आपल्याला मिळालेल्या हा भारतरत्न सन्मान आपल्या मातेला-रजनी तेंडुलकर यांना अर्पण केला आहे. मानमरातब, प्रचंड पैसा, लौकिक मिळाल्यानंतरही एखाद्या व्यक्तीला आपले आई-वडील, नीतिमूल्ये, कौटुंबिक एकता सांधणारे बंध किती महत्त्वाचे वाटतात, याचेच हे उदाहरण आहे. सचिनच्या स्वभावधर्मानुसार त्याची ही कृती अनपेक्षित नव्हती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, आचार्य विनोबा भावे, जे. आर. डी. टाटा, पांडुरंगशास्त्री काणे, लता मंगेशकर, भीमसेन जोशी या महाराष्ट्रीय भारतरत्नांच्या उदात्त अशा सन्मान रांगेत आज सचिन रमेश तेंडुलकर विराजमान झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असतानाच त्याला मिळालेली ही रत्नांकित भेट आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ रसायनशास्त्रज्ञ सीएनआर राव यांची भारतरत्न या सर्वोच्च सन्मानासाठी झालेली निवड हीदेखील अत्यंत सार्थ आणि आजवरच्या त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करणारी आहे. आपल्या अजोड फलंदाजीने मैदान गाजवत आबालवृद्धांच्या गळ्यातला ताईत बनलेला सचिन आणि रसायनशास्त्रासारख्या किचकट विषयात प्रगाढ संशोधन करणारे राव यांच्या क्षेत्रांत महदंतर असले तरी उभयतांचे कार्य अजोड असेच आहे.
क्रिकेटवेड्यांच्या आपल्या देशात सचिनबाबत प्रत्येकाला अगदी खडान् खडा माहिती असली तरी राव यांच्या कामाची खरी जाण त्या तुलनेत फारच कमी जणांना असेल. मात्र, आता त्यांच्याही कार्यावर नव्याने झगझगीत प्रकाशझोत पडेल, यात शंका नाही. तत्कालीन म्हैसूर इलाख्यातील बंगळुरूमध्ये 30 जून 1934 रोजी चिंतामणी नागेसा रामचंद्र राव अर्थात सीएनआर राव यांचा जन्म झाला. भारत स्वतंत्र होऊन प्रजासत्ताकाचे वारे नुकतेच वाहू लागले होते, त्या सुमारास म्हणजे 1951मध्ये राव पदवीधर झाले. त्या काळातील ध्येयधोरणांवर सर्वाधिक प्रभाव होता तो अर्थातच पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंचा. त्यांच्याच विज्ञानवादी दृष्टिकोनामुळे त्या काळात संशोधन कार्यात काम करण्यासाठी पोषक असे वातावरण निर्माण झाले. भारताची आंतरराष्‍ट्रीय स्तरावर आज जी विज्ञानझेप दिसते ती केवळ चांद्रयान वा मंगळवारी पुरतीच मर्यादित नाही; तर संशोधनवृत्ती जोपासायची जी परंपरा त्या काळी सुरू झाली, त्याचा हा व्यापक आविष्कार आहे. भारतातील हा वैज्ञानिक रेनेसाँ खरे तर 19व्या शतकात जगदीशचंद्र बोस व त्यांच्या सहका-यांनी सुरू केला आणि नोबेल पुरस्कारप्राप्त सीव्ही रामन, डॉ. होमी भाभा, विक्रम साराभार्इंसारख्या अनेक दिग्गजांनी पुढे सुरू ठेवलेली ही परंपरा राव यांच्यापर्यंत आजवर अगदी देदीप्यमानपणे जपली गेली आहे. विशेषत: स्वातंत्र्योत्तर काळात सुरुवातीला राबविल्या गेलेल्या ध्येयधोरणांमुळे ही परंपरा अधिकच तेजोमयी बनली.
आजचे आपले वैज्ञानिक कर्तृत्व व चारित्र्य हे पं. नेहरूंच्या विज्ञानवृत्तीतून साकारलेले भारतीय शिल्प आहे. सध्या नेहरूंच्या विचारावर आणि त्यांच्या कर्तृत्वावर शिंतोडे उडवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत असताना राव यांना भारतरत्न देऊन केंद्र सरकारने त्या उज्ज्वल विज्ञान परंपरेचे जतन केल्याचे म्हणावे लागेल. कारण, सॉलिड-स्टेट अँड मटेरिअल केमिस्ट्रीसारख्या विज्ञानाच्या अत्यंत क्लिष्ट शाखेत प्रोफेसर राव यांनी बजावलेली कामगिरी केवळ देशपातळीवरच नव्हे तर संपूर्ण जगभरात मान्यता पावलेली आहे. त्यामुळेच भारतातल्या विविध विद्यापीठांबरोबरच ऑक्सफर्ड, केंब्रिजसारख्या अत्यंत प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये त्यांना अभ्यागत अधिव्याख्याता म्हणून पाचारण केले जाते. 1961मध्ये डॉक्टरेट प्राप्त केल्यानंतर लगेचच दोन वर्षांत ते आयआयटी कानपूरमध्ये दाखल झाले व तेथून पुढे त्यांचा शैक्षणिक तसेच संशोधनविषयक आलेख कायम चढताच राहिला आहे. आयआयटी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्ससह देशविदेशातील अनेक आघाडीच्या संस्थांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावल्यानंतर पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार मंडळाचे प्रमुख म्हणूनही ते समर्थपणे जबाबदारी पेलत आहेत. सीएनआर राव यांना आजवर अनेकविध पुरस्कारांसोबत पद्मश्री, पद्मविभूषण यांसारखे सन्मान बहाल करण्यात आले आहेत. आता भारतरत्नच्या रूपाने त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. प्रत्येक प्रगतशील भारतीयासाठी ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.