आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्टार ब्रॉडकास्टर’ ज्योत्स्नाबाई देवधर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


तो 1977 मधील जुलैचा शेवटचा आठवडा होता. मी नुकतीच पुणे आकाशवाणीमध्ये कार्यक्रम अधिकारी पदावर रुजू झाले होते. पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला होता; मात्र एवढे सोडल्यास या क्षेत्रातली माझी पाटी कोरीच होती. पहिले एक-दोन आठवडे माझी बसण्याची व्यवस्था झाली होती ती थेट ज्योत्स्नाबाई देवधर यांच्या खोलीतच. एकाच खोलीत त्यांच्या बरोबरीच्या नात्याने बसायचे काहीसे दडपण वाटत होते. पण थोड्याच काळात ज्योत्स्नाबार्इंच्या सहज, मोकळ्या वागण्याबोलण्याने ते हळूहळू दूर झाले. पुढे त्यांचा मदत करण्याचा स्वभाव अनेक प्रसंगांनी प्रत्ययाला आला. अगदी सुरुवातीचे उदाहरण : 1977-78 या आर्थिक वर्षाच्या शेवटी-शेवटी कार्यक्रमासाठी दिल्लीहून प्राप्त झालेला निधी पुरेसा खर्च न झाल्याने अखेरच्या काही महिन्यांमध्ये संपवणे भाग होते.ही कामगिरी त्या वेळचे केंद्र संचालक आर. एस. भोळे यांनी मी, माझे सहकारी चंद्रकांत बर्वे, राजीव गोखले यांच्यावर सोपवली. मला महिलांच्या कार्यक्रमांतर्गत हे पैसे नवीन कार्यक्रमाच्या निर्मितीसाठी वापरायचे होते. मनातून धाकधूक वाटत होती, की बार्इंना त्यांच्या कार्यक्षेत्रावर अतिक्रमण तर नाही ना वाटणार? पण तसे काही झाले नाही. उलट लघुकथांचे रेडिओ रूपांतर असा प्रकार निवडून त्यात ज्या कथालेखिका मला हव्या होत्या त्यांची केवळ नावेच नाही तर पत्ते वगैरे इतर तपशीलही बाईंनी तत्परतेने पुरवले.

वयाने, अनुभवाने त्या ब-च ज्येष्ठ असल्या तरी त्याचा परिणाम त्या माझ्याशी वागताना, बोलताना कधी जाणवत नसे. अनेक विषयांवर मी त्यांच्याशी बरोबरीच्या नात्याने गप्पा मारत असे. सर्जनशील लेखन करणा- बार्इंना सरकारी नियम, लिखापढी याचा जाच वाटत असे. उदाहरणार्थ, दर तीन महिन्यांनी पुढील तीन महिन्यांत कोणते कार्यक्रम प्रस्तावित आहेत, याचे ‘शेड्यूल’ द्यावे लागे. अनेक वर्षे त्याच त्या विषयावर - आरोग्य, मुलांची काळजी, सुजाण पालकत्व इत्यादी कार्यक्रम केल्यामुळे दर वेळी नवीन काय करायचे, हा प्रश्नच असे. त्यामुळे त्या विनोदाने म्हणत, ‘‘बाकी सर्व आपल्या नोकरीत चांगले आहे; फक्त दर शेड्यूलच्या वेळी मला राजीनामा द्यावासा वाटतो.’’ आपल्या हातून नकळत ज्या चुका झाल्या त्या आमच्याकडून होऊ नयेत, याबाबतीत त्या दक्ष असायच्या. एकदा घडलेला किस्सा त्या अनेकदा सांगत. गृहिणी, बालोद्यान इत्यादी कार्यक्रमात दोन-तीन छोटे कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाच्या आधी किंवा नंतर एखादे गीत असे स्वरूप असते. पैकी कार्यक्रम टेपवर किंवा आता सीडीवर असतो आणि गीत पूर्वी ध्वनिमुद्रिका आणि सध्या ‘कमर्शियल डिस्क’वर असे दिले जाते. बार्इंनी एकदा दस-च्या निमित्ताने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित ऐतिहासिक श्रुतिका तयार करून दिली. लेखनगुणाबरोबरच आणखी एक गोष्ट त्यांना लाभली होती; ती म्हणजे प्रसारणासाठी भावानुकूल आवाज! भावनेचा ओलावा तर त्यात होताच, शिवाय जिव्हाळाही ओतप्रोत भरलेला असे. त्यामुळे त्यांचा आवाज असलेला छोटासा संवाद किंवा पूर्ण वेळाचे नभोनाट्य मनाला भिडत असे. त्या अर्थाने त्या ‘स्टार ब्रॉडकास्टर’च होत्या. ‘गृहिणी’ आणि ‘आपले माजघर’च्या अनेक श्रोत्याभगिनींची लाडकी ‘वहिनी’ होण्याचे भाग्य त्यामुळेच त्यांच्याकडे आपोआप चालून आले. 1960 च्या दशकात आपल्या पत्राचा समावेश गृहिणी कार्यक्रमाच्या पत्रोत्तरात होणे आणि बार्इंच्या आवाजात त्याला सविस्तर उत्तर मिळणे, ही अत्यंत अपूर्वाईची बाब होती. इतके असूनही आपल्या आवाजाच्या प्रेमात न पडता बार्इंनी ‘आपले माजघर’ या कार्यक्रमाचे संपूर्ण सादरीकरण त्यांच्या सहकारी संजीवनी आपटे यांच्यावर पूर्णपणे सोपवले.

सरकारी काटेकोर नियमांच्या चौकटीत त्यांनी स्वत:मधला कलाकार कधीच कोमेजू दिला नाही. उत्स्फूर्त बोलण्यात त्या स्वत: जशा वाकबगार होत्या, तसेच त्यांच्या सहायकांनाही त्यांनी घडवले. त्या मुद्दाम काही उत्स्फूर्त नाटिका एखादी कल्पना देऊन त्यांच्याकडून करवून घेत. लिखाण तर त्या आता-आतापर्यंत करत होत्या. काही वर्षांपूर्वी पुण्यातल्या दैनिकात ‘मावळतीचे रंग’ हे ललित लेखांवर आधारित सदर त्यांनी वर्षभर चालवले. बार्इंनी अनेक हातांना लिहिते केले. कार्यक्रमांद्वारे अनेक श्रोत्यांच्या पिढ्यांवर संस्कार केले. अनेक उत्तमोत्तम तसेच नवोदित लेखक-लेखिकांना आकाशवाणीचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्याच वेळी आपल्या सहायकांना कार्यक्रम निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले. त्यांच्या कल्पनांना उभारी दिली. निर्मितीचे स्वातंत्र्यही दिले. त्यामुळे ‘आम्ही घडलो’ असे हे सर्व सहायक साभिमान मान्य करतात. ‘शिंपण’ या रामदास भटकळ यांनी संपादित केलेल्या, गतवर्षी प्रकाशित झालेल्या ग्रंथात या सर्वांनी बार्इंविषयीच्या आपल्या भावना नेमक्या शब्दांत व्यक्त केल्या आहेत.
आकाशवाणीचा सुवर्णकाळ पाहिलेल्या आणि गाजवलेल्या ज्योत्स्नाबार्इंच्या निधनाने व्यंकटेश माडगूळकर, राम फाटक, मधुकर गोळवलकर, वसंतराव कुलकर्णी, पुरुषोत्तम जोशी या निर्मात्यांच्या परंपरेतला शेवटचा दुवा निखळला आहे. पिढ्या घडवल्याचा सार्थ अभिमान बाळगणा- बाई देहाने आपल्यात नसल्या तरी स्मरणात सदैवच राहणार आहेत.