Home | Editorial | Agralekh | spectacle of gandhiji

गांधीजींचा चष्मा!

divya marathi | Update - Jun 15, 2011, 12:01 AM IST

नाहीतरी गांधीजी काही पाहू शकणार नव्हतेच. त्यामुळे त्यांचा चष्मा चोरीला गेल्याने कुणाचेच काही बिघडण्याचा संभव नाही.

  • spectacle of gandhiji

    नाहीतरी गांधीजी काही पाहू शकणार नव्हतेच. त्यामुळे त्यांचा चष्मा चोरीला गेल्याने कुणाचेच काही बिघडण्याचा संभव नाही. आणि समजा, मुन्नाभाईला बापू जसे भेटले तसे ते खरोखरच पुन्हा अवतरले, तर सध्या जे काही चालू आहे ते पाहून त्यांची प्रतिक्रिया काय होईल, हे सांगणे जरा कठीणच आहे. कारण सध्या त्या महात्म्याच्या नावाला आणि प्रतिमेला एकदम महत्त्व प्राप्त झाले आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या ‘झेरॉक्स’ वा हल्ली प्रचलित नसलेल्या कार्बन कॉप्या घेऊन बरेच गांधी आपापली दुकाने चालवीत आहेत. अण्णांनी तर १६ आॅगस्टपासून दुसरा स्वातंत्र्यलढा सुरू करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. बिचा-या अण्णांचा इतिहास अगदीच कच्चा दिसतो. राजकारण तर आपल्याला समजतच नाही असे अण्णांनीच जाहीर केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या आणि रामदेवबाबांच्या पाठीशी उभा आहे हे अण्णांना माहीतच नव्हते. गंमत म्हणजे संघाचा आपल्याला पाठिंबा आहे असे काँग्रेसवाले सांगून आपली बदनामी करीत आहेत असे अण्णांना वाटते. रामदेवबाबांना मात्र अजून तरी संघाचा पाठिंबा असण्यात काही गैर वाटत नाही. अण्णांच्या उपोषणाला (फार्स क्रमांक एक) रामदेवबाबांचा पूर्ण पाठिंबा होता. म्हणजेच संघाचाही होता. नंतर रामदेवबाबांच्या आमरण उपोषणाला (फार्स क्रमांक दोन) अण्णांचा पाठिंबा होता. सगळेच एकूण ‘जंतर-मंतर-छूऽऽ’! पण अण्णांच्या दिवसभराच्या त्या उपोषणाच्या काळात त्यांना पत्ताच नव्हता की रामदेवबाबा अकरा हजारांची एक खडी सेना उभी करणार आहेत. ते त्यांना कळताच अण्णांनी रामदेवबाबांपासून त्या मुद्द्यापुरती फारकत घेतली. त्यामुळे दोन ‘आयएफएल’ (इंडियन फार्सिकल लीग) टीम तयार झाल्या. रामदेवबाबांच्या टीममध्ये मोहनराव भागवत स्वत: सामील झाले. साहजिकच नितीन गडकरींपासून - सुषमा स्वराजपर्यंत आणि खुद्द लालकृष्ण अडवाणींपासून अरुण जेटलींपर्यंत सर्व आजी-माजी स्वयंसेवक चक्क राजघाटावरच दिवस-रात्र ठाण देऊन बसले.
    आता राजघाट हे गांधीजींचे ‘आत्मस्थान’! म्हणजे त्या परिसरात त्यांचा आत्मा अधिकृतपणे वावरतो. मुन्नाभाईला भेटण्यासाठी गांधीजी तिथून दोन वेळा ‘शूटिंग’च्या निमित्ताने बाहेर पडले होते. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’चे शूटिंग झाले तेव्हा आणि पुन्हा ‘लगे रहो...’च्या वेळेस गांधीजींना या ‘शूटिंग’चा अनुभव नव्हता. नथुरामने त्यांना ३० जानेवारी १९४८ रोजी ‘शूट’ केले, तो त्यांचा खºया-खुºया शूटिंगचा पहिला अनुभव. त्या खºया-खुºया शूटिंगनंतर रा. स्व. संघावर बंदी आली. ती बंदी उठताना संघाने स्वत:ची एक घटना तयार केली. आपणच खरे गांधीवादी आहोत हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी गांधीजींना चक्क ‘प्रात:स्मरणीय’ करून टाकले. शिवाय नथुराम हा कधीच संघाचा नव्हता, असे जाहीर करून स्वत:ची राजकीय सुटकाही करून घेतली. नथुरामवर असे राजकीय पोरकेपण लादल्यावर काही सावरकरवाद्यांनी आणि काही नाटककारांनी त्याला दत्तक घेतला. ‘मी नथुराम बोलतोय’ या नाटकाला मुख्यत: गर्दी केली ती संघपरिवारानेच. गांधीवादी मंडळींनीही या नाटकाला फारसा आक्षेप घेतला नाहीच. ती गांधीवाद्यांची पद्धत नाही. गांधीजींनी तर नथुरामलाच माफ केले होते. अण्णा वा रामदेवबाबांना गांधीजींची शैली माहीत नाही. गांधीजी मीडियाला विचारात घेऊन उपोषण करीत नसत. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा गांधीजी दिल्लीमध्ये नव्हतेच. ते होते नौखालीला. हिंदू-मुस्लिम दंग्यांना अटकाव करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी ते उपोषणाला बसले होते. ती दंगल इतकी उग्र होती की, कुणा अतिरेक्याने (हिंदू वा मुस्लिम) तेव्हाच गांधीजींना ठार मारले असते. मुद्दा हा की गांधीजींची विचारशैली वा उपोषणशैली या सध्याच्या तोतया गांधींना परिचित नाही. गांधीजींना अटक करायला पोलिस येत तेव्हा ते कधीच पळून गेले नाहीत. शिवाय त्यांना न्यायालयात सादर केल्यानंतर त्यांनी न्यायमूर्तींना सांगितले की, ब्रिटिशांच्या कायद्यानुसार जी सर्वात जास्त शिक्षा आहे ती त्यांना दिली जावी. कारण आपण जाणीवपूर्वक कायदा भंग केला आहे. त्यांच्या चळवळीचे नावच ‘सविनय कायदेभंग’ असे होते; म्हणजे ‘सिव्हिल डिसओबिडियन्स’! सध्याच्या ‘सिव्हिल सोसायटी’ला गांधीजींच्या ‘सिव्हिल डिसओबिडियन्स’ शैलीचा परिचय नाही.
    म्हणूनच पोलिस पकडायला आल्यावर योगी महाशय व्यासपीठावरून उडी टाकून, बाईचा वेश धारण करून पळून गेले. अण्णा आणि रामदेवबाबांना वाटले होते की १९४२ च्या ‘चलेजाव’प्रमाणे सबंध देशभर एकच आंदोलन सुरू होईल. प्रत्यक्षात त्यांनी केलेल्या आवाहनाला खासगी टीव्ही चॅनेल्सपलीकडे कुणीही प्रतिसाद दिला नाही. गांधीजींच्या काळात टीव्ही नव्हता. शिवाय गांधीजी अनेकदा, विशेषत: उपोषणाच्या काळात, मौन पाळत असत. अण्णा आणि रामदेव टीव्हीसमोर अखंड बडबड करीत असतात. इतकी की श्री श्री रविशंकर म्हणाले की, बाबा उपोषण चालू असतानाच दिवसातून पाच-सहा पत्रकार परिषदा, टीव्ही मुलाखती आणि भ्रष्टाचारविरोधी प्रवचन देत. त्यामुळे त्यांची प्रकृती क्षीण झाली. गांधीजींनी उपोषणासाठी पंचतारांकित मंडप घातले नाहीत आणि भक्तगणांसाठी बसण्याची खास सोय केली नाही. गांधीजींना अभिप्रेत होते ते वचन ‘सबको सन्मती दे भगवान’ असे होते. आज जर गांधीजी असते तर त्यांची अण्णा व बाबांनाही सन्मती मिळावी म्हणून प्रार्थना केली असती. सुदैवाने गांधीजी हरिद्वार, डेहराडून वा दिल्ली कुठेच आत्मरूपाने प्रगट झाले नाहीत. आता तर त्यांचा चष्माही चोरीला गेला आहे. नाही तर कदाचित त्यांनी गमतीने म्हटले असते, ‘‘लगे रहो अण्णा, और बाबा, आप भी!’’

Trending