आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाडोत्री गर्भाशयांची ‘इंडस्ट्री’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाभारतातल्या पांडव-कौरवांचा जन्म ‘टेस्ट ट्यूब बेबी’ आणि ‘सरोगेसी’ तंत्रज्ञानाने झाल्याचा दावा पुरातन भारतीय संस्कृतीबद्दल अवास्तव अभिमान असणारे छातीठोकपणे करतात. भारतीय विज्ञान त्या काळीसुद्धा किती प्रगत होते, पाच हजार वर्षांपूर्वीदेखील भारतीय संस्कृती किती आधुनिक होती वगैरे आत्मगर्वाचा भाव यामागे असतो. त्यात किती तथ्य आहे, हा निरंतर वादाचा विषय असेल. मात्र, प्राचीन भारतीय साहित्यात ही संकल्पना अस्पष्ट रूपात का होईना मांडली गेल्याचे किमान सत्य डावलता येत नाही.

स्त्री-पुरुषांचे शारीरिक मिलन होऊ देता नव्या जीवाला जन्म देणारे तंत्रज्ञान एकविसाव्या शतकात सत्यात उतरवले. स्त्री-पुरुषाच्या बीजाचा प्रयोगशाळेत संयोग घडवून स्त्रीच्या गर्भात त्याचे रोपण करायचे आणि नैसर्गिकरीत्या गर्भवाढ करून अपत्याला जन्म देण्याचा प्रयोग मानवाने सत्तरच्या दशकात यशस्वी केला. जगातली पहिली टेस्ट ट्यूब बेबी १९७८ मध्ये इंग्लंडमध्ये जन्माला आली. त्यानंतर तीनच वर्षांनी कोलकात्यात भारतातल्या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीने जन्म घेतला. इच्छा असूनही शारीरिक मर्यादांमुळे आई-बाप होता येत नसल्याचे दु:ख भोगणाऱ्यांसाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरले. अर्थात, टेस्ट ट्यूब बेबी हा माता-पिता होण्याचा हुकुमी उपाय तेव्हाही नव्हता. आजही नाही. म्हणून विज्ञानाने पुढचा टप्पा गाठला तो ‘सरोगेसी’चा.

वयाच्या पन्नाशीला टेकलेले शाहरुख खान, आमिर खान, फराह खान अलीकडे ‘सरोगेसी’द्वारे पालक बनले. गेल्या पिढीचा ‘सिनेस्टार’ जितेंद्रचा चाळिशीतला अविवाहित मुलगा तुषार कपूर यानेही नुकतेच ‘सरोगेसी’द्वारे पितृत्व पत्करले. ‘सेलिब्रिटीं’मध्ये रुळणारा हा कल सर्वसामान्यांमधले ‘सरोगेसी’बद्दलचे कुतूहल जागवणारा आहे. ‘सरोगेसी’ला कायदेशीर मान्यता मिळालेल्या घटनेस भारतात दशक उलटून गेले. तेव्हापासून भारताने एवढी मजल मारली की ‘सरोगेसी’ मातांची जागतिक राजधानी होण्याकडे भारताची वाटचाल सुरू आहे. दरवर्षी दहा हजारांहून अधिक अपत्यांचा जन्म ‘सरोगेसी’द्वारे होऊ लागला आहे. विशेष म्हणजे यांचे पालक भारतीयच असतात असे नव्हे, निम्मे पालक परकीय आहेत. का? कारण सोपे आहे. भारतात सरासरी पंधरा-वीस लाख रुपयांत माता किंवा पिता होण्याचे स्वप्न पूर्ण होते. युरोप-अमेरिकेत हाच खर्च पाच-सहा पट जास्त आहे.

पालक होण्यासाठी मूल दत्तक घेण्याचा पारंपरिक मार्ग आहेच; पण स्वत:चा अंश असलेल्या अपत्याचे पालक होण्यास प्राधान्य असणे नैसर्गिक आहे. सक्षम स्त्रीबीजाची स्त्री किंवा सक्षम शुक्राणू असलेला पुरुष दुसऱ्या स्त्रीचे गर्भाशय भाड्याने घेऊन ‘माता’ किंवा ‘पिता’ होऊ शकतो. यासाठी ‘तो’ वा ‘ती’ विवाहित असण्याची गरज अजिबातच नाही. आर्थिक क्षमता आणि जन्मणाऱ्या अपत्याचे पालकत्व स्वीकारण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली की झाले. करिअरच्या मागे धावणारी तरुणाई मोठ्या संख्येने ‘एकल पालकत्वा’कडे वळू लागली आहे. प्रामुख्याने निम्न आर्थिक स्तरातील महिला गर्भाशय भाडोत्री देण्यासाठी पुढे येत आहेत. नऊ महिन्यांत दोन-तीन लाखांचा रोख मोबदला, वैद्यकीय सुविधा आणि चांगला आहार हे आकर्षण गरीब महिलांसाठी पुरेसे असते. आई होण्यासाठी नऊ महिने गर्भ पोटात वाढवण्याची सवड नसलेल्या महिलांसाठी, लग्नाच्या बेडीत अडकता ‘बाप’ बनू इच्छिणाऱ्या पुुरुषांसाठी ‘सरोगेसी’ पर्याय ठरतो आहे.

विधवा आणि विधुरांची वाढती संख्या ही गेल्या शतकाच्या सुरुवातीची सामाजिक समस्या होती. जोडीदार गमावलेल्या स्त्रियांच्या पुनर्विवाहाचा प्रश्न त्या काळी बिकट होता. कालौघात पुनर्विवाहाचा प्रश्न तितका भेदक उरलेला नाही. सती, केशवपनसारख्या अमानवी प्रथादेखील हद्दपार झाल्या आहेत. हे शतक ‘एकल पालकत्व’ आणि ‘गर्भाशय भाडोत्री देणाऱ्या महिलां’ची वाढती संख्या घेऊन नव्या सामाजिक प्रश्नांसह आले आहे. कोट्यवधी रुपयांची ‘सरोगेसी इंडस्ट्री’ आणखी फोफावणार आहे. तूर्तास काही मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांचा आधार असलेल्या ‘सरोगेसी इंडस्ट्री’ला कायद्याच्या चौकटीत आणण्यासाठी सरकारला पावले उचलावी लागतील. वंशवृद्धीची आदिम मानवी प्रेरणा कायम आहे. आर्थिक सुबत्ता आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या बदलत्या कल्पनांमुळे ही प्रेरणा पुढे नेण्याचे मार्ग बदलत आहेत. यातून निर्माण होणाऱ्या नव्या कुटुंब व्यवस्थेला सामावून घेण्याची लवचिकता समाजाला दाखवावी लागेल.
(लेखक विशेष प्रतिनिधी आहेत.)
बातम्या आणखी आहेत...