आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निहलानींचे उडते पतंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनुराग कश्यप हा मुळातच बंडखोर निर्माता-दिग्दर्शक समजला जातो व त्याने त्याच्या कलाकृतीतून आपला बंडखोरपणा, प्रवाहाच्या विरोधात जाण्याचे धाडस दाखवून दिले आहे. एका अर्थाने असेही म्हणता येईल की, अनुराग कश्यप हा बॉलीवूडमधला दबंग निर्माता-दिग्दर्शक आहे व तो सातत्याने समाजातील शोषित, पीडित, गुन्हेगारी, समाजाच्या 'सुसंस्कृत' चौकटीला प्रश्न विचारणारे, समाजातली 'डार्क रिअॅलिटी'ला मांडणारेच सिनेमे बनवतो. त्याचा 'उडता पंजाब' हा नवा येणारा चित्रपट अमली पदार्थांच्या सुळसुळाटामुळे उद्ध्वस्त झालेल्या पंजाबचे वास्तव दाखवणारा आहे व हे वास्तव बॉलीवूडमधल्या टिपिकल पंजाबी लस्सी, मक्के की रोटी, सरसों का साग, भांगडा टाइप धुडगूस घालणाऱ्या, पंजाबच्या हिरव्या शेतांतून गाणी म्हणणाऱ्या रोमँटिसिझमला छेद देणारे आहे. आजपर्यंत चित्रपट व टीव्ही मालिकांतून दाखवण्यात येणारा लोभस, स्वर्गीय पंजाब प्रत्यक्षात उद्ध्वस्त झालेला असेल तर ते कुणी कलावंताने आपल्या कलाकृतीने मांडायचे की नाही हा प्रश्न आहे.

पंजाबमध्ये काहीही खुशहाल नाही हे सांगणारे अनेक मीडिया रिपोर्ट प्रसिद्ध झालेले आहेत. अनेक सामाजिक-आर्थिक अभ्यासकांनी अमली पदार्थ, शस्त्रास्त्रे यांची पंजाबमधून किती मोठ्या प्रमाणात तस्करी होते हेही सप्रमाण दाखवून दिलेले आहे. काही महिन्यांपूर्वी पठाणकोटमध्ये भारताच्या लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा तपास करताना अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांवरही तपास यंत्रणांनी बोट दाखवले होते. भारत-पाकिस्तान संबंध जरी तणावाचे असले तरी या दोन्ही देशांच्या सीमेवरून स्मगलिंग थांबलेली नाही हे उघड आहे. अफगाणिस्तान-पाकिस्तान-पंजाब-राजस्थान- गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक व केरळ असा ड्रग कॉरिडॉरही लपून राहिलेला नाही. हे सगळे आपले धगधगते वास्तव सांगणारा चित्रपट जर आपल्या सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पटत नसेल तर या महाशयांनी आपले पद ताबडतोब सोडून स्वत:ला एखाद्या संस्कृतीरक्षण करणाऱ्या संघटना -पक्षासाठी वाहून घ्यावे हे बरे होईल. गंमत म्हणजे हेच पहलाज निहलानी सवंग चित्रपट काढण्यात एकेकाळी आघाडीवर होते आणि प्रेक्षकांनीही त्यांनी दाखवलेला सवंगपणा सहन केला होता; पण केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर साहित्य-कला क्षेत्राच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य कक्षा अधिक संकुचित होऊ लागल्या आणि या कक्षा अधिक संकुचित व्हाव्यात म्हणून गजेंद्र चौहान, पहलाज निहलानी, अशोक पंडित यासारख्या बुणग्यांना मानाची पदे दिली आहेत. हीच मंडळी आता शिरजोर होऊ लागली आहेत. आज एकूणच जगभरातले चित्रपट वैविध्यपूर्ण विषयांवर येत असून सोशल मीडियाच्या प्रभावामुळे तर चित्रपटातील भाषांचाही अडसर राहिलेला नाही. सैराट मराठी भाषेत असूनही त्याची दखल इंग्रजी व अन्य भाषिक माध्यमांनी आवर्जून घेतली आहे. परभाषिक प्रेक्षक सैराट पाहायला जाताना दिसतात. निहलानीसारखे संस्कृतीरक्षक हे बदलतं वास्तव समजून घेण्यास तयार नाहीत. जेव्हा 'उडता पंजाब'मध्ये सेन्सॉर बोर्डाने एक-दोन नव्हे तर ८९ कट्स सुचवले तेव्हाच लक्षात येते की निहलानी कुणाची मखलाशी करत आहेत व कोणत्या राजकीय पक्षांचा त्यांना अजेंडा राबवायचा आहे. पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून तेथे अकाली दल-भाजपविरोधात अँटी इन्कम्बसी आहे. येथील काही मंत्री व त्यांच्या टोळ्यांनी अमली पदार्थांच्या व्यापारात पंजाबला पोखरून टाकले आहे. बेरोजगारी, गुन्हेगारी, कोलमडलेली शेती, कुटुंब व्यवस्था हे पंजाबमधले सामाजिक-आर्थिक वास्तव आहे. त्यात गेल्या १० वर्षांत किडलेली यंत्रणा पंजाबमध्ये धुमाकूळ घालतेय हे लोकांपर्यंत जाणे निहलानींना खटकतेय.

अनुरागच्या टीकेचा रोख अन्य सेन्सॉर बोर्डच्या सदस्यांपेक्षा निहलानी व केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अरुण जेटली यांच्यावर थेट आहे, त्याचे कारण असे की, निहलानींच्या एकूणच कार्यशैलीबाबत, वर्तनाबाबत त्याने अरुण जेटली, राठोड यांच्यापर्यंत चिंता व्यक्त केली होती; पण त्यांच्याकडून कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत. चित्रपटाचा विषय व त्याच्या मांडणीवर सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षाने प्रश्नचिन्ह उपस्थित करणे म्हणजे हुकूमशाही आली, असे अनुरागचे म्हणणे आहे. "उडता पंजाब' हा चित्रपट आजच्या युवकांचा आहे, ड्रग रॅकेट चालवणाऱ्या माफियांचा आहे. या रॅकेटमध्ये हितसंबंध गुंतलेल्या सरकारी बाबूंचा, राजकीय नेत्यांचा व धनाढ्यांचा आहे, हे वास्तव एक कलावंत म्हणून मला सांगायचे आहे, असे तो म्हणतो. त्याच्या या एकूणच अभिव्यक्ती स्वातंत्र्याला निहलानींकडून घालण्यात येणारी आडकाठी हा राजकीयच डाव आहे.
बातम्या आणखी आहेत...