आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Subhash Awachat Writes About Artificial And Sensitive Person Article In Vinod Khanna

कलासक्त व संवेदनशील माणूस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अतिशय देखणा अभिनेता, संवेदनशील माणूस असलेला विनोद खन्ना हा माझा अत्यंत जवळचा मित्र होता. खरे तर ताे माझ्यापेक्षा वयाने मोठा, पण हे थोरलेपण त्याने कधीही जाणवू दिले नाही. १९८२ चा काळ...  पुण्यात आम्ही एकत्र खूप दिवस घालविले. त्या काळात विनोद बऱ्याचदा माझ्याच घरी राहायचा. अभिनेता म्हणून त्याची लोकप्रियता शिगेला पोहोचलेली होती. त्याच्या लोकप्रियतेने कळस गाठला होता. मात्र या साऱ्या गाेष्टींकडे विनोद खन्ना अत्यंत अलिप्तपणे बघत असे. त्याने एकदा मला खासगी गप्पांमध्ये सांगितले होते की, ‘यार या चित्रपटसृष्टीत कधी येईन असे वाटलेही नव्हते. पण आता आलो आहे तर इथल्या भल्याबुऱ्या वातावरणासह जगायची मी सवय लावून घेतलेली आहे.’  

एक उत्तम अभिनेता म्हणून विनोद खन्नाची अाेळख अाहेच, पण त्याचे काही अपरिचित पैलू सांगतो. ताे उत्तम क्लासिकल सिंगर होता. त्याने काही वर्षे पंडित जसराज यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षणही घेतलेले होते. माझ्याशी गप्पा मारताना ताे संगीत, चित्रकला, इतर ललितकला व चित्रपट व पुस्तके असे नानाविध विषयांवर बाेलायचा. त्याच्या भोवती अभिनेत्याचे वलय असले तरी त्याला साधे आयुष्य जगणे अधिक पसंत होते. मुंबईच्या जहांगीर कला दालनामध्ये माझे पहिले चित्रकला प्रदर्शन जेव्हा भरणार होते, त्यावेळी मी त्याच्या घरीच मुक्काम केला होता. प्रदर्शनाच्या पूर्वतयारीसाठी विनोद खन्ना स्वत: कला दालनामध्ये आला होता. माझी चित्रे नीट लावायला त्याने मदत केली होती. स्मिता पाटीलनेही या चित्रप्रदर्शनाच्या पूर्वतयारीत हातभार लावला होता. मी ते क्षण कधीच विसरू शकणार नाही.   

१९८२ मध्ये आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना अचानक त्याने काही काळापुरता चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. अाेशाे रजनीश यांचे शिष्यत्व त्याने पत्करले होते. विनोदच्या आयुष्यातील हा बदल मला खूप जवळून बघायला मिळाला. महेश भट्ट, विजय आनंद यासारख्या त्याच्या मित्रांबरोबर तोही रजनीश यांच्या सान्निध्यात राहिला. तो आचार्य रजनीशांकडे का गेला असावा? असा प्रश्न विचारला जातो.   

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील व्यंकटेशसारखे सुपरस्टार माझे जवळचे मित्र आहेत.  त्या चित्रपटसृष्टीत वलयांकित जीवन असले तरी बराचसा खोटेपणा, बटबटीतपणा असतो. या वातावरणाचा या अभिनेता, अभिनेत्रींना कालांतराने उबग येतो. वर्षभरातले काही दिवस तरी या वातावरणापासून दूर जावे, असे त्यांना वाटू लागते. मग काही जण अमेरिका किंवा अन्य देशांत एक-दोन महिने राहून येतात. काही जण आध्यात्मिक गुरूंच्या सान्निध्यात दिवस घालविणे पसंत करतात. विनोद खन्नाने रजनीशांचे शिष्यत्व पत्करणे पसंत केले त्यामागील हेही एक महत्त्वाचे कारण असू शकते. विनोदची पहिली पत्नी गीतांजली हिच्या समवेत त्याचे काही सांसारिक मतभेद झाले होते. त्यामुळेही तो अस्वस्थ होता. त्याला मन:शांतीची गरज होती. ती त्याला रजनीश यांच्या विचारांनी मिळवून दिली. कोरेगाव येथील रजनीश यांच्या आश्रमामध्ये त्याचे वास्तव्य असे तेव्हाही तो अत्यंत साधे आयुष्य जगत होता. आश्रमातील माळीकामापासून अनेक गोष्टी तो करत असे. आपण अभिनेता असणे तो त्यावेळी सहजी विसरून जाई. पाच वर्षे रजनीशांच्या सान्निध्यात राहिल्यानंतर विनोद खन्नाने पुन्हा बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. पुनरागमन करण्याआधी तो एका खोलीत १० ते १२ दिवस एकटा राहिला होता. त्याने या काळात आपल्या मनाशी योग्य खूणगाठ बांधूनच पुन्हा या क्षेत्रात पाऊल ठेवले. कोणत्याही अभिनेत्यासाठी सेकंड इनिंगमध्ये यशस्वी होणे तसे कठीण असते. परंतु विनोद खन्ना इतका जिगरबाज की त्याने हेही आव्हान पेलले. त्याचे चित्रपट पुन्हा यशस्वी होऊ लागले व तो पूर्णपणे इथे स्थिरावला. 
  
विनोद खन्नाने चित्रपटात काम करताना दिग्दर्शक, निर्माता व अन्य लोकांना कधी त्रास दिला आहे, असे मी कधीही ऐकलेले नाही. मला अमुकच संवाद दे, भूमिकेची लांबी मोठी करा, दुसऱ्याची भूमिका कमी करा असे दडपण त्याने कधीही कोणावर आणले नाही. आपण आपले काम चोख करायचे हे त्याचे सूत्र होते. विनोद खन्ना हा उत्तम खेळाडू होता. तो पुण्यात माझ्या घरी आलेला असताना अनेकदा टेबल टेनिस खेळायचो. आम्ही गप्पा मारताना चर्चा तत्त्वज्ञानावरही वळत असे. विनोदचे वाचन उत्तम असल्याने तो या विषयातही अतिशय मुद्देसूद बोलायचा. त्याला चित्रकलेबद्दल आस्था होती. माझ्या चित्रांबद्दलही तो आवर्जून चर्चा करायचा. तो बऱ्यापैकी मराठी बोलत असे. मला तो ‘सुभ्या’ या नावानेच हाक मारत असे. विनोदची मुले माझ्या पुण्यातील घरी खेळली, बागडली आहेत.   

विनोद खन्नाने कालांतराने कविता दफ्तरी हिच्याशी दुसरे लग्न केले. कविता ही मराठी मुलगी आहे. माझ्या चित्रांच्या ऑक्शनच्या वेळीच या दोघांची भेट झाली. वारंवार भेटीचे रूपांतर मग प्रेमात व नंतर लग्नात झाले. विनोद खन्ना आता आजारी होता. त्यामुळे पूर्वीप्रमाणे त्याच्याशी वारंवार भेटी होत नव्हत्या. मात्र आम्ही फोनवर नेहमी बोलायचो. एकमेकांचे क्षेमकुशल विचारायचो. विनोद स्वत:च्या दु:खाविषयी कोणाशीही फार बोलत नसे. त्याला नेमका काय आजार झाला आहे याचा मला शेवटपर्यंत त्याने किंवा कविताने थांग लागू दिला नव्हता. विनोदच्या ७० व्या वाढदिवसाचे निमित्त साधून मी त्याला भेटलो होतो. माझा खंडाळ्याला स्टुडिओ आहे. तिथे दोन-चार दिवसांसाठी येऊन राहायची त्याला खूप इच्छा होती. ते काही अखेरपर्यंत जमले नाही. मुकद्दर का सिकंदरसारख्या चित्रपटात तो व अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाची तारीफ करतानाच मीडियाने त्यांच्यात सुप्त स्पर्धा असल्याच्या बातम्याही त्यावेळी पिकविल्या होत्या. मात्र मी दोन्ही अभिनेत्यांना खूप जवळून ओळखत असल्याने खात्रीने सांगतो की अशी स्पर्धा त्यांच्यात कधीही नव्हती. विनोद खन्ना हा माणूस कधी कोणाच्या स्पर्धेत उतरला नाही, कधी कोणाला आपले स्पर्धक मानले नाही. तो आपले काम चोख करीत राहिला. आपल्या आयुष्यात काही लोक असे असतात की त्यांची जागा कोणीच भरून काढू शकत नाही. नेमक्या याच भावना विनोद खन्ना या जिगरी मित्राबाबत माझ्या मनात दाटून आल्या आहेत.  
(शब्दांकन - समीर परांजपे)
बातम्या आणखी आहेत...