आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संख्याशास्त्र दिनविशेष : सामान्यांसाठी संख्याशास्त्राचे महत्त्व

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

2013 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय संख्याशास्त्र वर्ष’ म्हणून साजरं केलं जातंय आणि 29 जून हा दिवस 2007 सालापासून भारतात ‘राष्ट्रीय संख्याशास्त्र दिवस’ म्हणून साजरा केला जातो. आपल्यापैकी बहुतेक जण हे गणित/संख्याशास्त्र म्हटलं की ‘भोलानाथ, उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर’, याची आठवण होणारे. पण या संख्यांशी मैत्री झाली की संभव - असंभवतेची गणितं उलगडायला लागतात आणि मग अनेक अवघड प्रश्न चुटकीसरशी सुटतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर 1947 सालची एक घटना आठवतेय; तीसुद्धा आपल्या भारतातच घडलेली. फाळणीमुळे देशातील वातावरण तंग होतं. दिल्लीतला लाल किल्ला निर्वासितांनी व्यापला होता. त्यांना अन्नधान्याचा पुरवठा करण्याचं कंत्राट सरकारने एका कंत्राटदाराला दिले होते; पण किल्ल्यात नेमके किती लोक आहेत हे कुणालाच ठाऊक नव्हते. शिवाय परिस्थिती स्फोटक असल्याने प्रत्यक्ष आत जाऊन मोजणी करणं अशक्य होते. त्या वेळी जे. एम. सेनगुप्ता नावाच्या एका संख्याशास्त्रज्ञांनी एक क्लृप्ती लढवली. सगळ्या अन्नपदार्थांमध्ये मीठ हे सगळ्यात स्वस्त होते. त्यामुळे वापरल्या गेलेल्या मिठाचे प्रमाण वाढवून दाखवून कंत्राटदाराच्या फायद्यात फारशी वाढ होणार नव्हती. त्यामुळे कंत्राटदारानं वापरलेल्या मिठाचं प्रमाण आणि सामान्यपणे आहारात वापरल्या जाणार्‍या मिठाचे दरमाणसी प्रमाण, यांचा वापर करून सेनगुप्ता यांनी संख्याशास्त्राच्या मदतीनं लाल किल्ल्यातल्या निर्वासितांच्या संख्येचा अंदाज बांधला. दिल्लीतल्याच दुसर्‍या एका छोट्या छावणीतल्या निर्वासितांची प्रत्यक्ष गणना करून ही पद्धत उत्तम रीतीने काम करत
असल्याचे सिद्ध झाले.
अशा या संख्याशास्त्रातील जेकब बर्नोली या महान शास्त्रज्ञाने लिहिलेल्या ‘आर्स कंजेक्टंडी’ या मूलभूत निबंधाच्या प्रकाशनास यंदा 300 वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचबरोबर अनेकविध क्षेत्रांत उपयोगी पडणार्‍या बेजच्या प्रमेयाचा शोध लागूनही यंदा 250 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं जगभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सर्वसामान्य जनता आणि संख्याशास्त्र यांच्यातील दरी कमी व्हावी म्हणूनही काही खास प्रयत्न केले जात आहेत. जगभरातील 124 देश आणि 2040 संस्था/संघटना यात सहभागी झाल्या आहेत. 29 जून हा भारतात संख्याशास्त्राचा पाया रोवणारे
डॉ. प्रशांतचंद्र महालनोबीस यांचा जन्मदिवस. भारताचे औद्योगिकीकरण आणि आर्थिक नियोजन यासंदर्भातील अनेक निर्णयांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. सर्वेक्षणाच्या क्षेत्रातील त्यांचं काम जगभर वाखाणलं गेलं. त्यांनी 1932 मध्ये स्थापन केलेली भारतीय संख्याशास्त्र संस्था गेली 80 वर्षे संख्याशास्त्रज्ञ घडवण्याचं काम अव्याहतपणे करत आहे. महाराष्ट्रातही अनेक महान संख्याशास्त्रज्ञ होऊन गेले. त्यापैकी सर्वात पहिले म्हणजे डॉ. पांडुरंग वासुदेव सुखात्मे. भूक, कुपोषण या समस्यांवरील त्यांचं काम जगभर नावाजलं गेलं आहे. दैनंदिन जीवनातील अनेकविध क्षेत्रांमध्ये संख्याशास्त्राचा प्रचंड प्रमाणात वापर होतो. औषधनिर्माण, संगणक, वित्त, विमा इत्यादी क्षेत्रांमधील कंपन्या, बँका, महाविद्यालये, विद्यापीठे, संशोधन संस्था, भारतीय संख्याशास्त्रीय सेवा अशा अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संख्याशास्त्रज्ञांची गरज भासते. हवामानाचे अंदाज, बाजारभावांचे अंदाज, निवडणुकीच्या निकालाबाबतचे अंदाज असे सारे अंदाज वर्तवण्यासाठी संख्याशास्त्रीय साधनांची गरज पडते. आजकाल मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्‍या ‘पाय आकृती’चंच हे दुसरं रूप, वर्तमानपत्रात पाय आकृती आपण नेहमीच पाहतो. विशेषत: ‘रुपया असा आला, असा गेला’ किंवा ‘वेगवेगळी वर्तमानपत्रे वाचणार्‍या लोकांचे प्रमाण’ अशा प्रकारच्या माहितीचे रूपांतर रंगीबेरंगी ‘पाय’मध्ये केलं जाते. याचेच थोडं वेगळं रूप म्हणजे ‘नाइटिंगेल रोझ प्लॉट’ या आकृतीचा वापर साधारणत: मासिक/साप्ताहिक माहितीसाठी केला जातो. याचे वैशिष्ट्य म्हणजे वर्तुळाच्या प्रत्येक पाकळीचा कोन हा सारखाच असतो; पण प्रत्येक पाकळीची त्रिज्या (लांबी), ही वेगवेगळी असते. त्यामुळे मूळ पाय आकृतीप्रमाणेच यातही पाकळीचे क्षेत्रफळ हे त्या क्षेत्राच्या योगदानाच्या प्रमाणात असते. 1863 ते 1873 या दहा वर्षांच्या कालावधीत नाइटिंगेलच्या वैद्यकीय व संख्याशास्त्रीय प्रयत्नांमुळे भारतातील सैनिकांच्या मृत्यूचे प्रमाण हजारी 69 वरून 18 वर आले. तर असे हे संख्याशास्त्र. तुम्हालाही या दुनियेची सफर करायची असेल तर
www.statistics2013.org या संकेतस्थळास अवश्य भेट द्या.
(लेखिका पुणे विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागात सहायक प्राध्यापक आहेत.)