आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिकीकरणाचे दु:स्वप्न की नवा डाव? (विशेष संपादकीय)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोनाल्ड ट्रम्प यांना पसंती का दिली गेली, हा केवळ अमेरिकाच नव्हे तर जगासाठी महत्त्वाचा प्रश्न. प्राथमिक अंदाजानुसार ही जागतिकीकरणविरोधी प्रतिक्रिया आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा खणखणीत विजय काहींना कोड्यात टाकणारा तर काहींना उद्विग्न करणारा आहे. जगभरातून फक्त निंदा व शेरेबाजीची शिकार झालेला अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा हा पहिलाच उमेदवार असावा. अमेरिकेतील पुराणमतवादी वृत्तपत्रे सोडल्यास जगभरातील प्रभावी माध्यमे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात होती. आदर खूप दूर राहिला, ट्रम्प यांच्याबद्दल दोन शब्द बरे बोलणारे माध्यमांमध्ये कोणी सापडले नसते. बेमुर्वतखोर, अहंकारी, पैशाचा माज असलेला उद्योगपती अशी त्यांची प्रतिमा उभी होती. स्त्रियांबद्दलची त्यांची अनुदार वक्तव्ये आणि मिजास दाखविणारी देहबोली ही प्रतिमा अधिक काळी करीत होती. स्त्रियांबद्दल या व्यक्तीचा दृष्टिकोन केवळ वैषयिक असल्याचे, स्त्रीकडे हा माणूस फक्त भोगवस्तू म्हणूनच पाहत असल्याचे त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या संभाषणातून सिद्ध होत होते. गेली ८ वर्षे अमेरिकेने बराक ओबामा यांच्यासारखा सुसंस्कृत अध्यक्ष जगासमोर ठेवला. त्याच अमेरिकेतून डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखी उद्दाम व्यक्ती समोर यावी याचे आश्चर्य जगाला वाटले. ट्रम्प यांच्यासारखा माणूस अध्यक्ष होऊच कसा शकतो, असा प्रश्न विचारला जात होता. आपल्याकडील माध्यमांतून थोडा अधिकच त्वेषाने विचारला गेला. कारण कुठेतरी मोदी-ट्रम्प यांची तुलना होत होती. बेताल वक्तव्यांमुळे ट्रम्प निवडून येणे शक्य नाही असे सांगितले जात होते. मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा हिलरी क्लिंटन यांच्या विजयाची शक्यता ९० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले. मात्र मतमोजणी सुरू झाल्यावर न्यूयॉर्क टाइम्सला अंदाज बदलावा लागला व ट्रम्प यांच्या विजयाची शक्यता ९८ टक्क्यांवर गेली. अमेरिकेतील लोकांपासून तेथील माध्यमे किती तुटली आहेत याचा अंदाज यावरून येईल. अमेरिकेतील मोठा वर्ग ट्रम्प यांना पाठिंबा देत होता, त्यांच्या वाह्यात वक्तव्यांकडे दुर्लक्ष करीत होता हे माध्यमांच्या लक्षात आले नाही.

ट्रम्पना पसंती का दिली गेली, हा प्रश्न केवळ अमेरिका नव्हे तर जगासाठी महत्त्वाचा आहे. प्राथमिक अंदाजानुसार ही जागतिकीकरणाच्या विरोधातील प्रतिक्रिया आहे. त्याचबरोबर ओबामा व हिलरी क्लिंटन यांच्या कारभाराच्या विरोधातही मतदान आहे. ओबामा यांचे बरेच कौतुक होते. व्यक्तिगत स्वभावगुणात ते जगातील अनेक नेत्यांपेक्षा उजवे आहेत यात शंका नाही. मात्र अमेरिकेच्या कारभारावर ते ठसा उमटवू शकलेले नाहीत. त्यांच्या काळात अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारली असली तरी रोजगार वाढला नाही. कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क अशा प्रदेशात श्रीमंती आली. परंतु मध्य अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये बेकारांची संख्या वाढली. जागतिकीकरणामुळे उद्योग अन्य देशात गेले. त्यातून उद्योगपती श्रीमंत झाले, पण तो पैसा समाजात झिरपला नाही. त्यात भर पडली ती अत्याधुनिक तंत्रज्ञानाची. स्वयंचलित तंत्रज्ञानामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. गेल्या आठ वर्षांत भरभराट झाली ती अमेरिकेतील कुशल कामगार वर्गाची. अकुशल कामगार अधिकाधिक गरीब होत गेला. हेच अकुशल, कमी शिकलेले तरुण आणि प्रौढ पुरुष यांनी ट्रम्प यांना मुख्यत: मतदान केले. स्थलांतरित नोकऱ्या पळवीत आहेत हे तरुणांना दिसत होते, तर उतारवयातील जगणे महाग होत चालल्याचे वयस्कर मंडळी अनुभवीत होती. त्यात भर पडत होती ती दहशतवादी हल्ल्यांची व ढासळत जाणाऱ्या कौटुंबिक व सामाजिक चौकटींची. याची तीव्र प्रतिक्रिया लोकांमधून उठली. शिवराळ म्हणता येईल अशा भाषेत ट्रम्प बोलत होते. गोऱ्या वंशाचा अभिमान त्यांनी लपवून ठेवला नाही. मात्र पत्रकारांना शिवराळ वाटणारी भाषा जनतेसाठी सडेतोडपणाची होती. जनतेच्या भावना त्यांच्याच शब्दात कोणीतरी बोलत होता. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमधील सत्तेच्या चौकटीवर तिखट भाषेत टीका केली. स्वत: ट्रम्प हे तसे राजकारणाला परके. त्यांना पक्षातूनही प्रथम पाठिंबा नव्हता. ते ‘अराजकीय’ व्यक्तिमत्व होते. अशा अराजकीय व्यक्तीने सत्तेच्या चौकटीवर प्रहार करायला सुरुवात केली की सामान्य जनतेला ते आवडते. ही अराजकीय प्रतिमा डोनाल्ड ट्रम्प यांना फायद्याची ठरली. प्रतिस्पर्धी क्लिंटन या कायम सत्तेच्या चौकटीत राहिलेल्या होत्या. सत्तेची फळे अनेक वर्षे चाखत होत्या आणि मग पुरोगामी भाषा बोलत होत्या. पोटाची चिंता असलेल्या अमेरिकेला ही भाषा पटत नव्हती. या लोकांना जुनी, परंपरागत, पुराणमतवादी अमेरिका आपलीशी वाटत होती. ट्रम्प यांनी महिलांवर अतिशय खालच्या भाषेत टिपण्णी केली, पण हिलरी त्याविरोधात आवाज उठवू शकल्या नाहीत. कारण त्यांचे पती बिल क्लिंटन यांनी व्हाईट हाऊसमध्येच काय दिवे लावले होते ते जगाला कळले होते. सत्तेच्या चौकटीवरचा जनतेचा राग इतका टोकाचा होता की अनुभवी हिलरींपेक्षा तीन वेळा बोहल्यावर चढलेले, अश्लाघ्य भाषेत स्त्रियांबद्दल बोलणारे, लंपट ट्रम्प जनतेला आपले वाटले. ट्रम्प हे वांशिक विद्वेष पसरवीत आहेत म्हणून त्यांना बाद करा असा प्रचार होत होता. पण वंश हाच मला सुरक्षित ठेऊ शकतो, नोकऱ्यांसाठी येथे येणारे उपरे माझ्या वंशालाच धोका निर्माण करीत आहे अशी सामान्य अमेरिकनाची भावना होती. दहशतवाद्यांच्या लहानसहान हल्ल्यांमुळे येणारी असुरक्षितता व स्थलांतरीतांमुळे येणारी आर्थिक असुरक्षितता यामध्ये सापडलेल्या या अमेरिकेला डोनाल्ड ट्रम्प यांची उद््ाम भाषा आधार देणारी वाटली तर नवल नाही.

ही निवडणूक अमेरिकेची असल्यामुळे ट्रम्प यांनी दिलेले आव्हान हे फक्त वॉशिंग्टनमधील सत्तेच्या चौकटीपुरते नाही. अमेरिकेची धोरणे जगावर प्रभाव टाकतात. ट्रम्प यांचे आव्हान या धोरणांनाही आहे. या धोरणांमुळेच अमेरिका अडचणीत सापडली असे ट्रम्प यांना वाटते. यामुळेच ट्रम्प यांच्या निवडीमुळे जगाची झोप उडाली आहे. जगाची सध्याची जडणघडण ते बदलून टाकणार का, अशी धास्ती जगाला वाटते. क्लिंटन निवडून आल्या असत्या तर सध्याची चौकट कायम राहिली असती. आता तसे होणार नाही. कोरिया, जपान, युरोप यांच्याबरोबर चीनही ट्रम्प यांच्या रडारवर आहे. काटा रुतावा अशी वक्तव्ये ट्रम्प यांनी या देशांबाबत केली आहेत. भारताबद्दल त्यांचे मत चांगले असले तरी मुळात भारताला अमेरिकेबद्दल जितके प्रेम वाटते तितके अमेरिकेला कधीच वाटत नाही. अमेरिका स्वत:चा स्वार्थ पाहते. भारतीयांनी नोकऱ्या पळविल्या तर ट्रम्प यांना आवडणार नाही, मात्र दहशतवादासारख्या विषयात ते भारताला मदत करू शकतात. जॉर्ज बुश यांच्यावर भारतीय माध्यमांनी कायम टीका केली असली तरी केवळ त्यांनाच भारताबद्दल जिव्हाळा होता. ओबामा परिस्थितीप्रमाणे भारताबरोबर संबंध ठेवत होते. ट्रम्प यांच्याबद्दल आत्ता काहीच सांगता येत नाही. ट्रम्प हे अराजकीय व्यक्ती असल्याने त्यांच्याबद्दल जगाला फार माहिती नाही वा जगातील नेत्यांशी त्यांचे संबंध नाहीत. अतिशय बेभरवशाचे व्यक्ती म्हणून तेे ओळखले जातात. अशा व्यक्तीकडे अमेरिकेची सूत्रे जावीत हे जगासाठी दु:स्वप्न आहे.

मात्र ट्रम्प कदाचित वेगळेही वागू शकतात. मोदींचे संसदेतील पहिले भाषण अनेकांना धक्का देऊन गेले. ट्रम्प यांनीही मोदींप्रमाणेच ‘सबका साथ’ अशी भाषा पहिल्या भाषणात केली. सध्या जगातील सर्व व्यवस्था साकळलेली आहे. लोकांना बदल हवा आहे व सुरक्षा हवी आहे. उद्याच्या दिवसाबद्दल काही निश्चिती हवी आहे. ती कुठेच मिळत नाही. याविरोधात आवाज उठत आहे. तो युरोपमध्ये उठला, ब्रिटनमध्ये उठला, मध्य आशियात उठतो आहे व भारतातही दोन वर्षांपूर्वी त्याच आवाजाने मोदींना सत्तेवर बसविले. ट्रम्प यांच्यासारखी अराजकीय व्यक्ती सध्याच्या व्यवस्थेमध्ये नव्या कल्पना, नवा प्रवाह आणूू शकते. कारण त्यांचे हितसंबंध तयार झालेले नाहीत. त्याचबरोबर अशी अराजकीय, अनअनुभवी व्यक्ती अराजकाकडेही नेऊ शकते. जगाला दु:स्वप्न वाटावे असे गुण ट्रम्प यांनी प्रचारात उधळले असल्याने त्यांच्याबद्दल जपून बोलावे लागते. मात्र जगाच्या रहाटगाड्याला वळण देऊन नवा डावही ते मांडू शकतात. रोनाल्ड रेगन अध्यक्ष झाले तेव्हा हॉलीवूडमधील काऊबॉय अध्यक्ष झाल्याबद्दल खिल्ली उडविण्यात आली होती. आज यशस्वी अध्यक्ष अशी रेगन यांची ओळख सांगितली जाते. डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत तसे व्हावे अशी जगाची अपेक्षा आहे. अन्यथा पुढील चार वर्षे जगाला हे दु:स्वप्न सहन करावे लागणार आहे.
जागतिकीकरणाने समृद्धीबरोबर असुरक्षितता आणली, जगण्यातील स्थिरता घालविली. ट्रम्पचा विजय ही त्याची फळे आहेत हे जगाने समजून घेतले पाहिजे. भारत त्याला अपवाद नाही.
बातम्या आणखी आहेत...