आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेरगिरीचा फास!(अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियामुळे तयार झालेल्या आभासी समाजात आज प्रचंड अस्थिरता दिसून येतेय. या समाजात अहोरात्र काम करणारे बहुसंख्य तरुण आहेत. या तरुणांमध्ये असे काही बंडखोर तरुण आहेत की ज्यांना वाटते, लोकशाही असूनही प्रस्थापित कायद्यात-व्यवस्थेत न्यायाला, व्यक्तिस्वातंत्र्याला नाकारले जात आहे. लोकशाहीत मिळणा-या व्यक्तिस्वातंत्र्याचा आपण कितीही डांगोरा पिटला तरी प्रत्यक्षात या स्वातंत्र्यावर अहोरात्र देखरेख करणारी सरकार नामक यंत्रणा व्यक्तीचे जगणे असह्य करून टाकते. या बंडखोर तरुणांना सध्याची राजकीय, सामाजिक, आर्थिक व्यवस्था बदलावीशी वाटते. अमेरिकेचा नागरिक असलेला एडवर्ड स्नोडेन हा तरुण अशाच बंडखोरांपैकी एक. या तरुणावर अमेरिकेच्या प्रशासनाने सरकारी गोपनीय माहितीचा भंग केल्याप्रकरणी व हेरगिरी केल्याप्रकरणी वॉरंट काढले आहे. स्नोडेन हाँगकाँगमध्ये होता. आता तेथून तो मॉस्कोला पळाला आहे. त्याला अमेरिकेत आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. स्नोडेन हा अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी एजन्सीचे (एनएसए) काम करत होता.

अमेरिकेवर पुन्हा 9/11 सारखा दहशतवादी हल्ला होऊ नये म्हणून गेल्या पाच ते सहा वर्षांपासून एनएसए अमेरिकेत येणारे सर्व फोन कॉल, ई-मेल, फाइल्स, फोटो, सोशल मीडियाचा डेटा यांची कसून तपासणी करत आहे (या मोहिमेला ‘प्रिझम’ असे नाव देण्यात आले आहे). ही तपासणी सुलभ व्हावी यासाठी एनएसएने अ‍ॅपल, गुगल, यूट्यूब, स्काइप, मायोक्रोसॉफ्ट, फेसबुक या सर्व बलाढ्य अमेरिकी कंपन्यांना कायद्याचा बडगा दाखवला आहे. अमेरिकेतील राष्ट्रीय सुरक्षेविषयीचे कायदे कडक असल्याने या कंपन्यांपुढे अमेरिकी प्रशासनाला माहिती पुरवण्यावाचून दुसरा मार्ग नव्हता. स्नोडेनने काही दिवसांपूर्वी ‘गार्डियन’ आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या दोन दैनिकांना एनएसएच्या ‘प्रिझम’ मोहिमेची माहिती देऊन ओबामा प्रशासनाला धक्का दिला होता. स्नोडेन हा सोशल मीडियातील असा एक तरुण आहे की ज्याला अमेरिकेच्या व्यवस्थेत पारदर्शकता हवी आहे. त्याच्या मते सार्वजनिक माहिती लपवणे किंवा गोपनीयतेच्या नावाखाली माहिती लोकांपुढे आणू न देणे म्हणजे लोकशाहीवरची, व्यक्तिस्वातंत्र्यावरची हेरगिरी आहे. 70 च्या दशकात व्हिएतनाम युद्धाच्या काळात अस्थिर अशा अमेरिकी समाजात युद्ध नव्हे तर शांतता हवी म्हणून तरुण पिढी रस्त्यावर उतरली होती.

आता 21 व्या शतकाच्या दुस-या दशकात अमेरिकेतील तरुण पिढी व्यवस्थेत पारदर्शकतेची नितांत गरज असल्याचे सांगत आहे. या पिढीला व्यक्तीच्या खासगी आयुष्यात कोणीही डोकावू नये असे वाटते. या पिढीला वाटते की, सरकार नामक जी व्यवस्था काम करते त्या व्यवस्थेअंतर्गत चालणा-या सर्व घडामोडींची माहिती जनतेपुढे आली पाहिजे. म्हणजे सरकारच्या विकास योजना, सरकारी बैठकांचे इतिवृत्तांत, राजकीय पक्षांची कार्यप्रणाली, देशाचे परराष्ट्र धोरण, लष्कर व संशोधनावरचा खर्च, सरकारी अनुदाने, गुप्तहेर संघटनांचे कार्य या व अशा अनेक बाबींची माहिती लोकांपुढे ठेवल्यास सरकारची पारदर्शकता अधिक स्पष्ट होत जाईल. 2010 मध्ये ब्रॅडले मॅनिंग या अमेरिकी सैनिकाने इराकमधील अमेरिकी लष्कराच्या घडामोडींविषयीची अतिशय संवेदनशील व गोपनीय कागदपत्रे विकिलीक्स या संकेतस्थळाला पुरवली होती. या कागदपत्रामुळे अमेरिकेच्या लष्कराचा अमानवी, क्रूर चेहरा जगापुढे आला होता. गेल्या जानेवारी महिन्यात एरॉन श्वार्ट्झ या तरुणाने अमेरिकेच्या प्रस्थापित व्यवस्थेत मुक्त स्वातंत्र्याचा बळी जात असल्याच्या निराशेतून आत्महत्या केली होती.

एरॉन माहितीच्या अधिकारासाठी झपाटलेला होता. त्याचाही लढा प्रस्थापित व्यवस्थेशी होता, व्यक्तिस्वातंत्र्यावर कुरघोडी करणा-या कायद्यांच्या विरोधात होता, नव्या जगाची नवी मांडणी करण्यासाठी होता. एरॉनचा अपराध (!) एवढाच होता की त्याने मॅसॅच्युएट्स विद्यापीठ आणि जेसटोर या वेबसाइटवरील शोधप्रबंधांची सुमारे 40 लाख माहितीची कागदपत्रे चोरी केली होती. ही सर्व माहिती त्याला इंटरनेटवर म्हणजे जगापुढे सादर करायची होती. सध्या अमेरिकेतल्या प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये जे काही संशोधन, सरकारी मदतीवर (जनतेच्या करातून) सुरू असते, अशा संशोधनाचा फायदा समाजाला झालाच पाहिजे, असा आग्रह धरणा-यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हा दबावगट माहितीचे संकलन करणा-या बलाढ्य कंपन्या, शिक्षण संस्था, प्रशासन यांच्याविरोधात दंड थोपटून उभा आहे. माहितीचे एकाच ठिकाणी केंद्रीकरण झाल्याने या कंपन्या किंवा संस्थांची दादागिरी वाढेल व ज्याला माहिती गरज आहे तो त्यापासून वंचित राहील, असे या गटाचे म्हणणे आहे.

ओबामा प्रशासनाच्या ‘प्रिझम’ मोहिमेविरोधात अमेरिकेत उठलेला आवाज हा सोशल मीडियातून अधिक दमदार होता. यांचे म्हणणे असे की, आज इंटरनेट व सोशल मीडियाच्या सर्व कंपन्या अमेरिकेत आहेत. म्हणजे या कंपन्यांकडे जगाच्या अर्थकारणाची, राजकीय घडामोडींची, सांस्कृतिक अभिसरणाची प्रचंड माहिती आहे. या माहितीच्या आधारावर अमेरिका जगावरची आपली पकड अधिकाधिक घट्ट करू पाहत आहे. त्यामुळे अमेरिकेची सर्व क्षेत्रांतील दादागिरी, मक्तेदारी, दमनशाही जगापुढे आणणे हे सोशल मीडियाचे खरे काम आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात ओबामा यांनी जर्मनीला भेट दिली तेव्हा त्यांना ‘प्रिझम’ मोहिमेवरून पत्रकारांच्या प्रश्नांच्या फैरींना सामोरे जावे लागले. अमेरिकी प्रशासनाची ही मोहीम जगाला दहशतवादापासून वाचवण्यासाठी आहे, असे समर्थन त्यांना करावे लागले. ‘प्रिझम’ मोहिमेमुळे सुमारे 50 हून अधिक दहशतवादी हल्ले उधळून लावता आले. हे हल्ले अमेरिका, युरोप आणि भारतामध्ये होणार होते असे ओबामांचे म्हणणे आहे. ओबामांची भूमिका ही एक बाजू झाली; व्यक्तिस्वातंत्र्याचा आग्रह धरणारी अमेरिका किती दुटप्पी आहे हे स्नोडेन प्रकरणाच्या निमित्ताने दिसून आले आहे.