आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसपुढे अस्तित्वाचे नव्हे, नेतृत्वाचे संकट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काँग्रेसशी प्रामाणिक मतदार काँग्रेसजवळ या प्रतिकूल परिस्थितीतही टिकून आहे. काँग्रेसच्या अस्तित्वाला धोका नसण्याचे दुसरे मोठे कारण म्हणजे या देशात काँग्रेस विचारांचा अवकाश मोठा आहे. नरेंद्र मोदींना पडलेली मते आणि त्यांच्या विरोधात पडलेली मते लक्षात घेतली, तर या अवकाशाची कल्पना येईल.
लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचा पराभव ही काही अनपेक्षित घटना नाही. मतमोजणीपूर्वीच त्याची कल्पना काँग्रेससह सर्वांनाच आली होती. काँग्रेसच्या पराभवाचा पाया नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा धूमधडाका सुरू होण्यापूर्वीच रचला गेला होता. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाने काँग्रेस पराभवाची मजबूत पायाभरणी केली होती. तरीही काँग्रेसचा एवढा दारुण पराभव होईल, याची ‘काँग्रेसमुक्त भारता’ची आस लावून बसणार्‍यांनादेखील कल्पना नव्हती. ‘काँग्रेसमुक्त भारत’ही निवडणुकीसाठीची लोकप्रिय घोषणा यापलीकडे या घोषणेचा कोणी विचार केला नव्हता. निवडणूक निकालाने मात्र खरेच काँग्रेस संपते की काय, असे वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण केली आहे. काँग्रेसचा एवढा दारुण पराभव होणे आणि आता ती संपणार असे वाटणे याचे एक प्रबळ कारण अण्णा आंदोलनाच्या परिणामी हा देश टोकाचा विचार करू लागला आहे. 2004 ते 2009 या पहिल्या कार्यकाळातील कामाने खुश होऊन मतदारांनी 2009 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पूर्वीपेक्षा जास्त समर्थन देऊन काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारला पुन्हा सत्तेत आणल्यानंतर अवघ्या दोन वर्षांतच काँग्रेसने इतक्या वर्षांत काहीच चांगले केले नाही, उलट देशाला लुटून त्याचा सत्यानाश केला हा अतिशय टोकाचा विचार लोकांच्या गळी उतरवण्यात ते आंदोलन यशस्वी झाले. राहुल गांधींपुढे खरे आव्हान होते आणि आहे ते काँग्रेसची जनमानसात अण्णा आंदोलनाने आणि मोदींच्या प्रचाराने तयार झालेली प्रतिमा बदलण्याचे. ही प्रतिमा बदलण्यासाठी आक्रमक होऊन आरोप करणार्‍यांना आव्हान देण्याची गरज असताना त्यावर मौन बाळगल्याने काँग्रेसबद्दलचा समज बदलला नाही.
लोकांची अशी काँग्रेसविषयक टोकाची निराशाजनक मानसिकता तयार झाल्याने ‘काँग्रेसमुक्त भारत’ संकल्पना हातोहात विकली गेली. लोकच नाही तर विश्लेषक, विचारवंत आणि पत्रपंडितदेखील या आंदोलनाच्या परिणामी टोकाचा विचार ठामपणे मांडायला लागले. आंदोलन इतिहासजमा झाले, पण त्याच्यासोबत सम्यक आणि तटस्थपणे घटनांकडे, परिस्थितीकडे पाहण्याची वृत्ती आणि क्षमताही इतिहासजमा झाली की काय, असे वाटण्यासारख्या परिस्थितीत नरेंद्र मोदी यांच्या प्रचार यंत्रणेने एकच काम केले. टोकाची विचारावस्था कायम ठेवत लंबक दुसर्‍या टोकाला नेला. निराशेच्या टोकावरून आशेच्या टोकावर नेले. काँग्रेसने काहीच केले नाही, आता नरेंद्र मोदी सारे काही करतील! काँग्रेसच्या दारुण पराभवाचे आणि नरेंद्र मोदींच्या मोठ्या विजयाला ही टोकाची मानसिकता कारणीभूत ठरली आहे. काँग्रेस आता संपणार, राजकीय पटलावरून अदृश्य होणार अशी आज जोरात चर्चा सुरू आहे याचे कारणच टोकाचा विचार करणे आम्ही सोडले नाही हे आहे.
काँग्रेस हा 130 वषा्रंचा जुना पक्ष आहे, देशाच्या कानाकोपर्‍यात त्याचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे हा पक्ष संपणार नाही, असा टोकाचा भाबडा युक्तिवाद काँग्रेस समर्थकांकडून ऐकायला मिळतो आहे. उलट जुना असल्याने नव्या जगाशी जुळवून घेणे काँग्रेसला जमलेले नाही हे त्याच्या पराभवाचे खरे कारण आहे! ही निवडणूक काँग्रेससाठी सर्वाधिक प्रतिकूल निवडणूक राहिली हे सर्वच मान्य करतात. अशा सर्वाधिक प्रतिकूल राहिलेल्या निवडणुकीत काँग्रेसचा जो जनाधार होता तो कायम राहिला, हे मात्र कोणीच ध्यानी घेत नाही. काँग्रेसचा या निवडणुकीत पराभव झाला. तो त्याचा मतदार त्याच्यापासून दूर गेला, जनाधारात घसरण झाली म्हणून नव्हे, तर नव्या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यात हा पक्ष आणि त्याचे नेतृत्व सपशेल अपयशी ठरले हे त्या पक्षाचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे कारण आहे. नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना जी धोबीपछाड दिली, ती तरुण आणि नव्या मतदाराच्या बळावर! काँग्रेस आणि गांधी घराण्याबद्दलची संघ परिवारात असलेली तुच्छतेची व घृणेची भावना संघशाखेवर कधीही हजेरी न लावलेल्या बहुसंख्य युवकांच्या मनात पसरली ती अर्थातच अण्णा हजारेंच्या जनलोकपाल आंदोलनामुळे! काँग्रेसने तरुण नेतृत्व म्हणून राहुल गांधींना पुढे केले खरे, पण त्यांना तरुणांना काँग्रेसकडे आकर्षित करता आले नाही. मतदानाचे आकडे पाहिले तर आपल्या लक्षात येईल की मागच्या तीन-चार निवडणुकांत जितक्या मतदारांनी काँग्रेसला मत दिले साधारणपणे तितक्याच मतदारांनी या निवडणुकीतही काँग्रेसला मत दिले. हा मतदार 10 ते 11 कोटींच्या घरात आहे. भाजपला मागच्या तीन-चार निवडणुकांत 7 ते 8 कोटींच्या घरात मतदान होत आले आहे, ते या निवडणुकीत जवळपास दुप्पट झाले आहे! काँग्रेसचे मतदार कायम पण जागांमध्ये मात्र मोठी घट होण्याचे कारण बहुतांश तरुण आणि नवा मतदार नरेंद्र मोदींच्या मागे उभा राहिला. यामुळे भाजपला दुप्पट मतदान होऊन मोठा विजय मिळाला. 2009च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर 2014च्या या ताज्या निवडणुकीपर्यंत जवळपास 10 कोटी अशा विक्रमी संख्येत नव्या मतदारांची नोंदणी झाली हे लक्षात घेतले, तर काँग्रेसचा मतदार काँग्रेसपाशी राहूनही भाजपचा मतदार दुप्पट कसा झाला, याचे उत्तर या नव्या मतदार नोंदणीत सापडते. काँग्रेसच्या अस्तित्वाला लगेच धोका नसण्याचे कारण काँग्रेसशी प्रामाणिक मतदार काँग्रेसजवळ या प्रतिकूल परिस्थितीतही टिकून आहे हे आहे. काँग्रेसच्या अस्तित्वाला धोका नसण्याचे दुसरे मोठे कारण म्हणजे या देशात काँग्रेस विचारांचा अवकाश मोठा आहे. नरेंद्र मोदींना पडलेली मते आणि त्यांच्या विरोधात पडलेली मते लक्षात घेतली, तर या अवकाशाची कल्पना येईल. मात्र, हा अवकाश ‘आप’सारख्या पक्षांनी किंवा प्रादेशिक पक्षांनी व्यापला जाणार नाही याची काळजी काँग्रेसला घ्यावी लागणार आहे. यासाठी आगामी काळात काँग्रेसपुढे आव्हान आहे ते आज सोबत असणारा मतदार टिकवून ठेवत नव्या आणि तरुण मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे. ते आव्हान पेलण्यासाठी तरुणांची भाषा समजणारे आणि तरुणाच्या भाषेत बोलणारे उत्साही, साहसी आणि गतिमान नेतृत्वही काँग्रेससाठी काळाची गरज आहे. असे नेतृत्व देण्यास राहुल गांधी कमी पडले हीच काँग्रेसची खरी समस्या आहे. राहुल गांधी आपल्या भाषणातून लोकांना हक्क देणारे कायदे देण्याची जी भाषा करीत होते ती चुकीची नव्हती पण युवकांना जोडण्यासाठी उपयोगाची नव्हती. पण हक्क आणि अन्न सुरक्षेचे कायदे आपली नय्या पार करतील या भ्रमात काँग्रेस नेतृत्व राहिल्याने तरुणाशी त्यांची नाळ जुळलीच नाही. काँग्रेसपुढे आव्हान आहे ते युवकाशी नाळ जोडण्याचे. आज राहुल अपयशी ठरला असला तरी राहुलची जागा घेऊ शकेल असे पर्यायी नेतृत्व काँग्रेसमध्ये दिसत नाही. पराभवाची मीमांसा करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या कार्यकारिणीच्या बैठकीतील उपस्थितांवर नजर टाकली तर काँग्रेसकडे एकही कणखर जननेता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसमध्ये असे पर्यायी नेतृत्व तयार होऊ नये याची इंदिरा गांधींनी घेतलेली काळजी आणि तो प्रघात बदलण्यासाठी सोनिया गांधींनी कोणतीही पावले न उचलल्याने काँग्रेस नेतृत्वाच्या संकटात सापडले आहे. हे संकट दूर करण्यासाठी राहुलला आजच्या आपल्या कार्यपद्धतीत आणि विचारपद्धतीत आमूलाग्र बदल करावा लागणार आहे. राहुलला सत्तेची विरक्ती दूर करता येत नसेल तर प्रियंका गांधींसाठी मार्ग मोकळा करावा. घराणेशाहीपासून काँग्रेसला मुक्ती मिळण्याची गरज असली तरी आज तसे करणे काँग्रेससाठी आत्मघातकी ठरेल.

(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता आहे. )