आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनच्या ‘जीएम’ सोयाबीनचे आव्हान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोयाबीन हे भारतीय शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले गळीत धान्य. आकड्यांमध्ये सांगायचे तर दोन दशकांपूर्वी देशातले सोयाबीन क्षेत्र ५४ लाख ४१ हजार हेक्टर होते. यात दुपटीने वाढ झाली असून यंदा दीड कोटी हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला आहे. मान्सूनची साथ कायम राहिल्यास भारताचे सोयाबीन उत्पादन १ कोटी टनांच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. भारतातच नव्हे, तर जागतिक पातळीवरसुद्धा सोयाबीन इतर कोणत्याही गळीत धान्यापेक्षा सर्वाधिक महत्त्वाचे बनले आहे. यंदा जगात सुमारे ३२ कोटी टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज आहे.

सोयाबीनचे व्यापारी महत्त्व वादातीत असल्याने चीनने याबाबतीत एक पाऊल भारतापुढे टाकले आहे. सीमारेषेवरच्या चिनी हालचालींइतकेच हे लक्षात घेणेदेखील महत्त्वाचे आहे. कारण चीनचे अफाट लागवड क्षेत्र लक्षात घेता याचा परिणाम भारतीय सोयाबीन उत्पादकांवर होणार आहे. चीनने त्यांचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पंचवार्षिक आराखडा नुकताच जाहीर केला. यात चीनने प्रथमच जनुकीय सुधारित (जीएम - जेनेटिकली मॉडिफाइड) पिकांचे नियोजन मांडले. येत्या पाच वर्षांत जीएम सोयाबीन व जीएम मक्याच्या व्यावसायिकीकरणाला चालना देण्याचे धोरण चीनने स्वीकारले आहे. आवर्जून लक्षात घेण्याची बाब अशी की, आजघडीला चीन हा सोयाबीनचा जगातील सर्वात मोठा आयातदार आहे. चीनचे स्वतःचे सोयाबीन उत्पादन यंदा सव्वा कोटी टन अपेक्षित आहे. मात्र त्यांची सोयाबीन आयात साडेआठ कोटी टनांचा आकडा ओलांडणार आहे. सोया सॉस आणि टोफूशिवाय चिनी लोकांचे जेवण होत नाही. मानवी आहाराबरोबरच पशू आणि पोल्ट्री खाद्यासाठी चीनला प्रचंड सोयाबीन लागते. विक्रमी आयातीवरून चीनचे सोयाबीन परावलंबित्व लक्षात येते. त्यामुळेच देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी चीनने जीएमला शरण जाण्याचे ठरवले आहे. जीएमला विरोध करणारा प्रवाह चीनमध्येही आहे. मात्र राज्यकर्त्यांनी स्पष्ट धोरण जाहीर केल्यानंतर होणाऱ्या विरोधाचे चीनमध्ये काय होते याचा अंदाज सहज बांधता येईल.

जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक अमेरिकेत तणनाशक जीएम सोयाबीनची लागवड पूर्वीच सुरू झाली. हजारो हेक्टर्सवर पसरलेल्या फार्मसमध्ये अमेरिका यांत्रिकीकरणाच्या साहाय्याने जीएम सोयाबीनचे उत्पादन घेते. हेच मॉडेल चीनला राबवायचे आहे. त्यासाठी जीएम सोयाबीन आवश्यक वाटू लागले आहे. शेजारी चीनमध्ये हा विचार पक्का झाला असतानाच दुसऱ्या टोकावरच्या ब्राझीलनेही जीएमसंदर्भातला महत्त्वाचा निर्णय नुकताच घेतला. अमेरिकेतल्या जीएम मक्याच्या आयातीसाठी ब्राझीलने दरवाजे खुले करण्याचे ठरवले आहे. ब्राझील जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मका आयातदार देश आहे. त्यांचे मका उत्पादन घटल्याने ब्राझीलमधले पोल्ट्री आणि पशुखाद्य महागले आहे. त्यावर उपाय म्हणून जीएम मक्याच्या आयातीचा निर्णय ब्राझीलने घेतला. ब्राझीलला जीएमचे वावडे नाही. सोयाबीन, कापूस व मक्याच्या जीएम वाणांची लागवड ब्राझीलमध्ये आधीपासूनच होते. अमेरिका तर जगातला सर्वात मोठा जीएम सोयाबीन-मक्याचा उत्पादक आहे.
अमेरिका, ब्राझील आणि चीन या देशांमधले लागवड क्षेत्र भारताप्रमाणेच महाकाय आहे. मका, कापूस, सोयाबीन या महत्त्वाच्या व्यापारी पिकांचे या देशांमधले उत्पादन, या देशांकडून होणारी आयात-निर्यात यावरून या पिकांची जागतिक तेजी-मंदी ठरते.

या पार्श्वभूमीवर या देशांनी जीएमबद्दल घेतलेली लवचिक भूमिका भारताला विचार करायला लावणारी आहे. सोयाबीनवर अवलंबून असलेल्या सर्वाधिक शेतकऱ्यांची संख्या देशात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात आहे. सोया उत्पादने आणि सोया तेलाच्या वाढत्या आयातीने भारतीय सोया उद्योग आणि शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने आयात सोयाबीन तेलावरची ड्यूटी ४५ टक्क्यांवर नेण्याची मागणी नुकतीच पंतप्रधानांकडे केली ती यामुळेच. पाच वर्षांपूर्वी साडेदहा लाख टन असणारी सोया तेल आयात आता ४० लाख टनांवर गेली आहे. डाळी आणि खाद्यतेलामधले भारताचे परावलंबित्व जगजाहीर आहे. कीड-रोग, अवर्षणावर मात करून खात्रीशीर उत्पादन देणाऱ्या जीएम वाणांचा शास्त्रीय विचार भारताला करावा लागणार. सव्वाशे कोटी तोंडांचा देश सदासर्वकाळ आयातीवर विसंबून राहू शकणार नाही..

सुकृत करंदीकर
(लेखक विशेष प्रतिनिधी आहेत.)
बातम्या आणखी आहेत...