आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायबर विश्वातल्या कोळ्यांचे जाळे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवकाशात उपग्रह पाठवून पृथ्वीभोवती संरक्षक जाळे उभारून देशाचे संरक्षण करण्याची कल्पना जॉर्ज लुकास या दिग्दर्शकाने 1977 मध्ये ‘स्टार वॉर्स’ या चित्रपटाद्वारे आणि सिनेमालिकेतून मांडली होती. त्या वेळी स्टार वॉर्स मालिका अमेरिकेत आणि एकूणच जगभरात फार लोकप्रिय झाली होती. पृथ्वीभोवती संरक्षक आणि हेरगिरीचे अदृश्य जाळे उभारण्याची कल्पना त्या वेळी बहुतेकांना कल्पनातीत वाटली होती. असे असले तरी या हॉलीवूडपटातल्या कल्पनाविलासाने अनेक प्रगतिशील राष्‍ट्रप्रमुख आणि शास्त्रज्ञांच्या बुद्धीची कवाडं उघडली गेली.
कॉम्प्युटरचा शोध लागल्यानंतर देशादेशांतील स्पर्धेने प्रचंड वेग घेतला. कल्पना आणि संशोधनाचा मेळ घालून अनेक कल्पनातीत बाबी प्रत्यक्षात उतरवल्या गेल्या.

कॉम्प्युटरायझेशनमुळे माहिती प्रचंड प्रमाणात उपलब्ध होऊ लागली. त्याचबरोबर माहिती संपादित, एकत्रित करून नवीन डाटा तयार होऊ लागला. बहुमूल्य असलेली ही माहिती एखाद्या देशाची बौद्धिक संपत्ती म्हणून अत्यंत गोपनीयरीत्या जपण्यात येऊ लागली. एखाद्या देशाची संरक्षण सिद्धता, अण्वस्त्रे, नवीन संशोधन, गोपनीय अहवाल या संदर्भातली माहिती ही जितकी संवेदनशील, तितकीच महत्त्वाची असते. ती जपण्यासाठी लागणारी यंत्रणा तितकीच सक्षम आणि आधुनिक असायला हवी. असे असूनही हॅकर्सद्वारे गोपनीय माहिती हॅक करण्याचा केला जाणारा प्रयत्न म्हणजेच सायबर क्राइम हा अनेक देशांसाठी आज आणि उद्याचा खरा चिंतेचा प्रश्न बनला आहे.


नुकतीच चीनचे राष्‍ट्रध्यक्ष जिनपिंग यांनी अमेरिकेत जाऊन अमेरिकेचे राष्‍ट्रध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेतली. या भेटीत जिन पिंग यांनी चीनकडून अमेरिकेवर सायबर हल्ले होत असल्याचा मुद्दा मान्य केला. जगाच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या या देशांत माहितीवरून संघर्ष होत असल्याचे या घटनेमुळे अधोरेखित झाले. जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर तयार करण्याच्या स्पर्धेत चीनने आघाडी घेतली आहे. आंतरराष्‍ट्रीय संशोधकांनी जाहीर केलेल्या जगातील 500 सुपर कॉम्प्युटरच्या यादीत ‘टियान-2’ असे नाव असलेला हा कॉम्प्युटर पहिल्या स्थानी आहे. अर्थातच चीनचे सातत्याने वाढणारे प्राबल्य हा अमेरिकेसाठी मोठा चिंतेचा विषय ठरला आहे. प्रीझम या हेरगिरी कार्यक्रमाअंतर्गत अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी एजन्सीने मायक्रोसॉफ्ट, याहू, गुगल, फेसबुक, यू ट्यूब, स्काइप, एओएल, अ‍ॅपल या बड्या कंपन्यांची मदत घेतली. भारताच्या बाबतीत सर्वात चिंतेची बाब म्हणजे, 100 अब्ज डॉलरची उलाढाल करून जागतिक पातळीवर महत्त्वाचे स्थान असलेला भारत डाटा सेंटर उभारण्यासाठी जगातील दुसरा सर्वात धोकादायक देश असल्याचे नुकतेच कुशमन अँड वीकफिल्डने प्रसिद्ध केलेल्या डाटा सेंटर रिस्क इंडेक्समध्ये म्हटले आहे. बँक खात्यातून मुंबई पोलिसांचा पगार गायब करण्याचा ग्रीसमधून केला गेलेला प्रकारही या संदर्भातली सर्वात ताजी घटना म्हणायला हवी.


नुकताच अमेरिकेने सायबर हल्ल्यांविषयी कारवाईसाठी वीस कलमी कायदा मंजूर केला, ज्यानुसार देशांतर्गत सायबर हल्ल्यांविरुद्ध अटॅक करण्यासाठी राष्‍ट्रप्रमुखांच्या परवानगीचीही गरज नसल्याचे कलम अंतर्भूत आहे. सीडीतून एखाद्या कॉम्प्युटर प्रोग्रामच्या आड लपवून (हाइड करून), ई-मेलवर अ‍ॅटॅच्ड फाइलच्या रूपात किंवा एखाद्या डाऊनलोडेबल फाइलच्या रूपात असलेला घातक प्रोग्राम आपल्या मशीनमध्ये शिरला की हल्ला सुरू होतो. हे घातक प्रोग्राम काही वेळा सुरक्षित समजल्या जाणा-या सरकारी किंवा एखाद्या महत्त्वाच्या संस्थेच्या यंत्रणेतही प्रवेश करतात. त्यासाठी संबंधित संस्थेच्या मुख्य कॉम्प्युटरमध्ये (सर्व्हर) प्रवेश करणे, हेच एकमेव लक्ष्य असते. अनेक महत्त्वाच्या संस्था स्वत:ची यंत्रणा सुरक्षित करण्यासाठी फायरवॉल, अँटिव्हायरस यंत्रणा सज्ज ठेवतात. मात्र, या यंत्रणेला चकवून हल्लेखोर मोठे नुकसान करण्याचा प्रयत्न सतत करत असतात.


एकदा हॅकरला हे जमले आणि त्याने कॉम्प्युटरवर नियंत्रण मिळवले की, आपण कॉम्प्युटर हॅक झालाय, असे म्हणतो. जर सर्व्हरवर हल्ला झाला आणि तिथे एखाद्या वेबसाइटची माहिती असेल तर संबंधित वेबसाइटची संरक्षण यंत्रणा भेदून वेबसाइटवर स्वत:ला सोयीची माहिती टाकणेही शक्य होते. हॅकर अगदी कॉम्प्युटरच्या मदतीने चालणारी वीज पुरवठ्याची यंत्रणा बिघडवू शकतात, एखाद्या कंपनीचे किंवा अणुभट्टीचे काम थांबवू शकतात. बँकेचे व्यवहार ठप्प करू शकतात. पासवर्ड चोरून एखाद्या ई-मेल किंवा सोशल कम्युनिटी साइटवरच्या अकाउंटचा गैरवापर करू शकतात. एखाद्याच्या खात्यातले पैसेही स्वत:कडे वळवू शकतात. एकूणच सुरक्षा भेदणे जमले तर हॅकर वाट लावू शकतो. त्यामुळे लुटालूट करण्यासाठी आणि एखाद्या देशाची यंत्रणा बिघडवून टाकण्यासाठी शत्रू देश आणि दहशतवाद्यांचे तज्ज्ञ सायबर वॉरचा पर्याय निवडून वारंवार हल्ले करण्याचा प्रयत्न करत असतात. हॅकरला जसे सायबर वॉर खेळून प्रतिपक्षाचे नुकसान करता येते, अगदी तसेच आपणही त्याला धोबीपछाड घालू शकतो. यासाठी अँटिव्हायरस आणि फायरवॉलच्या यंत्रणेत सतत बदल करून ती नवी आणि भक्कम ठेवण्याचा प्रयत्न करायलाच हवा. या कृतीमुळे हॅकरला संरक्षण यंत्रणा भेदणे, तिच्याविषयी अंदाज बांधणेच कठीण होईल.


काही यंत्रणांचा उपयोग करताना की-बोर्डऐवजी मॉनिटरवर दिसणा-या व्हर्च्युअल की-बोर्डचा पर्याय असतो. अशा वेळी माऊस किंवा टचस्क्रीनद्वारे त्या बोर्डवरील बटणांचा उपयोग करून पासवर्ड टाइप करावा आणि त्याच्या बाबतीत गोपनीयता पाळावी. कुठलाही नवा प्रोग्राम किंवा सीडी वापरताना आणि ई-मेलची अ‍ॅटॅच्ड फाइल डाऊनलोड करून घेताना फायरवॉल आणि अँटिव्हायरस सॉफ्टवेअरच्या मदतीने स्कॅन करून सुरक्षित असल्याची खात्री करून घ्यावी. सायबर विश्वातील सध्याच्या घडामोडींनी काही प्रश्न निर्माण केले असून ते भौतिक जगतातील व्यवहाराशी आणि नैतिकतेशी संबंधित आहेत. प्रत्येकाचा ई-मेल हा खासगी आहे. मात्र, तो खरोखरच खासगी आहे काय? हा प्रश्न स्पॅम मेल आणि जाहिराती यांच्यामुळे उपस्थित होतो. सायबर जगताचे नागरिकत्व सर्वांसाठी खुले असते आणि या विश्वात कोणतेही निर्बंध नसल्याने इतरांच्या खासगीपणात डोकावण्याच्या घटना घडत आहेत, तसेच गुन्हेही होत आहेत. यामुळे आपले खासगीपण संपुष्टात येत आहे काय, असाही प्रश्न आहे. जगभराचे नकाशे नेटवर उपलब्ध होत असल्याने फायदा जरूर होतो; परंतु त्याचा गैरफायदा घेऊन देशाच्या सुरक्षिततेला धोकाही निर्माण होतो आहे. याबाबतची चिंता आपल्याकडे अलीकडेच जाहीरपणे व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे इंटरनेटवरील अवलंबित्व वाढल्याने त्याचे रक्षण हे एखाद्या देशाच्या रक्षणाइतकेच महत्त्वाचे ठरले आहे. त्यामुळे सायबर सुरक्षेसाठी सदैव सज्ज राहावे लागणार आहे. म्हणूनच तांत्रिकतेच्या पलीकडे जात साध्या-सोप्या भाषेत या सुरक्षेसाठी घ्याव्या लागणा-या दक्षतेची माहिती सर्वांना द्यावी लागेल. तरच भविष्यातील ‘सायबर वॉर’बाबत नेटिझन्स दक्ष राहतील.