आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकशाही मूल्यांचा आद्य प्रणेता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज 30 नोव्हेंबर. ‘जागतिक तत्त्वज्ञान दिन’. हा दिवस ‘ज्ञान म्हणजे जीवनाचे परीक्षण’ अशी भूमिका मांडणा-या ग्रीक-पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा मुकुटमणी सॉक्रेटिसच्या स्मरणार्थ युनेस्कोमार्फत जगभर साजरा केला जातो. त्यानिमित्त सॉक्रेटिसच्या विचारांचा आणि त्यांच्या विद्यमान प्रस्तुततेचा हा परिचय.
सॉक्रेटिस (इ.स.पू.469 ते 399) हा प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ता ग्रीक-पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा मुकुटमणी समजला जातो. त्याने मानवी समाजाला दिलेले योगदान इतके मौलिक व मूलभूत आहे की, त्यास ‘तत्त्वज्ञानाचा संत आणि हुतात्मा’ असे म्हटले जाते. सॉक्रेटिसने स्वत:च्या जीवनाविषयी आणि स्वत:च्या तत्त्वज्ञानाविषयी काहीही लिहून ठेवलेले नाही. त्याच्या शेवटच्या कालखंडात त्याला प्लेटो (इ.स.पू.431 ते 351) हा सर्वोत्तम शिष्य लाभला. गुरूला श्रद्धांजली म्हणून प्लेटोने आपल्या तत्त्वज्ञानात सॉक्रेटिसला मध्यवर्ती स्थान दिले. युथिफो, किटो, अ‍ॅपॉलॉजी आणि फिडो अशा चार प्रमुख संवादांमधून सॉक्रेटिसचे दर्शन प्लेटो घडवतो. झेनाफोन (इ.स.पू.570 ते 475), अ‍ॅरिस्टोफेनिस (इ.स.पू. 446 ते 386 ) आणि प्लेटोचा शिष्य अ‍ॅरिस्टॉटल (इ.स.पू. 384 ते 322) यांच्या लेखनातून सॉक्रेटिसची माहिती मिळते.
सॉक्रेटिसपूर्व कालात ज्यांनी तात्त्विक विचार मांडले त्यांना सोफिस्ट तत्त्वज्ञ म्हणतात. सोफिस्टांच्या मते ज्ञानाचे साधन केवळ इंद्रिये हीच असून सर्व ज्ञान इंद्रियांमार्फतच होते, असा विचार मांडला. ज्ञान होते याचा अर्थ इंद्रियांमार्फत संवेदना मिळतात आणि संवेदनांचा विषय केवळ भौतिक जग हेच आहे. म्हणूनच व्यक्तिगत पातळीवर माणसाला मिळणारी विविध इंद्रियसुखे हेच ज्ञानाचे मुख्य विषय आहेत. सत्य म्हणजेच इंद्रियसुख होय. तेच जीवनात महत्त्वाचे असतात. त्यांच्या मते ज्ञान बुद्धीने अथवा विवेकशक्तीने होऊ शकत नाही. ‘सत्याचे ज्ञान ’ अशी काही संकल्पनाच नसते, असेही सोफिस्टांचे म्हणणे होते.
सोफिस्ट मंडळी ज्याला ज्या प्रकारचे विचार हवे आहेत, तसे विचार शिकवत असत. शोषणास आवश्यक असलेले सारे विचार मांडणारे तत्त्वज्ञान त्यांनी तत्कालीन राज्यकर्त्यांना तयार करून दिले होते. सॉक्रेटिस त्यामुळेच त्यांना ‘भाडोत्री विचारवंत’ म्हणतो. ‘भ्रष्टाचाराचे तत्त्वज्ञान तयार करून देणारे विचारांचे कंत्राटदार’ अशा शब्दांत तो टीका करतो. आजच्या काळातील ‘सोफिस्टिकेटेड’ या शब्दाचा मूळ अर्थ ‘शोषणाचे सुव्यवस्थित तत्त्वज्ञान तयार करून देणारा’ असा आहे, शिष्टाचार पाळणारा असा नव्हे.
सॉक्रेटिसच्या मते संवेदनांमार्फत मिळणारे इंद्रियसुख क्षणभंगुर तर असतेच; पण तेच अनेक प्रकारच्या विषमता, अन्याय व शोषण यांचे मूळ कारण बनते. इंद्रियसुख सतत वासना निर्माण करत राहते. त्यातूनच व्यक्ती व समाज अनैतिक वर्तन करतात. खरे सामाजिक कल्याण बाजूला फेकले जाते आणि लोक भासमय सुखासाठी वाटेल ते करतात.
सोफिस्टांनी मांडलेल्या तत्त्वज्ञानामुळे तत्कालीन ग्रीक समाजात अनाचार, अराजक, बजबजपुरी, शासन पुरस्कृत भ्रष्टाचार, उद्दाम नोकरवर्ग, सर्वसामान्यांचे भयावह शोषण इत्यादींनी राजकीय व सामाजिक परिस्थिती गंभीर बनली होती. नैतिकतेचा नीचांक गाठला गेला होता. सारे शोषण लोकशाहीच्या नावाखाली चालू होते. लोकशाहीची संकल्पना संकुचित व मर्यादित बनवली होती. तिचा चुकीचा अर्थ लावला जाऊन ती काही मूठभर धनिकांच्या हातचे खेळणे बनली होती.
ख-या सामाजिक कल्याणासाठी ‘कोणतेही नवे तत्त्वज्ञान निर्माण करण्यापेक्षा लोकांमध्ये सत्यविषयक प्रेम कसे निर्माण होईल आणि त्यांना योग्य जीवन जगता यावे यासाठी कोणते मार्गदर्शक तत्त्व शोधता येईल, हीच समस्या मानली पाहिजे,’ असे सॉक्रेटिसचे मत होते. या समस्येवरील उत्तर म्हणून तो ‘सत्य म्हणजेच सद्गुण आणि सद्गुण म्हणजे ज्ञान’ असे समीकरण करतो.
सॉक्रेटिसच्या मते ज्ञानाचा विषय मानवी समाज व मानवी मूल्यांवर आधारित समाजाची रचना हाच मूलत: महत्त्वाचा मानला पाहिजे. सदाचरण, राजकारण, नीती आणि कला हे मानवी जीवनाला थेटपणे भिडणारे विषय असून याद्वारेच मानवी कल्याण साधले जाते, हा सॉक्रेटिसचा दावा होता.
या संदर्भात सॉक्रेटिसने ‘ज्ञान म्हणजे जीवनाचे परीक्षण’ अशीही भूमिका मांडली. सॉक्रेटिसच्या मते ‘परीक्षण न केलेले जीवन जगण्या योग्य असू शकत नाही.’ हे परीक्षण दोन रीतीने करता येते. आत्मपरीक्षण आणि समाजपरीक्षण. आत्मपरीक्षणासाठी ‘स्वत:ला ओळखा’ ही पद्धती अमलात आणावी आणि इतरांना त्याची ओळख पटवून देण्यासाठी लोकांशी संवाद साधावा. जेव्हा इतर जणांना त्यांचे अज्ञान जाणवेल, तेव्हा ते आत्मपरीक्षणाकडे वळतील. मग त्यांच्या अंतरंगात सत्यज्ञानाचा उदय होईल. ते सद्गुणी होतील. सॉकेटिसच्या मते सद्गुणी असणे याचाच अर्थ आत्म्याचे आरोग्य सांभाळणे असते.
आजच्या काळातही सॉक्रेटिसचा दावा खरा आहे. तत्कालीन ग्रीक समाजाचे चित्र आणि आजचे भारतीय व जागतिक चित्र यात फरक नाही. सद्य:स्थितीतील समाज उभारणी करणारे शिक्षणक्षेत्र कमालीचे शोषक बनले आहे. मानव संसाधन मंत्रालय, विद्यापीठ अनुदान आयोग, राज्य सरकारे, विद्यापीठे यांच्या सहकार्याने समाजात पसरलेले शिक्षणक्षेत्राचे जाळे, अनुदानित, विनाअनुदानित शाळा, महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे इत्यादी शिक्षणसंस्था यांचा तोंडवळा सोफिस्टांच्या भाडोत्री विद्वानांच्या कारखान्याशी जुळणारा आहे. ‘जीवनोपयोगी शिक्षण’ या नावाखाली केवळ विज्ञान-तंत्रज्ञानावर आधारलेले शिक्षण देण्यावरच सारे शिक्षण केंद्रित झाले आहे. राज्यकर्त्यांनी त्यांना उपयोगी ठरणारे, आर्थिक समृद्धी देणारेच अभ्यासक्रम आणि विद्वान प्राध्यापक वर्ग पदरी बाळगला आहे. खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण यांचा मूळ लोककल्याणाचा साचा बदलून शोषणोपयोगी बनवला गेला आहे. हे सारे लोकशाही आणि सोफिस्टिकेशन या नावाखाली चालू आहे. सत्य, नीती, सामाजिक कल्याण, प्रगती हे नाटकातील सोंग बनत आहे.
भ्रष्ट जीवन हे उघडच शुभ जीवन नाही. शुभ जीवन आत्मपरीक्षणातून साकारते. म्हणूनच प्रत्येकाने आत्मपरीक्षणासाठी वेळ काढलाच पाहिजे. मूल्यवान जीवनाचा अनिवार्य हिस्सा म्हणून जीवन आणि सद्गुण यांची जाहीर चर्चा केलीच पाहिजे, असे सॉक्रेटिस स्पष्ट करतो. त्यासाठी प्रश्नांचे माध्यम वापरावे.
प्रश्न विचारणे, ही माणसाची मूलभूत अभिवृत्ती आहे. जगद्विख्यात तत्त्ववेत्ते बर्ट्रांड रसेलच्या मते जीवनात उत्तरांना फारसे महत्त्व नसते, तर योग्य प्रश्नांना असते. व्यवस्थेला सतत योग्य प्रश्न विचारणे, हे सामाजिक प्रगतीसाठी गरजेचे असते. विशेषत: राजकीय जीवनात ही तात्त्विक चिकित्सा अतिशय आवश्यक असते. कारण बहुधा राजकीय पक्ष लोकांना भावनिकदृष्ट्या आवाहन करूनच सत्तेवर येतात; पण जनतेने चांगले आणि वाईट यात फरक करण्यासाठी विचार करणे, यातच लोकशाहीचे यश असते. त्यासाठी व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनाचे परीक्षण करणे ही अनिवार्य अट आहे. सॉक्रेटिसचे तेच म्हणणे आहे.