आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Struggle For Indian Athlete Shanti After She Was Found Guilty In Gender Test

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संवेदनशीलता! त्यांची आणि आमची

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण आफ्रिकेची कॅस्टर सेमेन्या आणि भारताची शांती सौंदरराजन य मध्यम पल्ल्याच्या धावकांनी स्त्रीत्वाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर त्यांना वैद्यकीय चाचण्यांना सामोरे जावे लागले. त्यात दोषी आढळल्यानंतर त्यांची पदके काढून घेण्यात आली आणि त्यांच्या विक्रमांच्या नोंदी पुसून टाकण्यात आल्या व पुढे स्पर्धांमध्ये सहभागी होण्यावर बंदी घातली गेली. मात्र या दोघींमध्ये सुदैवी ठरली ती केवळ कॅस्टर.
2009 मध्ये बर्लिनमधील विश्वस्पर्धांमध्ये आठशे मीटर्सचे सुवर्णपदक त्या वर्षीच्या विक्रमी वेळेत जिंकल्यानंतर कॅस्टरच्या ‘स्त्री’ असण्याविषयी शंका उत्पन्न झाल्या. तिचे शरीर, चेहरा पुरुषासारखा आहे, असे आरोप आधी होतच होते, पण शर्यत जिंकताच तिला चाचण्यांना सामोरे जावे लागले आणि तिचे धिंडवडे सुरू झाले न झाले तोच तिला धीर देण्यासाठी बघता-बघता संपूर्ण देश एकवटला. होय, ज्या देशात आठ-नऊ दशकांपूर्वी मोहनदास करमचंद गांधी नावाच्या एका बॅरिस्टरने वर्णद्वेषाविरुद्ध प्रथम आवाज उठवला तो हा देश. आणि तोही एका कृष्णवर्णीय खेळाडूसाठी. ज्या महात्मा गांधींना आपला आदर्श मानून वर्णद्वेषाची किंवा भेदाची लढाई नेल्सन मंडेला मोठ्या हिमतीने यशस्वीपणे लढले, त्यांना हे पाहून कृतकृत्य वाटले असेल. हेच तर त्यांनी मोठ्या संघर्षाने मिळवलेल्या स्वातंत्र्याचे फलित!
बरे, कॅस्टरचा लढा यशस्वी करून हे राष्ट्र थांबले नाही. त्याही बरेच पुढे जात त्यांनी लंडन ऑलिम्पिक खेळांसाठी तिला आपली ध्वजवाहक बनवून तिला आत्मसन्मान परत मिळवून देण्यापाठोपाठ फार कमी खेळाडूंना प्राप्त होणारा बहुमानही बहाल केला. त्यामुळे मनोधैर्य बळावलेली कॅस्टर ट्रॅकवर उतरताच देशासाठी सर्वस्व अर्पण तर करेलच, पण ती सुवर्णपदक जिंकली तर एक प्रकारे आपल्या देशवासीयांच्या ऋणातूनही उतराई होण्याची सुवर्णसंधी तिला उपलब्ध व्हावी. अर्थात, देशवासीयांनी तिला जो पाठिंबा दर्शवला होता, तो काही तिच्यावर आपल्या उपकारांचे ओझे लादण्याकरिता म्हणाल तर मुळीच नाही.
अगदी नेमकी याउलट आहे शांतीची स्थिती. 2006 मध्ये दोहा-कतार आशियाई खेळांमध्ये रौप्यपदकाची मानकरी ठरलेली ही अ‍ॅथलिट स्त्रीत्वाच्या चाचण्यांमध्ये दोषी आढळली. मात्र त्याआधी म्हणजे 2005 मध्ये इंचऑन (दक्षिण कोरिया) आशियाई चॅम्पियनशिप्समध्ये आठशे मीटर्सचे रौप्यपदक जिंकल्यानंतर शांतीची अशीच तपासणी झाली, ज्यामध्ये तिच्यात कोणताही दोष आढळला नव्हता. मग केवळ एक वर्षभरामध्ये तिच्या शरीरात असे नेमके कोणते बदल आणि ते कसे झाले, की ज्यामुळे ती ‘स्त्री’ नाही असे सिद्ध झाले? नैसर्गिकरीत्या घडले की तिने काही उत्तेजके किंवा तत्सम पदार्थ घेतल्याने ‘ती’चा ‘तो’ झाला? एका खेळाडूचे आयुष्य जर अहवालामध्ये काही दोष, त्रुटी असल्याने उद्ध्वस्त होत असेल तर त्याची चौकशी करण्याची जबाबदारी या संघटनांची नाही? राष्ट्रीय संघटनेच्या अध्यक्षपदी आदिल सुमारीवाला हे ऑलिम्पियन असता खेळाडूवर समजा अन्याय झाला असेल तर त्यासाठी दाद मागण्याची, शहानिशा करण्याची जबाबदारी त्यांची किंवा संघटनेची नाही? कदाचित शांती कॅस्टरप्रमाणे निर्दोष असणार नाही, असे जरी गृहीत धरले तरी तिच्यासाठी कोणीही कसलेच प्रयत्न करायचे नाहीत?
शांतीचे आणखी दुर्दैव हे की तिला नोकरी नाही, उदरनिर्वाहाचे साधन नाही. तिच्यावर जेव्हा आपत्ती कोसळली, त्या अहवालाच्या धगीमुळे ती होरपळली, तेव्हा तिच्या जखमांवर मलम लावण्याचे काम तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री करुणानिधी यांनी केले. मात्र त्यांनी तिला जे पंधरा लाख दिले ते आपला राजकीय अजेंडा पूर्ण करण्यासाठी असे म्हणतात. त्यातील नेमके किती तिच्या पदरी पडले, तिने ते व्यवस्थितपणे गुंतवले किंवा त्या रकमेचा योग्य विनियोग केला की नाही, हे ज्ञात नाही. तिने तसे काही केले असते तर आज एका वीटभट्टीवर दोनएकशे रुपये रोजंदारीवर मजुरी करून हात पोळून घ्यावे लागले नसते. भले कायमस्वरूपी नसली तरी दरमहा सहा हजारांची प्रशिक्षकाची नोकरी त्या मजुरीपेक्षा बरी होती. निदान त्या वातावरणात काही वेळ तिचे मन रमले असते. आपल्या वेदनांचा विसर पडला असता. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापर्यंत वेळ ओढवली नसती. योग्य सल्ला-मार्गदर्शनाचा अभाव, त्याला ती काय करणार? शिक्षण आणि संस्कारांअभावी चाचपडत राहिली.
महात्मा गांधींनी अवघ्या विश्वाला ‘सत्याग्रह’ हे प्रभावी अस्त्र दिले. दक्षिण आफ्रिकेला त्याच अस्त्राने स्वातंत्र्य दिले, वर्णभेद-वंशभेद संपवण्याबरोबर संवेदनशीलता काय हेही शिकवले. या कहाणीतून आम्हा भारतीयांनी हाच बोध घ्यायला हवा!